तब्लीग-ए-जमात : नवी मुंबईतील १७ जण मरकजच्या कार्यक्रमात सहभागी!

02 Apr 2020 09:44:38
navi mumbai_1  

३ जणांचा शोध, दोघांना कोरोनाची लागण

नवी मुंबई : दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिग जमातच्या कार्यक्रमात नवी मुंबईतील १७ जण सहभागी झाल्याचे समोर आले आहे. यापैकी ३ जणांचा शोध लागला असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या तीनही जणांची रक्त तपासणी करण्यात आली. या तिघांपैकी २ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १३ वर पोहोचली आहे.


निजामुद्दीनच्या मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या देशभरातील १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण देशभरातून लोक गेले होते. महाराष्ट्रातूनही अनेकजण या कार्यक्रमाला गेले होते. त्यापैकी १७ जण नवी मुंबईचे होते, असे समोर आले आहे. या १७ पैकी ३ जणांचा तपास लागला आहे. तर १४ जणांचा नवी मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलीस कसून शोध घेत आहेत. हे १४ जण अजून परतले नसल्याची माहिती मिळत आहे.


देशावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना ‘तब्लिग जमात’ या सुन्नी मुस्लीम समाजाचे १३ मार्च ते १५ मार्च असे अधिवेशन दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये भरवले होते. या तारखेच्या आधीपासून देश-विदेशातू सुन्नी मुस्लीम प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले. या २००० सुन्नी प्रतिनिधींपैकी सोमवारी एकाच दिवशी २४ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


निझामुद्दीन परिसरातला ‘तब्लिग जमात’चा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून तब्बल १३६ जण ‘तब्लीग जमात’ला गेले होते. औरंगाबादमधून ४७, तर कोल्हापुरातून २१ जमाती सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर, नांदेड, ठाणे, सातारा, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातील भाविक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. ‘तब्लीग जमात’ हे देशातील ‘कोरोना’चे मोठे हॉटस्पॉट असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.


अहमदनगरमध्ये पाच कोरोनाग्रास्तांपैकी दोन परदेशी रुग्ण हे ‘तब्लीग जमात’चे सहभागी आहेत. तर अन्य ३ पॉझिटिव रुग्ण हे सहभागींच्या संपर्कातून बाधित झाले आहेत
Powered By Sangraha 9.0