शहापूरमध्ये लावा पक्ष्यांची शिकार

23 Apr 2020 11:36:17

 bird_1  H x W:

 
 
वन विभागाकडून शिकारी अटकेत
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - वन विभागाने शहापूर तालुक्यातून बुधवारी लावा पक्ष्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून चार मृत लावा पक्षी आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. प्रसंगी आरोपींनी जंगलात वणवा लावल्याचेही शक्यता आहे. वनाअधिकारी आरोपींची चौकशी करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 

bird_1  H x W:  
 
 
लाॅगडाऊनच्या काळात वन्यजीव गुन्हांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वन्यजीव शिकारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बुधवारी शहापूर तालुक्यामधील उंबरखांड गावामधून पक्ष्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. उंबरखांड वनपरिक्षेत्रामध्ये गस्तीवर असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना येथील जंगलात वणवा लागल्याचे दिसले. लागलीच त्यांनी त्या जागेच्या दिशेने धाव घेतली. जागेवर पोहोचल्यानंतर वनकर्मचाऱ्यांना तिथे चार ते पाच माणसांचा वावर दिसला. चौकशी करण्यासाठी त्या माणसांना बोलावले असता त्यांनी तिथून पळ काढला. वनकर्मचाऱ्यांनी त्यामधील तीघांना पकडून त्यांच्याजवळील सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडील पिशवीमध्ये चार मृत लावा पक्षी आणि शिकारीचे साहित्य आढळून आले.
 
 
 
 
 
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी हे पक्षी बेचकीच्या साहाय्याने खाण्यासाठी मारल्याची कबुली दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. या आरोपींनी जंगलात वणवा लावल्याची शक्यता असून त्यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. त्यांच्यावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींमध्ये चंदन सोमा कामडी (वय ३५), भाऊ सोमा कामडी (वय २५) आणि मनोज बालाराम जाधव (वय १४ ) यांचा समावेश आहे. यामधील अल्पवयीन आरोपीला सोडण्यात आले आहे. ही कारवाई वनाधिकारी योगेश पाटील, पन्नेलाल बेलडार, रुपेश देशमुख आणि गणेश भोये यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
Powered By Sangraha 9.0