मुंबई : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी जागोजागी सॅनिटायझेशन टनेल उभारण्यात आले आहेत. मात्र, या टनेलमध्ये फवारणीसाठी वापरली जाणाऱ्या रसायनांपैकी एक असलेले सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशनद्वारे निघणारे वायू हे डोळे आणि त्वचेसाठी हानिकारक असल्याचे मत रासायनिक क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकारांनी व्यक्त केले आहे. सध्याच्या घडीला स्वस्त आणि लगेचच उपलब्ध असणारे हे रसायनांची माणसांवर फवारणी करून स्वतःला आणखी एका संकटात ढकलत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही काही दिवसांपूर्वी अशाप्रकारचे सॅनिटायझेशन टनल्स उभारू नका, असा सल्ला जगभरातील देशांना दिला होता. अशाप्रकारे शरीरावर अल्कोहोल, क्लोरिन, लायझॉल याचा फवारा मारणे आरोग्यास हानीकारक आहे, तसेच या गोष्टींमुळे पूर्णपणे शरीर स्वच्छ होते यातही तथ्य नसल्याचे मतही नोंदवण्यात आले होते. रुग्णालयांबाहेरील टनेल त्वरीत हटवण्यात यावेत, असेही निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या पोलीस, रुग्णसेविका, आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अशाप्रकारे सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशनची फवारणी करणारी यंत्रणा उभी केलेली दिसते. त्यात प्रवेश केल्यावर डोळे उघडू नयेत, असाही सल्ला दिला जातो. मात्र, चुकूनही याचा तुषार किंवा थेंब डोळ्यांच्या पटलावर गेल्याच डोळे जाण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच एखाद्या रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमी असेल त्यालाही याचा प्रचंड त्रास होऊन दुसरा आजार उद्भवू शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
तुलनेने स्वस्त असलेल्या या रसायनाचा वापर सध्या राज्यभरात केला जात आहे, नागरिकांच्या शरीरावर फवारणी करणयासाठी या रसायनाचा वापर टाळावा आणि त्यासाठी पर्याय शोधावा, अशी मागणी आता केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मजूरांवर झालेल्या फवारणी करण्यात आली होती. त्यावेळीही तिथल्या मजूरांना डोळे चुरचूरण्याचा त्रास झाला होता.
ज्यावेळी या रसायनाची फवारणी केली जाते. त्यानंतर ठराविक तापमानात आपण बाहेर पडलो तर सोडियम हायपोक्लोराइट सोल्यूशनच्या रासायनिक प्रक्रीयेतून क्लोरीन बाहेर पडतो आणि हा वायू शरीराला धोकादायक आहे. त्यामुळे अशा टनेलचा वापर करू नये किंवा माणसांवर याची फवारणी करण्यात येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य सरकारच्या सूचना
सॅनिटेशन डोम अथवा टनेलचा वापर होताना दिसत आहे तथापि या वापरास कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे राज्य सरकारनेच स्पष्ट केले आहे. कुठल्याही व्यक्ती अथवा गटावर अशाप्रकारे जंतुरोधक रसायने फवारणे शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या हानीकारक आहे. कोविड१९ संसर्गित वातावरणातून आलेल्या व्यक्तीवर अशी रसायने फवारल्याने संसर्ग रोखता येतो, हे सिध्द करणारा कोणताही पुरावा नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
काय होतो परिणाम ?
क्लोरिन किंवा इतर काही रसायने शरीरावर फवारल्याने डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज येणे, काही वेळा मळमळल्यासारखे वाटणे अथवा उलटी होणे असे परिणाम होऊ शकतात. सोडियम हायपोक्लोराईट अभित्वचेद्वारे शोषले गेल्याने श्वास घेण्यास त्रास (Bronchospasm) होऊ शकतो. या प्रकारच्या उपायांमुळे सुरक्षेची खोटी भावना मनात निर्माण होऊन हात वारंवार धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग या महत्वाच्या आणि प्रभावी उपायांकडे दुर्लक्ष होऊ शकते.