
मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. सरकारतर्फे कोरोनाशी लढण्यासाठी सर्वोतोपरी मदत कार्य केले जात असताना बॉलीवूड सितारेही या लढ्यात कुठे मागे नाहीत. अभिनेता अक्षय कुमारने कोरोनाशी लढा देताना भरभरून मदत केली मात्र, शुक्रवारी त्याने या युद्धात उतरलेल्या डॉक्टर आणि सैनिकांना एका गाण्याच्या माध्यमातून अभिवादन केले आहे.
अक्षय कुमार आणि करन जोहरने या गाण्याची निर्मिती करत गाण्याची पुर्नरचना केली आहे. गाण्याच्या माध्यमातून त्यानी कोरोनाशी लढा देणारे योद्धे म्हणजे डॉक्टरांना अभिवादन केले आहे. मनोज मुंतशिर यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत बी प्राक याने गायले आहे. केसरी सिनेमातील हे गीत यापूर्वीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मात्र, कोरोनारुपी राक्षसाशी लढणाऱ्या डॉक्टरांना हे नवे गाणे समर्पित केल्याने याला तूफान प्रतिसाद मिळत आहे.
अक्षय कुमारने सोशल मीडियाद्वरे हे गाणे शेअर करत देशभरातील डॉक्टरांना धन्यवाद दिले आहेत. अक्षय म्हणाला, "ऐकलं होतं डॉक्टर हे देवाचे रुप असतात. कोरोना विषाणूच्य लढाईत देवाला पाहीलं सुद्धा", अशी भावूक प्रतिक्रीया त्याने दिली आहे. 'सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ..', असे म्हणत डॉक्टरांची तुलना सैनिकांशी केली आहे. हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड भावूक करणारे आहे.