‘लॉकडाऊन’च्या अशाही फायदेशीर बाजू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Apr-2020   
Total Views |
lockdown_1  H x


प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, असे म्हटले जाते. त्याची प्रचीती हवापाण्याच्या शुद्धतेमुळे सध्या येत आहे. भारतातही गेल्या अनेक दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ आहे. उद्योगधंदे बंद आहेत. कारखान्यांची धडधड थांबली आहे. रस्त्यावरून वाहनांनी रजा घेतलेली आहे. लोक घरात बसून आहेत. तब्बल ९० टक्के वाहने पार्किंगमध्येच आहेत. त्यामुळे इंधनाची तर बचत होत आहेच; शिवाय वाहनांद्वारे हवेत जाणाऱ्या कार्बन मोनोक्साइडचे प्रमाण प्रचंड घटले आहे. हवेतील धूलिकण कमी झाले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय ‘लॉकडाऊन’ ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सर्व वर्गांचा विचार करून ‘लॉकडाऊन’ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशवासीयांकडून पंतप्रधान मोदी यांनी सात मुद्द्यांवर साथ मागितली आहे.


घरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या, ज्यांना अगोदरच आजार असतील त्यांची आणखी काळजी घ्या. त्यांना चिनी व्हायरसपासून वाचवा. ‘लॉकडाऊन’ आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या लक्ष्मणरेषेचं काटेकोर पालन करा. घरात तयार मास्कचा वापर करा. स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोष्टी करा. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अॅप डाऊनलोड करा आणि इतरांनाही याबाबत सांगा. शक्य तेवढी गरीब कुटुंबाची देखरेख करा आणि जेवणाची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय आणि उद्योगात तुमच्यासोबत काम करत असलेल्या सहकार्यांविषयी सहवेदना ठेवा, त्यांना कामावरून काढून टाकू नका. देशातील कोरोना व्हायरस युद्धातील डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार, पोलीस या सर्वांचा आदर करा. विजय मिळवण्यासाठी ही सप्तपदी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

हा तर चिनी व्हायरसच...
कोरोना विषाणूला ‘चिनी व्हायरस’ म्हणूनच ओळखले पाहिजे. कारण, संपूर्ण जगात आणि भारतातही कोरोना व्हायरस चीनमुळेच पसरला आहे. प्रवास, पर्यटन, व्यापार या कारणास्तव फिरणारे लाखो चिनी नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये जातात. तिथूनच हा विषाणू जगभरात पसरला आहे. चीनने जगावर आणि भारतावर लादलेले हे तिसरे महायुद्ध आहे, असे म्हणता येईल. त्याला ‘जैविक युद्ध’ किंवा ‘बायोलॉजिकल वॉर’ म्हणावे लागेल. भारताचे पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धांमध्ये किंवा स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन युद्धांमध्ये, त्यानंतर सुरू झालेल्या दहशतवादामध्ये जितके नुकसान झाले नसेल, त्याहून कितीतरी पट नुकसान या चिनी विषाणूमुळे झालेले आहे. म्हणून भारताने सगळ्या जगाची मदत घेऊन चीनला त्याची नुकसानभरपाई देण्यास भाग पाडायला हवे.

‘लॉकडाऊन’चे सकारात्मक फायदे
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्याबरोबरच ‘लॉकडाऊन’चे अनेक सकारात्मक फायदेही दिसून आले आहेत. भारताचे काही व्यापारी चीनमधून नको त्या गोष्टी आयात करायचे, ती आयात थांबली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिनी आयात-निर्यातीतील तफावत किंवा व्यापारी तूट कमी करण्यात कधीच यश मिळत नव्हते. ते यश या काळात मिळण्याची शक्यता आहे. युरोप आणि अमेरिका या देशांचे चीनमधील कारखाने बंद करून इतरत्र देशांमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यातील काही कारखाने भारतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

वैद्यकीय पर्यटनामध्ये वाढ
बहुतेक भारतीय हे शाकाहारी असल्यामुळे आपल्यावर चिनी विषाणूचा प्रभाव खूप कमी झाला आहे, असा एक कयास आहे. त्यामुळे भारतीय शाकाहारी जेवण जगामध्ये आणखीन प्रसिद्ध होईल. यापुढे नॅचरोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, अॅलोपॅथी यासाठी जगातील इतर लोक भारतात येण्याची शक्यता वाढेल, त्यामुळे ‘मेडिकल टुरिझम’ अर्थात ‘वैद्यकीय पर्यटना’त वाढ होण्याची शक्यता वाढणार आहे. अनेक प्रगत देशांना भारताकडून विविध प्रकारची औषधे पाहिजे आहेत. त्यामुळे औषधाची निऱ्यात करणारा भारत हा सर्वात मोठा देश ठरु शकतो. भारत ८५ टक्के तेल आयात करतो, ती आयातही येत्या काळात प्रचंड प्रमाणात कमी होणार आहे. त्याशिवाय तेलाच्या किमती कमी झाल्याने आपला तेलाच्या आयातीचा खर्चही कमी होणार आहे.

हवापाण्याची शुद्धता
प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते असे म्हटले जाते, त्याची प्रचीती हवापाण्याच्या शुद्धतेमुळे सध्या येत आहे. भारतातही गेल्या अनेक दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ आहे. उद्योगधंदे बंद आहेत. कारखान्यांची धडधड थांबली आहे. रस्त्यावरून वाहनांनी रजा घेतलेली आहे. लोकं घरात बसून आहेत. तब्बल ९० टक्के वाहने पार्किंगमध्येच आहेत. त्यामुळे इंधनाची तर बचत होत आहेच; शिवाय वाहनांद्वारे हवेत जाणाऱ्या कार्बन मोनोक्साइडचे प्रमाण प्रचंड घटले आहे. हवेतील धूलिकण कमी झाले आहेत. सल्फरडायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आदी हानिकारक वायूंचे प्रमाण घटल्याने, हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. सर्वाधिक प्रदूषित परिस्थिती ओढावलेले राजधानी दिल्लीसारखे शहरही शुद्ध हवेमुळे खुलले आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून देशभरातील हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका तात्पुरता का होईना, कमी झाला आहे.
सध्या शहरांमध्येही पक्ष्यांचा किलबिलाट कानांना तृप्त करीत आहे. नवी दिल्लीच्या उपनगरांत नीलगायींचे दर्शन होत आहे. थोड्याफार फरकाने हा अनुभव सर्वत्रच येत आहे. बंद कारखान्यांमुळे औद्योगिक कचरा, सांडपाणी नद्यांच्या प्रवाहात येत नसल्याने, पाण्याचे आरोग्यही सुधारले आहे. देशभरातील तब्बल ९१ मोठी शहरे गेल्या काही दिवसांत या दोन्ही प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडली आहेत.


दारूबंदी समाजाकरिता उपयोगी
‘लॉकडाऊन’मुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील दारूच्या दुकानांवरही गंडांतर आले. त्यामुळे तळीरामांची चलबिचल सुरू झाली. कारण, मागच्या दाराने दारूच्या बाटल्या रिचवणाऱ्यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यामुळे काही तळीरामांचा जीव कासावीस झाला. प्याल्याशिवाय जगणेच जणू अशक्य म्हणून काही भान हरपून बसले आहेत. मात्र, अनेक तरुण आता दारू व्यसनापासून मुक्त झाले आहेत. कारण, दारूच मिळत नाही. म्हणजे आता गैरसरकारी दारूबंदीच लागू झाली आहे. ही दारूबंदी समाजाकरिता उपयोगी ठरु शकते.
आज जगात एकप्रकारे तिसरे महायुद्धच सुरू आहे. अनेक महिने आपण या युद्धामध्येच असणार आहोत. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे या युद्धात सैनिक आहेत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही, तर लोकनियुक्त सरकारला पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्त्वाचे काम आहे. यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल, तर ते तुमच्या-आमच्या दारापर्यंत, घराघरांत पोहोचलेले असेल. कोरोना व्हायरसने हे करुन दाखवलंय.
जोपर्यंत कोरोनावर लस तयार होत नाही किंवा करोनाचा प्रसार पूर्णपणे थांबत नाही, तोपर्यंत पुढील काही महिने सर्वांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळणे गरजेचे आहे.
रस्त्यावरती होणारे अपघात हे भारतीयांच्या मृत्यूचे एक मोठे कारण होते. ‘लॉकडाऊन’नंतर रस्त्यावर अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण जवळजवळ ९० टक्क्यांहून कमी झाले आहे. सगळीकडे स्वच्छतेचा घोष सुरू आहे. यामुळे ‘स्वच्छ भारत’ अभियानाला एक एक मोठे यश मिळालेले आहे. हवा, पाणी आणि इतर स्वच्छतेमुळे अनेक रोगराईमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणसुद्धा कमी झालेले आहे.

आरोग्य/सुरक्षा वस्तूंचे वेगवान उत्पादन सुरू
चीनमधून येणाऱ्या औषधांच्या कच्च्या मालाची आयात बंद करून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू, जपान, चीनमधील गुंतवणुका बाहेर हलवणार व अमेरिका चीनकडून आयात थांबवणार. याचा भारतीय उद्योगाला मोठा फायदा होणार आहे.
निसर्ग, पृथ्वी स्वत:ला दुरुस्त करत आहे. होय, प्रकृती स्वतःला ‘रिबूट’ करत आहे. गंगा नदीचे पाणी शुद्ध होतेय, ओझोन कवचाचे जिथे छिद्र पडत आहे, ते ओझोन कवच आता स्वतः सुधारत आहे. हो, कोरोनाची भीती आहेच, त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे, पण, तुलना करता रोज रस्त्यावरील अपघात आणि इतर अनेक कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा आज थांबलेला आहे, जो कोरोनाच्या आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त असता, म्हणून सरकार म्हणत आहे की, घरीच राहा. त्यांचे तर ऐकाच, पण या निसर्गाचेसुद्धा ऐका आणि घरी राहा. आता निसर्गाला विश्रांतीची गरज आहे, त्याला विश्रांती घेऊ द्या. पुढे शुद्ध वातावरण, निसर्ग आपली वाट पाहतो आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा ना? मग आता घरी थांबावे. ही निसर्गाची हाक आहे संपूर्ण मानवजातीला. ‘लॉकडाऊन’ने एवढी साधन संपत्ती वाचत असेल, तर सर्व जगाने स्वयंस्फूर्तीने दरवर्षी एक आठवडा तरी जागतिक ‘लॉकडाऊन’ पाळावा.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@