उपकार जाणणारा मजूर वर्ग

23 Apr 2020 21:56:14
Sikkar School _1 &nb
 
 
 
 
सध्या ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वत्र सगळे काही बंद आहे. अशा वेळी सर्वात जास्त समस्यांचा सामना मजूर वर्गास करावा लागत आहे. हाताला काम नसल्याने या वर्गाला दिवसाची भ्रांत सतावत आहे. अशावेळी आपली मूळगावी जाण्यासाठी काही मजुरांनी पायपीट करत स्थलांतरणाचा मार्ग अनुसरला असल्याचे वृत्त अनेकदा समोर आले. मजुरांचे होणारे हे स्थलांतरण हे कोरोना संसर्ग होण्याच्या दृष्टीने जसे घातक आहे. तसेच, मानवतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याच जाणिवेतून अशा मजुरांसाठी तात्पुरती निवारा केंद्र स्थापन करण्यात आली. या निवारा केंद्रात हैदोस घालतानाचे चित्र काही ठिकाणी दिसून येत असले तरी राजस्थानातील पलसाना गावातील निवारा केंद्रात असणारे मजूर मात्र आपल्यावरील उपकाराचे पांग फेडताना दिसून येत आहेत. राजस्थानमधील सिकर या गावात आश्रयास असणार्‍या या मजुरांनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत आपण राहत असलेली शाळा रंगवून देण्याचे काम हाती घेतले आहे. मागील नऊ वर्षांपासून शाळेला रंग देण्यात आला नव्हता. ही बाब येथे वास्तव्यास असलेल्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी गावाच्या सरपंचांकडे शाळेला रंग देण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आणि पाहता पाहता त्यांनी संपूर्ण शाळा रंगवून टाकली. यासाठी या मजुरांना देण्यात आलेली मजुरीदेखील त्यांनी नाकारली. एकीकडे आसरा मिळालेल्या ठिकाणी जुगार खेळत त्यास जुगार अड्ड्याचे स्वरूप देणे, विनाकारण रस्त्यावर येत शासकीय यंत्रणेचा ताण वाढविणे असे प्रकार तुलनेने शिक्षित आणि समज असणार्‍या शहरात होताना दिसत आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या रूपाने ग्रामीण भागातील आशादायक चित्र समोर येत आहे. अतिथी म्हणून गेल्यावरदेखील आपण कोणासाठी जड होऊ नये, अशी शिकवण आपली आहे. अशावेळी ज्याने संकटसमयी आसरा दिला, त्याचे पांग फेडत या मजुरांनी एक आदर्शच समाजासमोर उभा केला आहे. त्याचबरोबर ‘लॉकडाऊन’च्या काळात एकटेपणा जाणवणे, मन न रमणे आदींसारख्या मानसिक समस्यांनी ग्रस्त नागरिकांसाठी हे मजूर एक आदर्शच आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
 

नाशिक ‘कोरोना’चे ‘एक्झिट वे’

 
 
नाशिक जिल्ह्यातील दुसरा, तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या कोरोना रुग्णाला संपूर्णत: बरे करण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. एरवी जिल्हा रुग्णालयाच्या नावाने नाके मुरडणारी काही मंडळी समाजात सहज दिसून येतात. मात्र, कोरोना या रोगाच्या साथीच्या काळात जिल्हा रुग्णालय हे जिल्हावासीयांसाठी आधार म्हणूनच पुढे आले आहे, असे दिसून येते. या कठीण काळात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा रुग्णालयाचा समस्त कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स यांचे महत्त्व हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील दुसरा, तर महानगरपालिका क्षेत्रातील पहिला रुग्ण कोरोनामुक्त झाला, हे आरोग्य यंत्रणेचे यश पाहून प्रत्येक रुग्ण कोरोनामुक्त होऊन ‘नाशिक ठरेल कोरोनाचे ‘एक्झिट वे’ असा आशावाद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मालेगावच्या रूपाने भीषण स्थिती समोर येत असताना जिल्ह्याच्या मुख्यालयात असे रुग्ण बरे होणे हे जिल्ह्यासाठी निश्चितच आशादायी चित्र आहे. गोविंद नगर येथील हा रुग्ण दिल्ली येथे जाऊन आला असल्याने असल्याने 4 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्या घशातील स्रावाची चाचणी केल्यानंतर 6 एप्रिल रोजी त्याचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला होता. हा महानगरपालिका क्षेत्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ठरला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करून त्याला कोरोनामुक्त केले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा चमू, परिचारिका, वॉर्ड बॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी वर्गाने याबाबत घेतलेली मेहनत हा शहरात आज कौतुकाचा विषय ठरत आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, नाशिक शहरासह मालेगाव येथे उपचार घेत असलेले सर्व कोरोना रुग्णही या रुग्णाप्रमाणेच लवकर बरे व्हावेत, यासाठी हे कर्मचारी झटत आहेत. एका बाजूला आरोग्य कर्मचारी यांच्या प्रामाणिक कार्याला यशाचे फळ मिळत असताना मालेगावसारख्या ठिकाणी रुग्णालये, पोलीस यांच्यावर होणारे हल्ले हा निश्चितच चिंतनाचा विषय ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0