पुणे शहरात सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू

20 Apr 2020 11:46:33

pune_1  H x W:


पिंपरी-चिंचवड शहराच्याही सर्व सीमा बंद; 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषीत

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पूणे शहर सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस शहरात कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याठिकाणी फक्त जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.


पुणे महापालिका आयुक्तांनी रात्री उशिरा पत्र जारी करत हे आदेश दिले आहेत. रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील आदेश मिळेपर्यंत पुणे महापालिका हद्द सील करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख आपल्या भागांच्या हद्द सील करतील, असे आदेश देण्यात आले आहेत. तर या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.


पुणे महापालिका क्षेत्र हे संक्रमनशील म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या भागामध्ये फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, महापालिका आणि शासकीय सेवा सुरु राहतील, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात सांगितले आहे.


पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे कोणी उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.



कोरोना व्हायरस संक्रमीत रुग्णांची वाढती संख्या पाहता पिंपरी चिंचवड शहर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. यासोबतच शहराच्या सर्व सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १९ एप्रिलपासून शहराच्या सर्व सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0