एका विषाची गोष्ट, भाग - २: राऊंडअप : शेतकर्‍यांसाठी वरदान (!)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020   
Total Views |
roundup_1  H x
 
 
 

अमेरिकेच्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ‘ग्लायफोसेट’चा जगभरातला वापर १९९५ साली ६७ दशलक्ष किलोंवरून २०१४ साली ८२६ दशलक्ष किलोंपर्यंत, म्हणजेच १२ पटींनी वाढला. आज जगातल्या १६० पेक्षा जास्त देशांमध्ये ‘ग्लायफोसेट’युक्त तणनाशके वापरली जातात. ‘राऊंडअप’ तणनाशकांद्वारे जागतिक बाजारपेठ काबीज करण्यात ‘मोन्सॅन्टो’ पूर्ण यशस्वी झाली. मात्र, दुसर्‍या बाजूला ‘ग्लायफोसेट’च्या कर्करोगजन्यतेबद्दलची सावध करणारी संशोधने बाहेर येत होती.

 
 
 
हर्षद तुळपुळे -  आपल्या हातून जे काही निर्माण होत आहे, ते पुढच्या काळात जगात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल घडवून आणणार आहे, याची कल्पना हेन्री मार्टिनला ७० वर्षांपूर्वी बहुधा नसावी. ’ग्लायफोसेट’चा शोध सर्वप्रथम लावला तो स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ हेन्री मार्टिन याने. अर्थात, त्यावेळी ’ग्लायफोसेट’ची ओळख एक ‘रसायन’ एवढीच होती. तो साधारण १९५० च्या सुमाराचा काळ होता. जेव्हा ’औषधनिर्मिती’ या विषयात जगभरातले अनेक शास्त्रज्ञ आणि उद्योजक झपाटले गेले होते. वास्तविक हेन्री मार्टिनचे प्रयत्न हे तणनाशक तयार करण्यासाठी नव्हतेच मुळी. त्याला तयार करायचे होते औषध. ’सिलॅग’ या एका छोट्या फार्मा कंपनीत तो काम करत होता, जी कंपनी पुढे महाकाय ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने विकत घेतली. ’ग्लायफोसेट’ रसायनाचा मानवी आरोग्यासाठी काय उपयोग करता येईल, यावर हेन्रीचे संशोधन सुरू होते. मात्र, ’जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ने ’सिलॅग’ कंपनी विकत घेतल्यावर ’ग्लायफोसेट’सहीत अनेक संशोधनप्रकल्प इतर कंपन्यांना हस्तांतरित केले. ’अल्ड्रीच केमिकल’ या कंपनीने ’ग्लायफोसेट’चे संशोधन हक्क विकत घेतले होते. मात्र, पुढे तिने ते ’स्टॉफर केमिकल’ या कंपनीला विकले. या कंपनीमध्ये ’ग्लायफोसेट’चा ’केमिकल केलेटर’ म्हणून उपयोग सर्वांत पहिल्यांदा शोधला गेला. मात्र, ’ग्लायफोसेट’ हे एक जालीम तणनाशक असू शकते, याचा शोध लागला ’मोन्सॅन्टो’च्या प्रयोगशाळेतच.
 
 
 
तणनाशक म्हणून ’ग्लायफोसेट’चा उपयोग शोधण्याचे श्रेय जाते जॉन फ्रान्झकडे. जॉन फ्रान्झ हा लहानपणापासून रसायनविषयक संशोधक होण्याची आकांक्षा बाळगलेला एक तरुण, उमदा शास्त्रज्ञ. मिनेसोटा विद्यापीठातून ’ऑरगॅनिक केमिस्ट्री’ या विषयात डॉक्टरेट् मिळवल्यानंतर १९५५ साली त्याने ’मोन्सॅन्टो’ कंपनीत काम करायला सुरुवात केली. ’मोन्सॅन्टो’ ही त्याकाळी औद्योगिक रसायने तयार करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध होती. १९६७ साली फ्रान्झला फिल हॅम याच्यासोबत शेतीशी संबंधित रसायनांवर संशोधन करण्याचे नवीन काम कंपनीकडून देण्यात आले. तो काळ असा होता की, भारतासहित अख्ख्या जगाला हरितक्रांतीचे वेड लागले होते. रासायनिक शेतीतून उत्पादनवाढीचे व्यसन माणसाला लागण्याची ती सुरुवात होती. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, संकरित बियाणी यांना मागणी वाढत होती आणि नजीकच्या काळात या वस्तूंना प्रचंड मोठी जागतिक बाजारपेठ निर्माण होण्याची चाहूल उत्पादक कंपन्यांना लागली होती.
 
 
’ग्लायफोसेट’ हे प्रभावी तणनाशक असल्याचा निष्कर्ष संशोधनाअखेर फ्रान्झच्या हाती लागला. तणांवर हे रसायन फवारल्यावर ते मुळाशी जाते, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे विकर (शपूूाश) स्रवण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते आणि परिणामी त्या तणाची वाढ खुंटून ते मरते. मात्र, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांमध्ये हे विकर आढळत नसल्याने ’ग्लायफोसेट’पासून मनुष्य आणि इतर प्राण्यांना कुठलाही धोका नाही, असे ’मोन्सॅन्टो’कडून सांगण्यात आले. १९७० साली एका हरितगृहात या रसायनाची पहिली चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्ण यशस्वी झाली. कंपनीचे अधिकारी जाम खूष झाले. हे रसायन जागतिक कृषी बाजारपेठेत क्रांती घडवून आणणार, याची अधिकार्‍यांना खात्री पटली. दि. २६ मार्च, १९७४ रोजी अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाकडून फ्रान्झला या संशोधनाचे पेटंट बहाल करण्यात आले. फ्रान्झवर कौतुकाचा आणि पुरस्कारांचा वर्षाव सुरू झाला. १९८७ साली तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या हस्ते राष्ट्रीय पदक फ्रान्झला मिळाले. अमेरिकेच्या ’नॅशनल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी मेडल्स फाऊंडेशन’ या संस्थेला मुलाखत देताना हे फ्रान्झ महाशय म्हणाले, “मानवाला हितकारक असे पर्यावरणपूरक (!) उत्पादन निर्माण करण्यात यशस्वी झाल्याचे मला खूप समाधान होत आहे.” हेच फ्रान्झ महाशय १९९१ साली जेव्हा ’मोन्सॅन्टो’ कंपनीमधून निवृत्त झाले, तेव्हा त्यांच्या नावावर तब्बल ८४० पेटंट्स होती. मानवी आरोग्यासाठी शोधल्या गेलेल्या ’पेनिसिलिन’प्रमाणे ’ग्लायफोसेट’ शेतीसाठीचे गेल्या १०० वर्षांतले जगातले सर्वोत्तम संशोधन आहे, असे ’ग्लायफोसेट’चे वर्णन करण्यात आले.
 
 
फ्रान्झचे संशोधन ’मोन्सॅन्टो’साठी वरदान ठरले. कारण, ते ज्यावेळी केले गेले तो ’मोन्सॅन्टो’साठी साडेसातीचा काळ होता. व्हिएतनाम युद्धामुळे ’मोन्सॅन्टो’ची पत खालावली होती. १९४० च्या दशकापासून ’मोन्सॅन्टो’ ही त्यावेळी (कु)प्रसिद्ध असणार्‍या ’डायक्लोरोडायफिनाईलट्रायक्लोरोइथेन’ अर्थात ’डीडीटी’ हे कीटकनाशक उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी होती. १९६० च्या दशकात व्हिएतनाम युद्धात वापरले गेलेले ’एजंट ऑरेंज’ हे संहारक तणनाशक अमेरिकन लष्कराला पुरवल्यामुळे ’मोन्सॅन्टो’ आणखी कुप्रसिद्ध बनली. या ’एजंट ऑरेंज’मध्ये ’डायॉक्सिन’ हे विषारी रसायन मिसळल गेल्याचे कालांतराने सिद्ध झाले. या दुष्कृत्यामुळे खालावलेली पत ’मोन्सॅन्टो’ला पुन्हा मिळवायची होती. त्यामुळे फ्रान्झचे संशोधन कंपनीसाठी वरदान ठरले. ’ग्लायफोसेट’ हा मुख्य घटक असणारे ’राऊंडअप’ नामक तणनाशक १९७० च्या दशकात ’मोन्सॅन्टो’ने बाजारात आणले. या तणनाशकाचा प्रभाव जबरदस्त होता. फवारल्यानंतर काही दिवसांमध्ये शेतातले तण समूळ नष्ट व्हायचे. त्यावेळी अमेरिकेतले शेतकरी जी इतर तणनाशके वापरत होते, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, वन्यजीवनाचा र्‍हास, अशा समस्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र ’राऊंडअप’ हे ‘आत्तापर्यंतच्या इतिहासातले पर्यावरणदृष्ट्या सर्वात सुरक्षित तणनाशक आहे’ असा थेट दावा ’मोन्सॅन्टो’ करत होती.
 
 
संशोधनाच्या यशानंतर ’मोन्सॅन्टो’ने लगेच व्यावसायिक हालचाली सुरू केल्या. ’ग्लायफोसेट’मध्ये मुख्य कच्चा माल असणार्‍या फॉस्फरच्या खाणकामाचे परवाने सरकारकडून मिळवले. या नव्या ’सुरक्षित’, ’पर्यावरणस्नेही’ तणनाशकाची जगभर जोरदार जाहिरात व्हायला लागली. १९७४ साली इंग्लंडमध्ये गव्हाच्या शेतीमध्ये या तणनाशकाचा वापर सर्वप्रथम झाला. अमेरिकेत ’राऊंडअप’ हे अगोदर अखाद्य पिकांसाठी वापरले जात होते. आता ते खाद्य पिकांसाठीही वापरले जायला लागले. मलेशिया, कॅनडा, इ. देशांमध्येही ’राऊंडअप’चा नियमित वापर सुरू झाला. मात्र, तणांचा नाश करताना पिकांवर हे रसायन फवारले जाणार नाही, याची काळजी मात्र शेतकर्‍यांना घ्यावी लागत होती. नाहीतर पीक मरण्याचा धोका होता. पण हा धोकाही फार दिवस राहिला नाही. १९९० च्या दशकात ’मोन्सॅन्टो’ने ’राऊंडअप रेडी सीड्स’ या नावाने जनुकीय सुधारित बियाणी बाजारात आणली. ’राऊंडअप’ तणनाशकाच्या मार्‍याने तण मरते, पण पिकाला काहीही धोका उद्भवत नाही, असे जादुई तंत्र ’मोन्सॅन्टो’ने विकसित केले होते. यामुळे तर या तणनाशकाची मागणी कित्येक पटींनी वाढली. आज ’मोन्सॅन्टो’च्या बहुतांश बियाणांमध्ये ग्लायफोसेट-रेझिस्टंट गुणधर्म असलेला जनुक आहे. त्यामुळे या दोन्ही वस्तू एकमेकांसोबत विकून ’मोन्सॅन्टो’ अब्जावधींचा नफा कमवू लागली. १९९४ साली ’फार्म केमिकल्स मॅगझीन’मध्ये शेतीचा चेहरामोहरा बदलून टाकणार्‍या दहा सर्वोत्तम उत्पादनांमध्ये ’राऊंडअप’ची नोंद झाली. नुसत्या शेतीमध्येच नव्हे, तर रस्त्याच्या कडेला, घराच्या आजूबाजूला, खेळाच्या मैदानांवर अशा विविध ठिकाणी अनावश्यक (?) तणांचा नायनाट करण्यासाठी ‘राऊंडअप’चा वापर व्हायला लागला. अमेरिकेच्या ’नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन’ या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ’ग्लायफोसेट’चा जगभरातला वापर 1995 साली ६७ दशलक्ष किलो वरून २०१४ साली ८२६ दशलक्ष किलोंपर्यंत, म्हणजेच १२ पटींनी वाढला. आज जगातल्या १६० पेक्षा जास्त देशांमध्ये ’ग्लायफोसेट’युक्त तणनाशके वापरली जातात.’राऊंडअप’ तणनाशकाद्वारे जागतिक बाजारपेठ काबीज करण्यात ‘मोन्सॅन्टो’ पूर्ण यशस्वी झाली. मात्र, दुसर्‍या बाजूला ’ग्लायफोसेट’च्या कर्करोगजन्यतेबद्दलची सावध करणारी संशोधने बाहेर येत होती. पाहू पुढच्या लेखात...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@