
उपचारानंतर कोरोनाबाधित तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
उस्मानाबाद : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील तीन कोरोनाबाधित रुग्णाचे उपचारानंतरचे शेवटचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने आता उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे केवळ ३ रुग्ण होते. त्यापैकी सर्वच्या सर्व रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश आता ग्रीन झोन यादीत झाला आहे. गेल्या १९ दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात एकही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही. तर कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व ८५ नागरिकांची कोरोना चाचणीसुद्धा निगेटिव्ह आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बलसुर, धानोरी आणि उमरगा शहरात कोरोनाचे ३ रुग्ण २८ मार्च ते २ एप्रिल दरम्यान सापडले होते. त्यापैकी २ जण हे दिल्ली येथून आले होते. तर एक जण हा मुंबई येथील हॉटेल ताजमधून आला होता.
या कोरोनाबाधित रुग्णांवर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र ते बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उस्मानाबाद सारख्या दुर्गम भागात अल्पश्या वैद्यकीय सुविधा असतानाही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने कोरोनावर मात मिळवली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनाने राबविलेल्या लॉकडाऊन, रस्ते, हद्दबंदीसह उपाययोजनांचे नागरिकांनी समर्थन केले. प्रशासनाच्या सूचना आणि नियम पाळल्याने जिल्ह्याला आज हे यश प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांच्यासह वैद्यकीय, महसूल, पोलीस विभागातील अधिकारी कोरोना लढाईत हिरो ठरले आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियोजनाने आणि मेहनतीने कोरोना रुग्णांच्या संख्येवर अंकुश राहिला. अनेक संस्थांनी सामाजिक जबाबदारी सांभाळत अन्नधान्य वितरण केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या चाचणीचे २१ नमुने अहवाल प्रलंबित असून क्वारंनटाईन केलेल्या एक महिलेचा दम्याच्या आजाराने मृत्यू झाला. मात्र, तिचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेशातून उस्मानाबाद जिल्ह्यात आलेल्या सर्व नागरिकांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्तिथी नियंत्रणात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२६ कोरोना स्वॅबपैकी ३८२ रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.