दिल्लीहून परतलेल्या परभणीचे ते तिघे कोरोना निगेटिव्ह

02 Apr 2020 19:47:06

parbhani s_1  H
 
 
परभणी : दिल्ली येथील तबलिगी मुस्लीम समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या परभणी शहरातील तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर देशभरामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या कार्यक्रमामध्ये ९ हजाराहून अधिक लोकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात येत आहे.
 
 
या कार्यक्रमाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने परभणी जिल्ह्यातून किती नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले, याची माहिती घेतली होती. यामध्ये परभणीतील तिघे दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परभणीत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तिन्ही जणांना जिल्हा रुग्णालयात आणून मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत त्याच दिवशी पाठविण्यात आले होते.
 
 
 
या संदर्भातील अहवाल गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये तिन्ही जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यांनी दिली. या तिन्ही जणांच्या संपर्कात जिल्ह्यातील पाच जण आले होते. त्यापैकी एक जण राजस्थानमध्ये गेला असून, अन्य चार जणांचे नमुने घेऊन ते पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0