एका विषाची गोष्ट , भाग -१; कॅरी गिलम आणि मोन्सॅन्टो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2020   
Total Views |

monsanto _1  H
२०१८ साली कृषी-जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील ‘मोन्सॅन्टो’ ही बलाढ्य अमेरिकन कंपनी ‘बेयर’ या अतिबलाढ्य जर्मन कंपनीने विकत घेतली. तेव्हापासून या दोन्ही कंपन्यांची कुप्रसिद्धी आणखीनच वाढली. ‘बेयर’चा समभाग ४६ टक्क्यांनी घसरला. पण हे असे का व्हावे? त्याची कथा एका तणनाशकाभोवती गुंफलेली आहे...

 
 
हर्षद तुळपुळे -  शोधपत्रकारिता हे एक अफलातून विश्व आहे. सर्वसामान्य पत्रकार आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतात, तर शोधपत्रकार गोष्टीमागची गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न करतात. ते लोकशाहीचे खरेखुरे आधारस्तंभ असतात. जीव पणाला लावून एखाद्या गोष्टीची पाळेमुळे खणून काढणे हाच त्यांचा ध्यास अन् श्वास असतो. एक वेगळेच साहस त्यांच्या अंगी असते. कोणाच्या मर्जीत न राहता सत्यशोधनाच्या अवघड वाटेवर ते यात्रा करीत असतात. जगभरातील अनेक सरकार, अनेक मोठमोठे नेते, मोठमोठ्या कंपन्या, संस्था यांचे पितळ उघडे पाडण्याचे काम अनेक शोधपत्रकारांनी केले आहे. अशीच एक धडाडीची, ’मोन्सॅन्टो’ या जगातल्या सर्वात कुप्रसिद्ध कंपनीचे पितळ उघड पाडणारी अमेरिकन शोधपत्रकार कॅरी गिलम!
 
 
 
 
 
अमेरिकेच्या मध्यभागी असलेल्या केन्सस राज्यात राहणारी, केन्सस विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतलेली कॅरी गेली २५ वर्षे शोधपत्रकारितेच्या क्षेत्रात काम करते आहे. १९९८ पासून ती शेती आणि अन्न व त्याच्याशी संबंधित उद्योग या विषयांवर संशोधन करते. ’रियुटर्स’या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेबरोबर १७ वर्षं तिने वरिष्ठ पत्रकार म्हणून काम केले आहे. शेतीमध्ये वापरली जाणारी रसायने हा तिचा विशेष अभ्यासाचा विषय. शेतकर्‍यांशी थेट शेतात जाऊन संवाद साधताना तिने पूर्ण अमेरिका पादाक्रांत केली आहे. कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ, वकील, न्यायाधीश यांना ती थेट जाऊन भिडते, त्यांच्याकडून माहिती खणून काढते. माणूस जे अन्न खातो ते कसे पिकवले गेले, काय काय रासायनिक ‘अत्याचार’ त्यावर झाले आहेत, हे सगळे त्याला समजायला हवे हा तिचा ध्यास आहे. ’पर्यावरण पत्रकार’, ’कृषी पत्रकार’ अशी तिची विविधांगी ओळख आहे. २०१७ साली तिचे ’व्हाईट वॉश: द स्टोरी ऑफ अ वीड किलर’, ‘कॅन्सर अ‍ॅण्ड द करप्शन ऑफ सायन्स’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक जगभर प्रचंड गाजले. २०१८ साली या पुस्तकाला ’सोसायटी फॉर एन्व्हार्यमेंटल जर्नलिस्ट्स’ या संस्थेकडून दिला जाणारा ’रॅचेल कार्सन बुक अ‍ॅवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार मिळाला.
 
 
 
 
अमेरिकेची राजकीय धोरणं काहीही असोत, पण तिथे लोकशाही प्रबळ आहे. सर्वसामान्य माणसाच्या म्हणण्याला तिथे किंमत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित-जनुकीय बियाणी तयार करणार्‍या बहुतांश कंपन्या अमेरिकन असल्या तरी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या अन्नधान्याला वाढती मागणी असणारा एक मोठा संघटित ग्राहक वर्ग तिथे तयार होत आहे. आपण जे अन्न खातोय ते विषमुक्त असावे, असा आग्रह धरणारे अमेरिकेतले काही लोक एकत्र आले आणि २०१५ साली त्यांनी ’युएस राइट टू नो’ नामक एक संस्था सुरू केली. ही संस्था म्हणजे संशोधकांचा एक गट आहे. माणूस जे अन्न खातोय ते पिकवताना वा प्रक्रिया करताना कोणकोणती रसायने वापरली गेली आहेत, ती कशी बनवली जातात, मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर त्याचे काय काय परिणाम होतात, रसायनांच्या सुरक्षिततेबाबतचे नियम कंपन्यांकडून पाळले जातात की नाही, ही सर्व माहिती खणून काढून ती सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देण्याचे आणि कंपन्यांकडून काही फसवेगिरी होत असल्यास लढा देण्याचे काम हा गट करतो. ’अमेरिकेच्या फूड सिस्टीममधील सत्य आणि पारदर्शकतेचा पाठपुरावा’हे या गटाचे ब्रीदवाक्य आहे. कॅरी गिलमही सध्या इथे रिसर्च डायरेक्टर म्हणून काम करते. या गटाचे सर्वात मोठं ’टार्गेट’ अर्थातच बलाढ्य ‘मोन्सॅन्टो’आणि सध्या ज्या अतिबलाढ्य कंपनीने तिला विकत घेतलंय ती जर्मन कंपनी ‘बेयर’!
 
 
 
१९०१ साली जॉन फ्रान्सिस क्वीनी या माणसाने एक केमिकल कंपनी सुरू केली आणि तिला आपल्या बायकोचं नाव दिलं ‘मोन्सॅन्टो.’ सुरुवातीला अन्नपदार्थांमध्ये वापरण्यायोग्य अशी काही रसायने, स्वीटनर्स वगैरे या कंपनीने बनवण्यास सुरुवात केली. पुढील ५० वर्षांमध्ये तिने रासायनिक औषधांच्या धंद्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १९८३ साली ’मोन्सॅन्टो’चे शास्त्रज्ञ जनुकीय सुधारित वाण निर्माण करण्यात यशस्वी झाले आणि जगभरातल्या बियाणी निर्मिती उद्योगावर ’मोन्सॅन्टो’चे अधिराज्य प्रस्थापित झाले. आपल्या ११७ वर्षांच्या आयुष्यात ’मोन्सॅन्टो’ने २५ पेक्षा जास्त बड्या कंपन्या खरेदी केल्या. बियाणी आणि रसायने विकून या कंपनीचा २०१८ सालचा ’निव्वळ नफा’ अडीचशे कोटी डॉलर्सइतका होता. गेल्याच वर्षी, म्हणजेच २०१८ च्या जून महिन्यात ‘मोन्सॅन्टो’पेक्षाही वयाने आणि आकाराने मोठ्या असणार्‍या‘बेयर’ या अवाढव्य जर्मन अ‍ॅग्रोकेमिकल कंपनीने ६३ अब्ज डॉलर्सना ’मोन्सॅन्टो’ कंपनी खरेदी केली. हा जगातला एक ऐतिहासिक व्यवहार मानला जातो. हा व्यवहार जगातला एक भीतिदायक व्यवहारही होता. कारण, यात एका राक्षसाने दुसर्‍या राक्षसाला खाऊन तो अधिक बलवान झाला.
 
 
 
परंतु, हा व्यवहार झाल्यानंतर दोनच महिन्यांनी विपरीत घडले. एका केसमध्ये अमेरिकन न्यायालयाने ’मोन्सॅन्टो’ला २८९ दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला. त्यानंतर काही महिन्यांनीच दि. १३ मे २०१९ रोजी पुन्हा एकदा एका प्रकरणात न्यायालयाने ’बेयर’ला, म्हणजेच ’मोन्सॅन्टो’च्या मालक कंपनीला अडीच अब्ज डॉलर्स एवढा दंड आकारला. या प्रकरणामुळे या दोन्ही कंपन्यांची कुप्रसिद्धी आणखीनच वाढली. ’मोन्सॅन्टो’च्या अधिग्रहणाचा व्यवहार झाल्यानंतर ’बेयर’च्या समभागाची किंमत तब्बल ४६ टक्क्यांनी घसरली. ज्या ज्या माणसांनी या दोन कंपन्यांची फसवेगिरी उघडी करून सत्य जगासमोर आणले त्यातले एक अग्रगण्य नाव म्हणजे शोधपत्रकार कॅरी गिलम.’मोन्सॅन्टो’चे पितळ उघडे पाडल्याबद्दल कॅरीला अनेकदा कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून धमकावले गेले. तिने आपल्या बाजूने वार्तांकन करावे म्हणून ’मोन्सॅन्टो’कडून तिला अनेक आमिषेही दाखवली गेली. पण कॅरीने आपली सत्यनिष्ठता सोडली नाही.पण असे नेमके घडले तरी काय? इतकी वर्षं जगाच्या कृषी क्षेत्रावर साम्राज्य गाजवणार्‍या ’मोन्सॅन्टो’वर विलीनीकरणाची वेळ का यावी? ’मोन्सॅन्टो-बेयर’ विलीनीकरण हा एक ’भीतिदायक’ व्यवहार का वाटावा? या दोन्ही कंपन्यांबद्दल लोकांमध्ये एवढा राग, तिटकारा कशासाठी? न्यायालयाने या अजस्त्र कंपन्यांना एकाएकी अब्जावधी डॉलर्सचा दंड का ठोठवावा? कॅरी गिलमने तिच्या पुस्तकाचे नाव ’करप्शन ऑफ सायन्स’ असे का ठेवावे? ही सगळी सत्यकथा एका तणनाशकाभोवती गुंफलेली आहे. हे तणनाशक कर्करोग निर्माण करणारे आहे आणि ही बाब ’मोन्सॅन्टो’ने जाणूनबुजून लपवून ठेवली असे आरोप या कंपनीवर आहेत. त्या तणनाशकाचे नाव ’राऊंडअप’!आणि त्यातल्या त्या विषारी रसायनाचे नाव ’ग्लायफोसेट.’पाहूया या रसायनाची विषारी कहाणी पुढच्या लेखात...
@@AUTHORINFO_V1@@