मुंबईत 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नसल्याचे स्पष्ट

17 Apr 2020 16:24:22
community transmission_1&

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा दावा


मुंबई : राज्याच्या तुलनेत मुंबईत कोरोनाची आकडेवारी सर्वाधिक असली तरी अजूनही 'कम्युनिटी ट्रान्समिशन' नसल्याचे 'फिव्हर क्लिनिक'च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. महापालिकेने केलेल्या 'फिव्हर 'क्लिनिक'मधील तपासणीत ९१२ व्यक्तींच्या नमुन्यांपैकी पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळले. या पाच व्यक्तीही प्रवास केलेले व त्यांच्या निकटच्या संपर्कात असणारे होते, ही बाब दिलासा देणारी असल्याचे पालिकेने म्हटले आहे.


कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र असले तरीही पालिकेची आरोग्य यंत्रणा स्वस्थ बसलेली नाही. या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा दिवसरात्र राबते आहे. कोरोनाचा संसर्ग गावठाणे, चाळी, झोपडपट्ट्यांत पोहचला आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. हा संसर्ग तिस-या टप्प्यात पोहचू नये यासाठी पालिकेने यंत्रणा उभारली आहे. ज्या भागात कोरोना संसर्गाचे जास्त रुग्ण सापडले आहेत, अशा वसाहतीत विविध उपाययोजना करून संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाते आहे.


ज्या भागात 'कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, अशा भागांमध्ये किंवा त्यालगतच्या परिसरात महापालिकेद्वारे 'फिव्हर क्लिनिक'चे आयोजन करण्यात येत आहे. या 'क्लिनिक'मध्ये बाधित रुग्णांच्या इमारतीत किंवा लगतच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. यानुसार महापालिकेने आजवर ९७ 'फिव्हर क्लिनिक' चे आयोजन केले आहे. या 'क्लिनिक'मध्ये आतापर्यंत ३ हजार ५८५ व्यक्तींची कोरोना विषयक प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यापैकी निर्धारित निकषांनुसार ९१२ व्यक्तींचे नमुने आवश्यक त्या तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्यानंतर ५ व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले आहे. हे पाच व्यक्तीदेखील 'ट्रॅव्हल हिस्टरी' असणारे वा ट्रॅव्हल हिस्टरी असणाऱ्यांच्या निकटच्या संपर्कात असणारे होते, असे पालिकेने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0