मोदींचे टेलिफोन...

    दिनांक  23-Apr-2020 22:08:55
|
Narendra Modi _1 &nbजगभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना भारत शीर्षनेतृत्वात स्थान मिळवतो आहे. “नरेंद्र मोदी काय करतात, फक्त टाळ्या वाजवायला सांगतात, दीपप्रज्वलन करायला सांगतात. मात्र, काम कोण करणार?” इत्यादी मुद्दे अनेक अंधविरोधक मांडू लागले आहेत. नरेंद्र मोदींच्या यशाकडे लक्ष वेधू इच्छिणार्‍यांना थेट ’अंध’ म्हणून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली असते. त्यामुळे नरेंद्र मोदींचे काम व त्या अनुषंगाने गुणदोषविवेचन करण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. त्याऐवजी प्रत्येक मोदीविरोधकाला डोक्यावर घेऊन नाचण्याचे काम ही भुतावळ करीत असते.
 
 
विश्वविख्यात उद्योजक बिल गेट्स यांनीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या संकटकाळात देशाला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे बिल गेट्स यांचे मत आहे. त्यावर ’जगातील बेस्ट(?)मुख्यमंत्र्यांनी’ जरा यातून धडा घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होत असताना, शाब्दिक कोट्या करीत राज्यपाल कोट्यातून स्वतःच्या आमदारकीची सोय लावण्यात मुख्यमंत्री व्यस्त आहेत. नरेंद्र मोदींचे होणारे कौतुक व देशाची उंचावणारी प्रतिष्ठा, हा प्रतिमानिर्मितीतून साध्य झालेले नाही. किंबहुना, याकरिता प्रायोजित ट्विटर कॅम्पेन कोणीही चालवलेले नाही. नरेंद्र मोदी गेले महिनाभर साधत असलेल्या संवादाचा हा परिणाम आहे. यशस्वी परराष्ट्र धोरणाचे हे यश आहे.
 
 
नरेंद्र मोदींनी गेले महिनाभरात साधारणतः ३५ हून अधिक देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे. अनेक देशांनी भारताला धन्यवाद देणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. १५ मार्च २०२० रोजी सार्क देशांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला होता. त्यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी भारताच्या वतीने मोदींनी संवाद साधला होता. लगोलग इस्रायलच्या पंतप्रधानांशी मोदींचे बोलणे झाले होते. आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनीदेखील भारताला धन्यवाद देणारा फोन केला होता. १७ मार्च रोजी सौदी अरेबियाच्या राजपुत्राशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला.
 
 
विशेष म्हणजे, मोदींनी ‘सार्क’ देशांसोबत जशी एकत्रित व्हिडिओ कॉन्फरन्स करण्याचा प्रयोग केला, तसाच प्रयोग ‘जी-२०’ समूहाने केला पाहिजे, या आग्रहावर सौदीच्या वतीने सहमती दर्शविण्यात आली. ‘सार्क’ देशांमध्ये समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावणारे नरेंद्र मोदी ‘जी-२०’ साठीही प्रयत्नशील होते, ही उल्लेखनीय बाब आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसोबत मोदींनी संवाद साधला. त्यातही ‘जी-२०’ समूहात असे एकत्रित प्रयत्न करण्यावर भर होता. २५ मार्च रोजी रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्याशी मोदींनी बातचित केली. रशियात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची नरेंद्र मोदींनी चौकशी केली होती. कोरोनाच्या संकटसमयी रशियाकडून अनिवासी भारतीयांना अनेक दिवस आसरा देण्यात आला आहे. त्याबद्दल नरेंद्र मोदींनी रशियाचे आभारही मानले. कतारच्या प्रमुखांशी मोदींनी संवाद साधला होता.
 
 
त्यानंतर अबुदाबीच्या राजपुत्राशी मोदींचा फोन झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. नरेंद्र मोदींनी आशियाई देश प्रामुख्याने निवडले असले तरीही भीषण आपत्ती आलेल्या फ्रान्ससोबतही भारताचे बोलणे झाले होते. नरेंद्र मोदींच्या संपर्कमोहिमेत जर्मनी, स्पेन हे देशसुद्धा होते. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संवादात जागतिकीकरणाचे नवे आयाम निश्चित करण्याची गरज मोदींनी व्यक्त केली होती. स्वीडन, ऑस्ट्रेलिया, ओमान, द. कोरिया, युगांडा, जपान, नेपाळ, व्हिएतनाम, जॉर्डन, भूतान, इजिप्त, दक्षिण आफ्रिका या देशांसोबतसुद्धा नरेंद्र मोदींनी यशस्वी संवाद साधला आहे.
 
 
नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘फोन कॉल्स’चे विश्लेषण केल्यावर अनेक बाबी समोर येतात. म्हणजे विकसनशील देशांना मदतीचे आश्वासन द्यायला नरेंद्र मोदी विसरत नाहीत. तसेच या देशांच्या त्यानंतर आलेल्या समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया पाहिल्या तर भारताविषयीचे त्यांचे दृष्टिकोनही स्पष्ट होतात. ‘सार्क’ देशांमध्ये एकत्रित समन्वयाची भूमिका बजावणार्‍या भारताने ‘जी-२०’च्या समन्वयासाठीही पुढाकार घेतला, हे स्पष्ट होतं. भारताविषयीचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी अशा प्रयत्नांची आवश्यकता असते. पंतप्रधान यशस्वीपणे ती जबाबदारी पार पाडत आहेत.
 
  
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.