सांगली जिल्ह्यातील पाच जणांचा तब्लिगी जमातमध्ये सहभाग

02 Apr 2020 18:12:13


nashik_1  H x W



सांगली : दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज भवनमध्ये झालेल्या तब्लिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील ५ जणांनी सहभाग घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यांपैकी तासगावमधील , इस्लामपूरमधील आणि मिरजमधील दोघेजण सापडले आहेत. प्रशासनाने या चारही जणांना क्रीडा संकुल येथे क्वारंटाईन केले असून सांगली शहरातील शामरावनगर भागातील एका व्यक्तीचा प्रशासनाकडून शोध लावला जात आहे.


भारतात मुख्यालय असलेली तब्लिगी जमात ही मुस्लिम धर्मिय संघटना जगातील १५०
पेक्षा अधिक देशांत काम करत आहे. तब्लिगी जमात या संघटनेनेच दि. १ मार्च ते १५ मार्च या कालावधीत दिल्लीतील मरकज भवनमध्ये मुस्लिमांसाठी धार्मिक मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते आणि नंतर देशात लॉकडाऊनचा निर्णय झाला.



सर्वत्र जमावबंदी व संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले. असे असूनही मरकज भवनमध्ये या आदेशाला हरताळ फासला गेल्याचे ३१
मार्च रोजी उघड झाले. इथे तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात विदेशातील मुल्ला-मौलवींनी सहभाग घेतल्याचे समोर आले. विशेष म्हणजे यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजले. तसेच याच कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील मुस्लिम धर्मियांनीही उपस्थिती लावली होती. त्यातच सांगलीतील पाच जण हजर होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, क्वारंटाईन केलेल्या चार जणांच्या घशातील द्रव कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी यापैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह आहे वा नाही, ही माहिती समोर आलेली नाही.

Powered By Sangraha 9.0