कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

22 Apr 2020 17:26:24

company _1  H x




मुंबई 
: कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार अशा आशयाचा शासनासोबतच्या बैठकीचा हवाला देऊन सोशल मीडियावर व्हायरल निर्णयाचा महाराष्ट्राशी सूतराम संबंध नाही, असे स्पष्टीकरण आज महाराष्ट्र सरकारने दिले आहे. तसेच सोशलमिडीयावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही यावेळी राज्य सरकारने केले. माहिती व जनसंपर्क महासंचलनालयने पत्रकाद्वारे व अधिकृत ट्विटवरून ही माहिती दिली.







कामगाराला विषाणू लागण झाल्यास मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे शासनासमवेतच्या एका बैठकीत सांगण्यात आल्याची माहिती सोशल माध्यमे किंवा व्हॉटस्ॲपवरुन फाॅरवर्ड केली जात आहे. अशी बैठक महाराष्ट्रात झालेली नाही व त्या निर्णयाचा महाराष्ट्राशी सूतराम संबंध नाही. किंबहुना मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीनसुद्धा नाही. कोरोनाची कोणालाही लागण झाल्यास आरोग्य विभागामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. राज्यातील ज्या भागात कारखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे तेथील आस्थापनांनी सोशल डिस्टंसिन्ग आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.असे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.



फाॅरवर्ड केले जाणारे पत्रक हे अन्य राज्यातील एका औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीतील वृत्तांत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. पण ते महाराष्ट्रातील असल्याचे भासवून राज्यात प्रसारित करुन गैरसमज पसरविण्यात येत आहे. कारखाने सुरु केले आणि त्यातील कामगाराला कोरोने विषाणुची लागण झाल्यास मालकाविरुद्ध कारवाई येईल. महाराष्ट्रातील कोणत्याही औद्योगिक संघटनेच्या बैठकीमध्येही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. हे परिपत्रक फॉरवर्ड करु नये तसेच त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0