शिक्षण क्षेत्रातील ई-क्रांती!

23 Apr 2020 14:18:54
File pic _1  H
 
 
इंग्रजांशी वर्षानुवर्षे लढा देत भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षे होत आली, पण अजूनही उत्तम दर्जाच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. सामान्य माणसाचा लढा त्याच्या मुलांच्या शाळेच्या प्रवेशासाठी, उच्च शिक्षणासाठी अजूनही सुरु आहे.
 
 
अगदी बालवर्गाच्या प्रवेशासाठी रात्रभर शाळेबाहेर रांगा, मंत्र्यांचे शिफारस पत्र, डोनेशनची खैरात ही तर आता अतिशय सामान्य बाब. बरं, एवढं सगळं करून प्रवेश मिळेलच याची खात्री नाही. प्रवेश मिळाल्यावर शिक्षक कसे असतील माहीत नाही आणि त्याहून पलीकडे आपल्याकडील शिक्षणाचा दर्जा ज्याला व्यावसायिकतेची जोड म्हणजे अजूनही प्रश्नचिन्हच आहे.
 
 
येऊ घातलेली जागतिक मंदी आणि त्याला कोरोनाची साथ लाभल्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी क्रांतिकारक वेळ येऊन ठेपली आहे. कित्येक विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, नियमित वर्ग भरत आहेत अर्थातच ऑनलाईन. आपापल्या घरातूनच शिक्षक-विद्यार्थ्यांची शाळा एक वेगळा आकार घेऊ पाहत आहे. यामुळे भविष्यातदेखील या तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर होईल. सुरुवातीला आठवड्यातून किमान दोन दिवस शाळा ऑनलाईन होऊ शकते आणि नंतर कदाचित आठवड्यातून दोन दिवसच विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागेल. यात कोणतेही नुकसान दिसत नाहीये.
 
 
प्रत्येक वर्गात साधारण १० टक्के विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात, शिक्षकांना प्रश्न विचारतात, ती सुविधा ऑनलाईन माध्यमातूनदेखील शक्य आहे. यामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांवरील खर्च कमी होतील. आठवड्यातून दोन वेळेसच जर शाळा भरणार असेल तर एक शाळा इतर दोन शाळांना सामावून घेऊ शकले ज्यामुळे पायाभूत सुविधांवरील खर्च विभागाला जाईल आणि शाळेचे शुल्क, गणवेशावरील खर्च, बसचे शुल्क कमी होण्यास मदत होईल. दोन-चार शाळा एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, आधुनिक संगणक प्रणाली उभारू शकतील.
 
 
शिक्षकदेखील ऑनलाईन शिकवू लागल्याने ज्यांच्याकडे उत्तम अनुभव आणि दर्जा आहे, त्यांना देशभरातून मागणी मिळेल आणि त्यांना त्यांच्या कौशल्याचा आर्थिक फायदादेखील होईल. शाळा व महाविद्यालयातील अवाढव्य वाचनालये, त्यांच्या इमारती, कपाटे, हजारो पुस्तके यांच्या जागी सहज उपलब्ध होणारी, बोलकी ई -पुस्तके उपलब्ध होऊ शकतात. या सगळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणारे खर्च जेणेकरून पालकांना तो खर्च परवडेल, शाळांची प्रवेश क्षमता वाढेल आणि ज्या चांगल्या शिक्षण संस्था केवळ आर्थिक टंचाईमुळे मागे पडल्या आहेत, त्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे पुन्हा पुढे येऊ शकतील.
 
 
हा सगळा बदल एका रात्रीतून नक्कीच होणार नाही आणि आपोआपदेखील होणार नाही. हा बदल घडवण्यासाठी ही एक उत्तम संधी चालून आली आहे, ज्यामुळे देशाचं कल्याण होऊ शकेल, अगदी खेड्यात बसलेला मुलगादेखील चांगलं शिक्षण कमी पैशांमध्ये प्राप्त करू शकेल, विद्यार्थी पालकांच्या डोळ्यांसमोर घरीच आणि अधिक सुरक्षित असतील. हा बदल पालकांनी आणि शाळांनीदेखील स्वीकारायला हवा.
 
 
या शैक्षणिक क्रांतीतून निर्माण होणार्‍या संधी म्हणजे शाळांना तांत्रिक सुविधा पुरविणे, शाळेच्या पायाभूत सुविधांचा इतर व्यवसायासाठी कसा वापर होऊ शकतो हे शोधणे, ऑनलाईन लेक्चर्स घेतल्यामुळे ज्याच्याकडे बराच वेळ असेल अशा शिक्षकांसाठी संधी निर्माण करणे आणि पालकांच्या वाचलेल्या शुल्काचा खर्च विद्यार्थ्यांना इतर कोणतं प्रशिक्षण देऊन तुमचा फायदा करून घेऊ शकता, हे शोधणे. म्हणजेच प्रत्येक संकट हे सोबत संधी घेऊन येतेच ते फक्त तुम्हाला ओळखून हेरता यायला हवं. हे सगळं करताना शिक्षणाला व्यावसायिकतेची, नीतिमूल्यांची जोड देऊन शिक्षणात ई-क्रांती घडवण्यात आपण सारे नक्कीच हातभार लावू शकतो. (क्रमशः)
 
 
- प्रसाद कुलकर्णी
Powered By Sangraha 9.0