स्पर्शसंसर्गाची विकृत भीती...

20 Apr 2020 22:45:47


corona epide_1  


स्पर्शसंसर्गाची भीती आपल्या मनात संचारते आहे नि जितकी विधायक राहायला हवी तितकी विधायक न राहता आता ती विकृत झाली आहे. आपली नैतिक सूज्ञता नष्ट झाली आहे. आपली विवेकनिष्ठ विचारपद्धती व सद्सद्विवेकबुद्धी कोरोनाच्या लाटेत वाहून गेली आहे. आपण मनाला आवर घालायला पाहिजे.



आज कोरोनाच्या भीषण परिस्थितीत जगात सर्वत्र उत्पाद आणि उन्माद माजला आहे. जितकी भीती मृत्यूची आणि यातनांची आहे, तितकीच चिंता पुढे काय होईल, याचीही आहे. भावनांचा उद्रेक कसा आणि किती प्रमाणात होतो, याचं गणित आजपर्यंत कुठल्याच मानसशास्त्रज्ञाला मांडता आलेलं नाही. ‘लॉकडाऊन’ म्हणजे घर बंद, फिरणे बंद, जसजसा कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत चालला आणि त्याचा विळखा जगाला गुदमरून टाकायला लागला, तसतसे हळूहळू अनेक देशांनी ‘लॉकडाऊन’चा उपाय कोरोनाच्या ‘डेक्कन क्वीन’चा स्पीड कमी करण्यासाठी योजला. कोरोनाचा पहिला वावर चीन येथील वुहानमध्ये झाला आणि तोही २०१९च्या डिसेंबरमध्ये. यामुळे लाखो लोकांना कोरोना तर झालाच, पण कित्येकांचे जीवसुद्धा गेले. कोरोनाचा उद्रेक कमी करण्याच्या उद्देशांना ‘लॉकडाऊन’ केला जातो. ‘लॉकडाऊन’ हा आपत्कालीन ‘प्रोटोकॉल’ आहे. या काळात माणसं जिथे राहतात, त्या जागा म्हणजे त्यांची वस्तीची ठिकाणे त्यांनी सोडायची नसतात. पूर्ण ‘लॉकडाऊन’मध्ये लोकांनी त्यांच्या जागेत राहायलाच पाहिजे. आपला १३५ कोटी लोकांचा भलामोठा देश. हा देश पूर्ण ‘लॉकडाऊन’मध्ये गेला आहे.
 
 
‘लॉकडाऊन’चे कायदेशीर नियम आहेत आणि उगाचच इकडे-तिकडे बेजबाबदार भटकंती करणार्‍या लोकांवर पोलिसांनाही सक्तीचे बंधन घालावे लागत आहेत. अशा परिस्थितीत आपण केवळ शहराला नाही, राज्याला नाही, देशाला नाही, तर माणुसकीला लाजवेल अशी घटना पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे घडल्याचे वाचले. तिथे ‘मॉब लिचिंग’च्या घृणास्पद प्रकरणात त्र्यंबकेश्वर येथील दोन महंतांना ठार मारण्यात आले. या घटनेने पूर्ण देश हादरला, हळहळला. मुळात हे महंत आणि त्यांच्याबरोबर असणार्‍या चालकाला लोकांनी मुले चोरून नेणारी टोळी म्हणून जीवघेणी मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या गावात लोकांचा अलीकडे असा समज झाला आहे की, अवयव चोरण्यासाठी एक टोळी लहान मुलांचे अपहरण करते. त्यामुळे त्यांनी त्या गावात या चोरांना पकडण्यासाठी एक दक्षता समिती नेमली आहे. कुठल्याही अनोळखी माणसांना गावात पाहिले की, या गावच्या लोकांचा संशय बळावतो. जागरूकता कुठे तरी विरून जाते. जागरूकतेत संशय आलाच. पण, हा संशय विकृत आहे. यात सत्य आणि तथ्य किती आहे न पाहता या गावच्या लोकांनी या दोन महंतांना काहीही अपराध नसताना ठार मारून टाकले. ‘लॉकडाऊन’मध्ये असे कसे होऊ शकते? लोकांकडे इतकी हत्यारे आली कशी? याचे कारण त्यांच्या मनात आलेली प्रचंड असुरक्षिततेची भावना. कोणताही अपराध नसताना कुणाच्या अंतविधीसाठी जाणार्‍या महंतांची अशी दुर्दैवी, निर्घृण हत्या ‘लॉकडाऊन’च्या काळात होतेच कशी, याचा शास्त्रीय विचार करायला ही घटना भाग पाडते. याआधीही या भागात काही निर्दोष माणसांवर असेच अमानुष हल्ले झाले आहेत. कारण, हा जमाव ठार वेड्यासारखा वागत होता. उन्मत झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी जवळजवळ १००च्या आसपास लोकांना अटक केली गेली. पण, त्यामुळे हा प्रश्न सुटणारा नाही.
 
कोरोना हा संसर्गजन्य आणि सामाजिक आजार आहे. पूर्वीच्या काळात प्लेग, लेप्रसी, क्षय आणि कॉलरासारखे आजार आपण पाहिले, अनुभवले. हे आजार झालेल्या लोकांना आपण वाईट शत्रू समजत असू. म्हणून या लोकांना मारून टाकले जात असे. त्यांना हा रोग होता म्हणून आपण त्यांना दोष दिला होता. त्यांच्या नैतिकतेवर संशय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा सामाजिक ठपका किंवा कलंक आपण लावला होता. अशाप्रकारे अमानवीय पद्धतीने आजही लोकांची हत्या करण्यात येते, हेच आपल्या समाजाचे दुर्देव म्हणावे लागेल. हे असं का झाले? आपण आपल्याच बांधवांशी असे क्रूर व दुष्टांसारखे का वागलो? या प्रश्नाचे उत्तर आपले शास्त्रीय अज्ञान. विषाणू आणि जीवाणू एका माणसाकडून दुसर्‍या माणसाकडे संक्रमित कसे होतात, हे आपल्याला माहीत नव्हते. हे आजार वस्तीत कसे पसरतात, यामागचे कारण किंवा मूलभूत शास्त्रीय कारण आपल्याला माहीतच नव्हते. पण, आज ‘ब्रेकिंग न्यूज’चा भडिमार आपल्यावर होतो आहे. मृत्यूचा पडदा आपल्या डोळ्यांसमोर आहे. आपल्याला संसर्ग होईल, रोगाचा स्पर्शसंचार होईल, या कारणाने आपण खूप संशयग्रस्त झालो आहोत. आपले सर्वसामान्य मानसशास्त्र खूप बदलले आहोत. कोरोनाग्रस्तापेक्षा आपण भीतीग्रस्त झालो आहोत. स्पर्शसंसर्गाची भीती आपल्या मनात संचारते आहे नि जितकी विधायक राहायला हवी तितकी विधायक न राहता आता ती विकृत झाली आहे. आपली नैतिक सूज्ञता नष्ट झाली आहे. आपली विवेकनिष्ठ विचारपद्धती व सद्सद्विवेकबुद्धी कोरोनाच्या लाटेत वाहून गेली आहे. आपण मनाला आवर घालायला पाहिजे. आपलं मन असूर होऊन चालत नाही. आपण देव बनू शकत नाही. पण, माणूस बनून माणुसकीची जोपासना तरी नक्की करू शकतो ना?
 

- डॉ. शुभांगी पारकर

Powered By Sangraha 9.0