मालेगावात जमावाचे दुष्कृत्य : पोलिसांवर हल्याचा प्रयत्न

    दिनांक  23-Apr-2020 15:05:15
|
Malegaon _1  H
 

 

 
 
नाशिक : एमआयएमच्या आमदारामार्फत वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, रुग्ण दगावल्याने रूग्णालयाची तोडफोड, रुग्णवाहिका चालकास मारहाण व त्याच्या अंगावर थुंकणे अशा एकामागे एक घडणाऱ्या घटना. आणि कोरोनाचे वाढणारे रुग्ण यामुळे मालेगाव चर्चेचा विषय ठरत आहे. तर, आता थेट पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रकार मालेगावात काल दि. २३ रोजी सकाळी घडला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
 
 
मालेगावमधील अडचणीचे परिसर करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे सील करण्यात आले आहेत. याठिकाणी राहणाऱ्या जमावाने काल दि. २३ रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास पूर्व व पश्चिम भागास जोडणारा संगमेश्वर काट्या हनुमान मंदिरालगत मोसम नदीवरील अलाम्मा इक्बाल पुलावर पोलिसांनी लावलेली बॅरीकेटिंग तोडून शहरात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडण्याचा प्रकार घडला. घटनास्थळी वेळीच पोलीस कुमक दाखल झाल्यामुळे जमावाने धूम ठोकली. यावेळी जमावाने तेथे असणार्या खुर्च्या फेकत आपले उन्मादी वर्तन दाखवून दिले.
 
 
 
अधिक माहिती अशी की, मालेगाव मध्य विधानसभेचा मतदार संघ असलेल्या भागात लहान मोठी गल्लीबोळ आहेत. याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर एक-एक करत २० पेक्षा अधिक अटकाव क्षेत्र जाहीर करण्यात आले असून करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी परिसर सील केला आहे. मात्र याठिकाणी जीवनावश्यक वस्तू तसेच औषधे या भागात मिळत नाहीत, झोपडपट्टीतील नागरिकांचे हाल होत आहेत. पोलीस सीमा पार करू देत नाहीत केल्यास मारहाण होते या कारणावरून हा जमाव संतप्त झाला होता. यामुळे या जमावाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, या अधिकाऱ्यांनी पोलीस कुमक घेत घटनास्थळी धाव घेतली.
  
 
 
दरम्यान , करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या भागात सील करण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी परिसर सील करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. नागरिकांनी घरातच थांबावे अशी सूचना देण्यात आल्या नंतर परिसर निर्मनुष्य करण्यात आला.
 
 
 
पोलिसांवर दगडफेक व कुठलाही हल्ल्याचा प्रयत्न नाही : चव्हाण
 
काही तरुणांनी अल्लम्मा इकबाल पुलावर धाव घेत लावलेल्या बॅरीकेटिंग तोडत गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, घटनास्थळी तत्काळ पोलिसांनी धाव घेतल्याने जमावाने पळ काढला, यावेळी दगडफेक वा हल्ल्याचा कुठलाही प्रकार घडला नाही असे स्पष्टीकरण पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले. या घटनेवरून पोलिसांवर हल्ला आणि दगडफेक झाल्याच्या अफवा पसरवू नये असे आवाहनदेखील चव्हाण यांनी केले आहे.
 
 
कारवाई होणार का ?
 
 
पोलिसांवर अंदाजे १०० जणांच्या जमावाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडियो समोर आला आहे. बुधवारी लॉकडाऊन दरम्यान बुधवारी सकाळी पोलिसांनी एका युवकाला हटकले. त्याला काठी मारून परत पाठवल्याने संतप्त झालेल्या जमावाकडून मालेगाव शहरातील अय्युबी चौकात पोलिस केंद्रावर तोडफोड झाली. यावेळी अतिशय जलदगतीने तेथे राज्य राखीव दलाचे जवान दाखल झाले आणि परिस्थितीती नियंत्रणाखाली आली. मात्र, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच पोलीस बंदोबस्त तोडल्या प्रकरणी कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.