दिलासादायक बातमी : सीआयएसएफच्या ६ जवनांची कोरोनावर मात!

21 Apr 2020 15:17:59

CISF_1  H x W:


पनवेलमध्ये १० जण कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नवी मुंबई : राज्यभर कोरोनाचा कहर वाढत असताना, पनवेलमधून मोठी दिलासादायक बातमी आली आहे. पनवेल कोव्हिड उपजिल्हा रुग्णालयातील दहा कोरोना रुग्णांना पूर्ण उपचारानंतर आता घरी पाठवण्यात आले आहे. यामध्ये सीआयएसएफच्या सहा जवानांचा समावेश आहे. तर ३ जण उलवे आणि १ जण खारघरचा रहिवाशी आहे. या सर्व दहा जणांना आता काही दिवस घरातच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


या १० जणांची दुसरी कोरोना चाचणीदेखील निगेटिव्ह आल्याने या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे रुग्ण चार एप्रिलला रुग्णालयात दाखल झाले होते. तब्बल दहा जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने, पनवेल आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


या रुग्णांवर डॉक्टरांनी अतिशय मेहनतीने उपचार करुन त्यांना कोरोना मुक्त केले. उलवे, कळंबोली आणि खारघरच्या या दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे ४ एप्रिलला पनवेल तालुक्यातील १० रुग्ण कोरोनाबाधित आढळल्यानंतर, त्या सर्वांना पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांच्यावर मागील १६ दिवसात योग्य उपचार केल्यानंतर या सर्व १० जणांची कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आली.


रात्री उशिरा या सर्व १० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सर्व स्टाफने टाळ्या वाजवत निरोप दिला. एकूणच कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने पनवेलकरांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणता येईल.
Powered By Sangraha 9.0