रेल्वेच्या नियंत्रण कक्षातील कर्मचारी खरे नायक

17 Apr 2020 22:22:29

central railway_1 &n
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर ३ मेपर्यंत लॉकडाऊन असले तरी रेल्वेतर्फे अन्न, पेट्रोलियम पदार्थ, वीज निर्मितीसाठी कोळसा, वस्तूंच्या मालगाड्या आणि पार्सल गाड्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सतत काम सुरू आहे. यात रेल्वेच्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांची खास भूमिका आहे. तेच खरे नायक आहेत.


मध्य रेल्वेचे नियंत्रण कार्यालयाचे मुख्यालय मुंबई येथे असून ते पाच विभांगातील विभागीय नियंत्रण कार्यालये नियंत्रित करते. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश असलेल्या दररोज सुमारे ७५ मालगाड्या (रेक) लोड आणि अनलोड होत आहेत. चोवीस तास कार्यरत असलेल्या गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील रेल्वे कर्मचार्‍यांनी १५ एप्रिल दरम्यान १,१०२ मालगाड्यांमध्ये (रॅक) ५५,१४२ वॅगन आवश्यक वस्तू लोड करणे शक्य केले आहे. यासह सुमारे १३८ पार्सल गाड्या चालविल्या जात आहेत. त्याद्वारे देशातील कानाकोप-यात औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग इत्यादी जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत. एक आव्हान म्हणून उपलब्ध मनुष्यबळासह मालगाड्या आणि पार्सल गाड्यांच्या कामकाजाचे अनुकूलन करण्याचे काम आणि देशसेवेमध्ये पूर्ण निष्ठा व समर्पणाने काम पार पाडण्याचे काम सर्व अधिकारी करीत आहेत. मालवाहतूक आणि पार्सल गाड्यांचे सुसूत्रीकरण करणारे नियंत्रण कार्यालयातील कर्मचारी खरे नायक आहेत, असे मध्यरेल्वेने त्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0