‘वरुणय’, ‘विजय’ आणि ‘अतिपूर्व’

    दिनांक  25-Apr-2020 21:48:36
|


philipins_1  H


आग्नेय आशियाच्या नकाशावरील उर्वरित तीन देशांवर आज आपण दृष्टिक्षेप करूया. ते आहेत (शीर्षकाच्या क्रमानुसार) -
ब्रूनय’ (ब्रुनेई नव्हे), ‘फिलिपिन्सआणि तिमोर-लेस्त.


हिंदू मान्यतेनुसार जलदेवता
वरूणयाचे म्हणजे नाविकांचेया अर्थाने पडलेले या बेटाचे नाव अपभ्रंशित होऊन ब्रूनयअसे प्रचलित झाले. मलय वंशगटाची बहुसंख्या असलेल्या आणि आकाराने यादीत खालून दुसरा (सिंगापूरनंतर) असलेल्या या सुलतानी’ (अधिकृतरित्या इस्लामी) देशाचे अधिकृत नाव ब्रूनय दारुस्सलामआहे, जिथे शरियाकायदा लागू आहे. त्यांच्या राजधानीचे नाव मात्र पूर्व परंपरांचा आदर जपून ठेवल्याप्रमाणे श्री भगवान’ (Seri Begawan) आहे. पंधराव्या शतकापासून तिथे सत्तेवर असलेल्या घराण्यातील शासक सुलतानाच्या मृत्यूनंतर सदर श्री भगवानया पदाचा मानकरी होतो. संपूर्ण आग्नेय आशियाच्या हिंदू/बौद्ध इतिहास काळात राजा हा त्याच्या जीवंतपणी देवाचा (शिव/विष्णू/बुद्ध) अवतार असायचाच, पण मृत्यूनंतर त्याच्या नावे देवालयासमान स्मारक उभारून सदर गोष्टीवर शिक्कामोर्तब व्हायचे. ब्रूनयमधील उपरोल्लेखित परंपरा सदर सर्वसाधारण परंपरेशी सुसंगत आहेच, पण धर्माने पूर्णनिष्ठ (शरियासकट) मुसलमान झालेल्या देशामध्ये अशी परंपरा जीवंत असणे हे विशेष!
सागरी हद्दीत खनिज तेलाचा मोठा साठा गवसल्यामुळे हा देश जगातील अतिश्रीमंत देशांमध्ये गणला जातो. २०१२च्या
फोर्ब्ससर्वेक्षणानुसार तो पाचव्या क्रमांकाचा श्रीमंत होता. त्याला स्वातंत्र्य (ब्रिटिशांकडून) फार उशिरा (१९८४) मिळाले. आशियातील इतर वसाहतींमध्ये जसा कमी-जास्त संघर्षाचा सामना ब्रिटिश सत्ताधार्‍यांना करावा लागला, तसा इथे न झाल्यामुळे आणि त्यातच समृद्ध तेलसंपत्तीचा लळा’ (दुसर्‍या महायुद्धाचा खर्च भरून काढण्यासाठी बहुदा) लागल्यामुळे ब्रिटिशांना तो लवकर सोडता आला नसावा. भारत ब्रूनयच्या सर्वात मोठ्या तेल खरेदीदारांपैकी एक आहे. त्याचेही आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट सहकार्य आजपर्यंत लाभले आहे. त्यापैकी एक म्हणजे काश्मीर हा भारत-पाक संबंधातील द्विपक्षीय मामला आहे, हे त्याचे ठाम मत. दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१७ साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी जी निवडणूक झाली (भारताचे दलवीर भंडारी आणि प्रतिस्पर्धी ब्रिटिश ख्रिस्टोफर ग्रीनवूड यांच्यात), त्यामध्ये त्याने सुरुवातीचे लळाप्रभावित मत फिरवून भंडारींना दिले आणि जिंकवले. जाता जाता उल्लेखावी अशी बाब म्हणजे, आजच्या तारखेला ब्रूनयमध्ये डॉक्टरी पेशामध्ये बहुसंख्य भारतीय (नजीकच्या भूतकाळातील स्थलांतरित) मंडळी आहेत.ब्रूनयच्या ईशान्येला असलेल्या सात हजारांहून अधिक बेटांचा मालक असलेला देश म्हणजे फिलिपिन्स. सदर नाव त्याला त्याच्या ३०० वर्षांच्या स्पॅनिश वसाहतीच्या काळात तत्कालीन
फिलिप २या स्पेनच्या राजामुळे लाभले. या देशाच्या द्वीपसमूहांचे साधारण जे तीन भाग पडले आहेत, त्यापैकी मधला (आकारात तिसरा) भाग विजय’ (Visaya) म्हणून आजही ओळखला जातो. त्याची कथा अशी की, अकराव्या शतकात तामिळनाडूतील चोल राज्याच्या मलयाधिपती शैलेन्द्र साम्राज्याशी असलेल्या संबंधांत बिघाड झाला, ज्यामुळे चोल राजा राजेंद्रने आरमार घेऊन शैलेन्द्रांच्या श्रीविजय (आजच्या सुमात्रा बेटाचा भाग) या मांडलिक राज्यावर हल्ला करून ते ताब्यात घेतले. परिणामी तेथील योद्ध्यांनी पराजित प्रजानन म्हणून राहण्याचे अमान्य करून समुद्रमार्गे पूर्वेकडे स्थलांतर केले. त्यांनी व्यापलेल्या द्वीपसमूहाला त्यांच्या मूळ प्रदेशाची आठवण म्हणून विजयनाव पडले. तसे पाहिल्यास, या देशाच्या एकूण लोकसंख्येत मलय वंशाचे बाहुल्य नाही. परंतु, शेकडो वर्षांच्या आंतरवंशीय विवाह परंपरेमुळे मलय जनुकीय ठसाउमटलेला आहे.३०० वर्षांच्या स्पेनसारख्या कट्टर कॅथोलिक ख्रिश्चन राज्याच्या ताब्यातील भूभाग त्यांच्या धर्माच्या ताब्यात येणे ही एक अपरिहार्यता होती. अगोदरच्या शतकात दक्षिण अमेरिकेचा प्रचंड मोठा भूभाग बळकवताना (आजचे मेक्सिको
, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया इ. देश) ज्या भीषण प्रकारे त्यांनी स्वधर्माची पताका फडकवली होती, ते पाहता फिलिपिन्सच्या नशिबात आणखी वेगळे काही नव्हते. सदर प्रयत्नांत जरी ते उत्तरेचा लुझोन (मूळचा भिन्नवंशीय/धर्मीय) आणि मधला विजय (हिंदू/बौद्ध) ख्रिश्चन करते झाले तरी दक्षिणेच्या (मुस्लीम) मिन्दानावने मात्र त्यांना अखेरपर्यंत झुंझवले आणि यशस्वी होऊ दिले नाही. त्यांच्या सदर युद्धाला आठव्या शतकापासून खुद्द स्पेनच्या भूमीवर सुरू झालेल्या आणि पंधराव्या शतकात संपुष्टात आलेल्या धर्मयुद्धाची पार्श्वभूमी लाभली असल्यामुळे (ज्यात जिहादी मूरटोळ्यांनी तब्बल सात शतके इस्लामी सत्तेखाली ठेवलेल्या स्पेनला अपूर्व नरसंहाराद्वारे पुनश्च ख्रिस्ताच्या मार्गावर आणण्यात आले होते) जेमतेम अर्ध्या शतकाच्या विश्रांतीनंतरचा हा पुढचा अंक पूर्व आशियाई पटावर भयंकर त्वेषाने लढला जाऊ लागला.यात योगायोगाचा अजून एक भाग असा की
, इथले जिहादी योद्धे स्वत:ला मोरोम्हणवत, म्हणजे पुन्हा मूरच. दोन्ही बाजूचे लोक जेव्हा एकमेकांवर हल्ले चढवत, तेव्हा त्यांच्यात प्रचलित असलेल्या समान मान्यतेनुसार प्रतिस्पर्धी भागातून पकडलेल्या लोकांना गुलाम बनवत आणि त्यांचे धर्मपरिवर्तनही करत. असे एकूण पाव शतक चालल्यानंतर स्पेनने शेवटी कंटाळून आणि उर्वरित भागातून खजिना-भरतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी म्हणून माघार घेतली. लवकरच अमेरिकेने दक्षिण अमेरिकेतील स्पेनच्या अविरत खुमखुमीला प्रत्युत्तर म्हणून, त्यांच्या या आशियाई वसाहतीवर हल्ला चढवून ती पुढची ४५ वर्षे आपल्या ताब्यात ठेवली. फिलिपिन्स स्वतंत्र झाल्यानंतर (१९४६) जरी तो अधिकृतरीत्या लोकशाही देशम्हणून अस्तित्वात आला, तरी त्यात बहुसंख्य ख्रिश्चनांचे प्राबल्य असल्यामुळे त्यातून फुटून निघण्यासाठी मोरोवंशीय’ (Bangsa Moro) जिहादींनी परत एकदा कंबर कसली, ज्यात पुढे १९९१ साली अबू बकर अल बगदादी’ (ISIS) शी संलग्न असणार्‍या अबू सय्यफगटाची रक्तरंजित भर पडली आणि धर्मयुद्धसुरूच राहिले. फिलिपिन्स सरकारने गेल्या वर्षी ‘Moro National Liberation Front' या गटाशी करार केला, ज्याच्या अंतर्गत ‘Bangsa Moro Autonomous Region of Muslim Mindanao' या स्वायत्त प्रांताची निर्मिती करण्यात आली आणि या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. सदर कराराचे यश किंवा अन्य काही येणारा काळच ठरवू शकेल.फिलिपिन्सच्या भारताबरोबरच्या सामान्यत: सौहार्दपूर्ण असलेल्या संबंधांना २०१५ पासून कार्यरत झालेल्या
‘Act East Policy' अंतर्गत अधिक चालना मिळाली. त्या साली दोन्ही देशांनी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमसंमत केला. सदर कार्यक्रमांतर्गत तिकडून आलेल्या कलाकारांनी दिल्ली आणि कोलकात्यामध्ये २०१८ साली रामायणाचा प्रयोग सादर केला. तसेच २०१७ सालच्या पंतप्रधान मोदी यांच्या फिलिपिन्स भेटीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ फिलिपिन्समध्ये भारत अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. सदर विद्यापीठातील आशियन सेंटरचे प्रमुख गेल्या वर्षीच्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यात उपस्थित होते.आता आपण वळणार आहोत नावाने
पूर्व पूर्वअसलेल्या, इंडोनेशियन द्वीपकल्पाचा भाग असताना १९७५ पर्यंत पोर्तुगीज वसाहत असलेल्या, मात्र २००२ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या पौरोहित्याखाली स्वतंत्र देश म्हणून जगाच्या नकाशावर पदार्पण केलेल्या एका चिमुकल्या देशाकडे. या देशाच्या निर्मितीची कारणमीमांसा करतानासुद्धा प्रबळ धर्मप्रेरणा आणि प्रतिस्पर्धी धर्मानुयायांची परस्परविरुद्ध चढाओढ याच गोष्टी दृग्गोचर होतात. वसाहतिक शक्तींच्या साठमारीत आग्नेय आशियाच्या प्रांगणात सर्वप्रथम प्रवेश पोर्तुगिजांचा झाला होता. इंडोनेशियात डचांनी बाजी मारली आणि बहुसंख्य बेटे ताब्यात घेतली. मात्र, आग्नेयेला (ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला) तिमूर’ (इंडोनेशियन भाषेत अर्थ पूर्व दिशा) बेटावरच्यापूर्वेकडच्या अर्ध्या भागावर पोर्तुगिजांनी आपले निशाण लावून धरले होते. ते त्यांना अखेर १९७५ साली बेटाच्या स्वातंत्र्य-चळवळीमुळे काढून घ्यावे लागले (डचांनी आपल्या ताब्यातील इंडोनेशियाला १९४९ सालीच दिले होते). उर्वरित भारत १९४७ साली स्वतंत्र होऊनही गोवा मात्र पोर्तुगिजांनी पुढची १३ वर्षे पकडून ठेवला होता
, याची या संदर्भात आठवण येते. गोव्याच्या ४०० वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी तिथे कसे नृशंस धार्मिक अत्याचार केले आणि घाऊक पद्धतीने धर्मांतर घडविले याचीही आपल्याकडे नोंद आहे. स्पॅनिशांप्रमाणे पोर्तुगीजसुद्धा कट्टर कॅथोलिक ख्रिश्चन. स्थानिक तिमूर त्यांच्या काळात ९७ टक्के कॅथोलिक ख्रिश्चन आणि मिश्रवंशीय (म्हणजे पोर्तुगीज वडील, स्थानिक आई यांची संतती) राजकारणी यांचे वर्चस्व असलेला तिमोरन बनता तरच नवल. पोर्तुगीज निशाण हटताच अवघ्या नऊ दिवसांत इंडोनेशियाने भौगोलिक संलग्नता आणि नैसर्गिक न्यायतत्त्वाच्या आधारावर सदर भाग ताब्यात घेतला आणि विलिनीकरणाची घोषणा केली.
पण
, या खेळात नवख्या असलेल्या इंडोनेशियाला दोन गोष्टींची कल्पना नव्हती - आंतरराष्ट्रीय राजकारणाची सूत्रे हलवण्यामधील युरोपीय सत्तांचे मुरलेपण आणि तिमोरच्या भुसभुशीत जमिनीत काळजीपूर्वक रुजवल्या गेलेल्या धर्मबीजाचा डवरलेला वटवृक्ष. या दोन गोष्टींनी पुढची २५ वर्षे इंडोनेशियाला नाचवले, जागतिक पातळीवर बदनाम केले आणि अंतिमत: बिनशर्त माघार घेण्यास भाग पाडले, आणि मग तिमोर-लेस्त (Leste, पोर्तुगीज भाषेत पूर्व’) २००२ साली जगात अवतरला. मधल्या पद्धतशीर पायाभरणीच्याकाळात स्वतंत्र होऊ घातलेल्या या भागाच्या मिश्रवंशीय लोकनेत्याला (Jose Ramos-Horta) आणि कथोलिक चर्चच्या बिशपला (Carlos Filipe Ximenes Belo) १९९६ चा नोबेल शांतता पुरस्कारही संयुक्तपणे देण्यात आला. अशा तर्‍हेने पोर्तुगिजांनी नव्या काळाच्या नव्या परिभाषेला साजेल अशा प्रकारे आपल्या पूर्व वसाहतीवरचे नियंत्रण राखले. या नवस्वतंत्र देशाच्या घटनेमध्येच, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील कॅथोलिक चर्चच्या योगदानाचा उल्लेख येतो, यातच सर्व काही आले. हा देश अस्तित्वात येण्यापूर्वी भारताचा पाठिंबा तात्त्विकदृष्ट्या इंडोनेशियन विलिनीकरणाच्या भूमिकेला होता. मात्र, त्यानंतर आपले त्यात कोणतेही हितसंबंध गुंतलेले नसल्यामुळे आपण तो तिमोर-लेस्तउर्फ पूर्व पूर्वला कोणताही पूर्वग्रह आड येऊ न देता बहाल केला.


- पुलिंद सामंत

(लेखक हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक असून सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न अभ्यास केंद्रात पीएच.डी संशोधनात कार्यरत आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.