‘जबरा फॅन’कडून सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

    दिनांक  24-Apr-2020 16:08:15
|
abhishek_1  H x

सचिनप्रेमी अभिषेक साटमने तयार केले ‘पूल शॉटचे मोझॅक आर्ट’ 


मुंबई : क्रिकेटच्या देवाचा म्हणजेच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज ४७ वाढदिवस. क्रिकेट विश्वात सचिनचे लाखो चाहते दरवर्षी हा दिवस अतिशय धुमधडाक्यात साजरा करतात. निवृत्तीनंतरही सचिनच्या या चाहत्यांमध्ये तसूभरही कमी झालेली नाही. मुंबईचा अभिषेक साटमही सचिनचा ‘जबरा फॅन’ आहे. दरवर्षी तो सचिनचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो.

सचिनच्या वाढदिवसाची तयारी अभिषेक अगदी महिना दोन महिने आधीच सुरु करतो. मात्र यंदाच्या वर्षी जगावर आलेल्या या कोरोना संकटामुळे हा वाढदिवस कसा साजरा करायचा असा प्रश्न त्याला पडला होता. मात्र यावरही उपाय शोभून काढत त्याने शक्कल लढवली. सचिनच्या प्रसिद्ध ‘पूल शॉट’चे मोझॅक आर्ट त्याने घरात साकारले आणि यातून त्याने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अर्ध्या इंचाचे ९ हजार ६३६ चौकोनाचा वापरून त्याने ही कलाकृती साकारली आहे. यामध्ये बॉलच्या जागी कोरोना विषाणू दाखवण्यात आला आहे. सचिनच जसे क्रिकेटच्या मैदानात बॉलर्सची धुलाई करतो, तशी आपल्याला कोरोनाशी लढाई करायची आहे, असा संदेश यातून देण्यात आला आहे. ‘फाईट अगेंस्ट कोरोना’ असे या संपूर्ण थीमचे नाव असून ५.६ बाय ३ फूटाचे हे पोट्रेट आहे. हे पोट्रेट पूर्ण करण्यासाठी अभिषेकला तब्बल १५ तास लागले.

वयाच्या १० व्या वर्षापासून अभिषेक सचिनशी निगडीत सगळ्या गोष्टींचे कलेक्शन करतो आहे. गेल्या २० वर्षांपासून सचिनबद्दलची ८० पुस्तक, २५० मॅग्झिन, २० वर्षांतील वर्तमानपत्र तसेच वेगवेगळ्या वस्तूंचे कलेक्शन अभिषेकच्या घरी आहे. २०१७ साली सचिनच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त अभिषेकने ४४ बाय २४ फुटाची रांगोळी साकारली होती. २०१८ ला ५० बाय ३० फुटाचं पतंगाचे कागद वापरुन सचिनचे पोट्रेट बनवले. गेल्यावर्षी २०१९ ला ४६ बाय २४ फुटांचे टेलरिंग मटेरियल वापरुन सचिनचे पोट्रेट बनवले. अभिषेकच्या या तिन्ही कलाकृतींची ‘इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. २०१७ आणि २०१८ चे दोन्ही रेकॉर्ड हे त्या त्या वर्षाच्या टॉप १०० रेकॉर्डमध्ये नोंद झाले आहेत. २०२३ ला सचिनचा ५० वाढदिवस आहे. गेली २० वर्ष जमवलेल्या या कलेक्शनचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन भरवावे आणि त्याचे उद्घाटन खुद्द सचिनच्या हस्ते व्हावे, अशी अभिषेकची इच्छा आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.