एनआयए करणार अफगाणिस्तान हल्ल्याचा तपास

02 Apr 2020 11:16:39

afganistan_1  H


अफगाणिस्तानात गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) गेल्या महिन्यात अफगाणिस्तानाची राजधानी काबुल येथील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याचा तपास करणार आहे. या हल्ल्यात भारतीय नागरिकांसह एकूण २७ जणांचा मृत्यू झाला होता. एनआयएने बुधवारी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. एनआयएद्वारे परदेशात तपास करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.


एनआयएने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, एनआयए कायद्यातील दुरुस्तीनंतर परदेशात तपास करण्याबाबतचे हे पहिलेच प्रकरण आहे. सुधारित कायद्यानुसार आता एनआयए देशाबाहेरही तपास करू शकते. ज्या प्रकरणात भारतीयांचे हित आहे किंवा भारतीयांवर परिणाम झाला असेल अशी परदेशातील प्रकरणांचा आता एनआयए तपास करू शकणार आहे.


अफगाणिस्तानातील हे प्रकरण भारतीय दंड विधान आणि दहशतवाद विरोधी कायद्यातील कलमांतर्गत दाखल करण्यात आले आहे. २५ मार्चला अफगाणिस्तानातील गुरुद्वारावर हा हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट खोरसान प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) या दहशतवादी गटाने घेतली आहे. हा दहशतवादी गट आयएस या दहशतवादी संघटनेची एक शाखा आहे.
Powered By Sangraha 9.0