ते साधू होते म्हणून!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2020
Total Views |


agralekh mob lynching pal


मरणारे भगवे वस्त्रधारी साधू होते म्हणून या लोकांची जिभ न्यायासाठी रेटणार नाहीच, म्हणूनच सर्वसामान्यांनीच आपला आवाज बुलंद करुन मृत साधुंना न्याय मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे! आपल्याला बळी गेलेल्यांना ते साधू होते म्हणून विसरुन चालणार नाही!



पालघर जिल्ह्यात गुरुवारी दोन साधू व वाहनचालकाची शेकडोंच्या जमावाकडून अतिशय निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. तद्नंतर साधारण तीन दिवसांनी या हत्येची चित्रफित मुक्त माध्यमांतून समोर येऊन सर्वत्र फिरु लागली. परंतु, ‘मारु नका, मारु नका’ म्हणून विनवणी करणारे साधू आणि अंगात हिंस्र श्वापदं घुसल्याच्या आवेशात लाठ्या-काठ्यांचे घाव घालणार्‍या हल्लेखोरांची चित्रफित इतकी क्लेशकारक आहे की, ती माणूस म्हणून आपल्याला बघवतही नाही. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा (माकप) राज्यातील एकमेव आमदार ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतो आणि सर्वात गरीब आमदार म्हणून प्रसारमाध्यमे ज्यांच्या आरत्या ओवाळण्यापासून थांबत नव्हत्या, त्यांच्याच भागात ही घटना घडली. हे सांगण्याचे कारण म्हणजे या प्रकरणात अटक केलेले आरोपीदेखील माकपचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला पाहिजे. संबंधित घटनेची चित्रफित पाहता, पोलिसांच्या उपस्थितीत साधुंची हत्या करण्यापर्यंत जमाव हिंसक का झाला आणि ‘आम्ही साधू आहोत,’ असे सांगूनही जमावाने त्यांची हत्या का केली, हे प्रश्न प्रथमतः उपस्थित होतात. मात्र, या प्रश्नांची उत्तरे ही कायदा-सुव्यवस्थेत नसून आपल्या दांभिक वैचारिक विश्वात दडलेली आहेत. साधुंची हत्या झाली तो सगळाच भाग डाव्यांच्या आणि वनवासींना ‘आदिवासी’ म्हणून त्यांच्या संघटना बांधणार्‍यांच्या प्रभावाखालचा आहे. तथापि, आताची हत्या ही या भागातील काही पहिलीच वा एकमेव घटना नसून असे याआधीही झालेले आहेच. परंतु, नुकताच घडलेला प्रकार इतका भीषण आहे की, त्याच्या तपशीलात जायला हवे.
 

अत्यंत निर्दयीपणे साधुंची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यासह देशभरात खळबळ माजली. मात्र, राज्य सरकारला जाग आली ती घटना घडून गेल्यानंतर चार दिवसांनी आणि ते ‘राजकारण करु नका’ असे म्हणू लागले! सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकीय गप्पांच्या माध्यमातून या हत्या प्रकरणावर तोंड उघडले व ते म्हणाले की, “निकट सहकार्‍याच्या अंत्यविधीसाठी जाणार्‍या साधुंना दादरा-नगर हवेलीत अडवून तिथेच रात्रभर ठेवून दुसर्‍या दिवशी राज्याकडे सोपवले असते, तर असे काही झाले नसते. मात्र, केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाने या साधुंना आसरा दिला नाही.” परंतु, मुख्यमंत्र्यांना दादरा-नगर हवेलीतून साधुंच्या प्रवासाचा प्रश्न पडत असेल, तर मग उद्धव ठाकरेंच्या अखत्यारितील प्रदेशातून म्हणजेच महाराष्ट्राच्या तालुक्यातून, जिल्ह्यांतून हे साधू पालघरपर्यंत कसे पोहोचले, हा प्रश्नही पडला पाहिजे आणि या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? प्रशासन की राज्य सरकार? तसेच मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की नाही, हादेखील एक प्रश्न आहे. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, “या घटनेचे राजकारण करु नका.” उद्धव ठाकरेंचे म्हणणे बरोबरच आहे, अशा दुर्दैवी व दुःखद घटनेचे राजकारण करायलाच नको, पण मग मुख्यमंत्र्यांनी यात केंद्रशासित प्रदेशाला का आणले? हे राजकारण नव्हे तर काय? ठाकरेंना यातून नेमके कोणाला दोषी ठरवायचे आहे किंवा कोणाकडे बोट दाखवायचे आहे, ते न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही. तरीही ‘राजकारण करु नका, राजकारण करु नका’चा जप ते स्वतःच करताना दिसतात! मुख्यमंत्री असेही म्हणाले की, “दोघा साधुंची व वाहनचालकाची हत्या गैरसमजुतीतून झाली.” उद्धव ठाकरेंचे हे विधान अतिशय हास्यास्पद आहेच, पण राज्यात नेमके काय घडते, हेही त्यांना कळत नसल्याचे द्योतक आहे. कारण, पालघर पोलिसांच्या जनसंपर्क अधिकार्‍यांकडून सदर घटनेबाबत एक प्रेसनोट जारी केली असून त्यातली माहिती मुख्यमंत्र्यांच्या विधानाला छेद देणारी आहे. सदर प्रेसनोटमध्ये ‘१ ते ५ व इतर ४०० ते ५०० इसमांनी गुन्ह्याचा कट रचून व गैरकायद्याची मंडळी जमवून’ हे कृत्य केले असे लिहिल्याचे धडधडीतपणे दिसते. म्हणजेच मुख्यमंत्री आणि पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये टोकाचा विरोधाभास आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही प्रेसनोट शनिवारी १८ एप्रिलला प्रसिद्धीस दिलेली आहे आणि मुख्यमंत्री त्यानंतर दोन दिवसांनी २० एप्रिलला बोलले. दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना हे प्रकरण नेमके काय हेही समजले नाही का? मुख्यमंत्र्यांच्या अशाप्रकारच्या वक्तव्याचा पुढील तपासावर विपरित परिणाम होणार नाही का? मुख्यमंत्री व पोलिसांकडील माहितीत इतकी तफावत व विरोधाभास असेल, तर सर्वसामान्यांनी नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर? हे प्रश्न इथे उपस्थित होतात. राज्याचे कारभारी म्हणून त्यांची उत्तरे देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच येते, हेही त्यांनी लक्षात ठेवावे.
 
आपल्या फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरेंनी सदर हत्येचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही, असेही सांगितले. परंतु, पाचही प्रमुख हल्लेखोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असून त्यांची विचारधारा हिंदू व हिंदू धर्मविरोधी असल्याचे अनेकदा सिद्ध झालेले आहे. चोर असल्याच्या संशयावरुन हल्ला केला असेल, तर पोलिसांनी साधुंना ताब्यात घेतल्यानंतरही हा जमाव इतका संतप्त का होता? दोन्ही साधुंना पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेऊन मारण्यात आले आणि म्हणूनच हा प्रकार चोरीच्या संशयापुरता मर्यादित आहे का, असे प्रश्नही निर्माण होतात. कारण, माकपाचे राज्यातले एकमेव आमदार त्या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत. तसेच इथे असे प्रकार अनेकदा घडलेले आहेत आणि हे पोलीस, राज्य सरकारला माहिती असूनही त्या भागाविषयी इतका निष्काळजीपणा प्रशासन का दाखवत होते, हाही एक मुद्दा आहेच. मुख्यमंत्र्यांच्या भाषेत जर हा प्रश्न धर्माचा नसेल तर मग तो कायदा-व्यवस्थेचा नक्कीच असला पाहिजे आणि त्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असणार! मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार आहेत? साधुंना न्याय मिळावा, म्हणून कोणती पावले उचलणार आहेत? हल्लेखोरांची झुंड व झुंडीशी संबंधितांवर कोणती कारवाई करणार आहेत? हेही त्यांनी सांगावे. आणखी एक मुद्दा म्हणजे, साधुंच्या हत्येची घटना घडूनही देशातील प्रतिष्ठित लोकशाहीवादी, मानवाधिकारवादी कंपूने तोंडातून चकार शब्दही काढलेला नाही. अखलाख किंवा पहलू खानसाठी थयथयाट करणारे अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, जावेद अख्तर, नसिरुद्दीन शहा, अनुभव सिन्हा वगैरे बुजगावणे साधुंच्या हत्याप्रकरणात मेणबत्त्या घेऊन उभे राहिलेले नाहीत. यावरुनच या सगळ्यांना फक्त विशिष्ट समुदायातील व्यक्तींवर हल्ला झाला तरच पान्हा फुटतो आणि इतरवेळी तो आटतो हेच स्पष्ट होते. इथे तर या सगळ्यांनाच डोळ्यांवर पट्टी बांधून, कानात बोळे कोंबून आणि तोंडाला कुलूप लावून बसणे भागच आहे, कारण मरणारे भगवे वस्त्रधारी साधू होते म्हणून! या लोकांची जिभ न्यायासाठी रेटणार नाहीच, म्हणूनच सर्वसामान्यांनीच आपला आवाज बुलंद करुन मृत साधुंना न्याय मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे! आपल्याला बळी गेलेल्यांना ते साधू होते म्हणून विसरुन चालणार नाही!

 

 
 
@@AUTHORINFO_V1@@