लाॅकडाऊनच्या गेल्या पंधरा दिवसात देशात दहा वाघांचा मृत्यू

17 Apr 2020 19:56:37
 tiger_1  H x W:

 
 
'एनटीसीए'च्या 'टायगर नेट' संकेतस्थळाची माहिती

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनच्या गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशभरात एकूण दहा वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'च्या (एनटीसीए) 'टायगर नेट' या संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामधील बहुतांश वाघांचा मृत्यू हा संरक्षित वनक्षेत्रांमध्ये झाला आहे. पंधरा दिवसांमध्ये दहा वाघांचा मृत्यू होणे ही चिंतेची बाब आहे.
 
 
 
 
 
 
 
जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतामध्ये अधिवास करतात. काही महिन्यांपूर्वी भारताच्या व्याघ्र गणनेचे चौथे अंदाजपत्रक प्रसिद्ध झाले. त्यानुसार देशात २,९६७ वाघांचे अस्तिव आहे. कोरोनामुळे देशभरात गेल्या महिन्याभरापासून लाॅकडाऊन आहे. अशा परिस्थितीत विविध व्याघ्र प्रकल्पांमधून वाघांच्या मृत्यूच्या बातम्या समोर आल्या आहेत. 'टायगर नेट' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या पंधरा दिवसात दहा वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्यप्रदेशात ४, तामिळनाडूत ३ आणि उत्तराखंड, केरळ व आसामधील प्रत्येकी १ वाघाचा समावेश आहे. तामिळनाडूमधील 'अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पात डुक्करा'चे विषारी मांस खाल्याने वाघाच्या जोडीचा मृत्यू झाला. तर 'मुदूमलाई अभयारण्या'त १३ एप्रिल रोजी एक वाघ मृतावस्थेत आढळला. महाराष्ट्रातील 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पा'मधील 'टी-२३' हा वाघ मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरमध्ये ११ एप्रिल रोजी मृतावस्थेत सापडला. गाईवर विषबाधा करुन त्याला मारल्याचे चौकशीतून निष्षन्न झाले आहे.
 
 
 

tiger_1  H x W: 
 
 
 
 
'कान्हा व्याघ्र प्रकल्पा'मध्ये दोन वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३ एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील 'पेंच व्याघ्र प्रकल्पा'त मृतप्राय अवस्थेत आढळून आलेल्या वाघाचा दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तराखंडमधील रामनगर वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या वाघाचा मृतदेह ११ एप्रिल रोजी वन विभागाने ताब्यात घेतला. दोन दिवसांपूर्वी आसाममधील 'काझिरंगा राष्ट्रीय उद्याना'त देखील वाघाचा एक मृत्यदेह आढळून आला. महत्त्वाचे म्हणजे यातील सात वाघांचे मृतदेह हे संरक्षित वनक्षेत्रात आढळून आल्याचे 'टायगर नेट'ने नमूद केले आहे. यासंदर्भात वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी सांगितले की, सर्वसामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाघांच्या शिकारीचे प्रमाण जास्त असते. कारण, पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने वाघांचा वावर हा पाणवठ्यांवर मर्यादित झालेला असतो. अशावेळी शिकारी निरनिराळ्या पद्धतीने वाघांची शिकार करतात. सध्या लाॅकडाऊनमुळे जंगलामध्ये वनकर्मचाऱ्यांचा वावर कमी झालेला नसला, तरी  स्थानिक शिकाऱ्यांचा वावर वाढल्याची शक्यता रिठे यांनी वर्तवली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0