मालेगाव : एक कोडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Apr-2020   
Total Views |

godakath_1  H x



नाशिक शहरात अनोळखी व्यक्तीला विचारले की, “आपण कुठले आणि उत्तर आले, मालेगावचे?” तर सहज तोंडून पडते, इथेच राहा जाऊ नका तिकडे. जातीय दंगलींच्या केंद्रस्थानी असणारे मालेगाव मागील काही वर्षांपासून शांत होते. त्यामुळे मालेगावची ‘दंगलीचे शहर’ ही ओळख जवळपास मिटली होती. मात्र, सध्या नाशिक जिल्ह्याचे ‘कोरोना हॉटस्पॉट’ म्हणून मालेगाव समोर येत आहे, ही बाब निश्चितच चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.


प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात आपले कुळ आणि आपले गाव याचा अभिमान असतो. आपल्या गावाचा इतिहास आणि गावाची माहिती हा तर जिव्हाळ्याचा विषय. नाशिकसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात अनेक खेडी, तालुके आहेत आणि आपल्या गावाचा अभिमान बाळगणारे लोकही. गावाचा अभिमान बाळगणे गैर नाही. मात्र, तेच गाव एखाद्या व्यक्तीमुळे कुपरिचित झाले तर मात्र, पुढील अनंत काळापर्यंत ‘अमुक अमुक घटना घडली ते तुमचे गाव काय हो?’ हा प्रश्न काही पाठ सोडत नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर भूकंप ही आजही लातूरची ओळख आहे. कर्नाटकातील भटकळ हे तेथील समुद्र किनार्‍यापेक्षा यासिन भटकळमुळेच ओळखले जाते. सध्याच्या कोरोनाच्या स्थितीत नाशिक जिल्ह्यातील मालेगावची ओळख आगामी काळात ‘कोरोनाचे मालेगाव काय’ अशी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना जगभर आहे. त्यात मालेगावचा एकट्याचा काय दोष, असाही विचार मनात येतो. तेव्हा उत्तर मिळते दोष मालेगावचा नाही, की मालेगावकारांचा नाही; दोष तेथील काही ठराविक नागरिकांच्या वर्तनाचा आहे. मालेगावच्या मोसम नदीच्या ऐलतीरावर आणि पैलतीरावर मालेगाव पूर्व आणि मालेगाव पश्चिम असे दोन भाग विसावले आहे. मालेगाव पूर्व हा मुस्लीम बहुल म्हणून, तर मालेगाव पश्चिम हा हिंदुबहुल म्हणून ओळखला जातो. कोरोनाचा प्रसार झाला तो मालेगाव पूर्व मध्येच. दिल्ली येथून नाशिक जिल्ह्यात दाखल झालेल्या 35 पैकी 30 नागरिक हे मालेगावमधील. त्यात ही पूर्व भागातील जास्त. मरकज प्रकरणात कोरोना रुग्ण समोर आले तेव्हा जिल्हा प्रशासनाने वारंवार नागरिकांना स्वतःहून समोर येण्याचे आवाहन केले. मात्र, प्रतिसाद देतील ते हे नागरिक कसले? त्यानंतर येथील ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी हॉस्पिटलमध्ये जात वैद्यकीय अधिकार्‍याला मारण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवारी केल्याने या आमदार महोदयांना प्रशासनाने ‘होम क्वारंटाईन’ केले असतानाही यांनी कार्यकर्ता संमेलन आपल्याच घरात घेतले. प्रशासनाने सुनावले तेव्हा महोदय जमिनीवर आले. त्यानंतरदेखील आरोग्य कर्मचार्‍यांना धमकविणे, रुग्णवाहिकाचालकावर थुंकणे, प्रशासनाचे आदेश धुडकावणे असे मस्तवाल वर्तन येथे घडले. त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र, असे बेताल वर्तन कमी होण्याऐवजी ते वाढविणे यातच येथील काहींनी धन्यता मानली. मालेगाव पूर्वमध्ये इस्पितळे असतानादेखील मालेगाव पश्चिममध्ये पूर्वचे रुग्ण दाखल करण्याचा अट्टहास काही लोक करत असल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे जाणीवपूर्वक मालेगाव पूर्वमधील कोरोनाचे लोण मालेगाव पश्चिममध्ये आणण्याचा हा डाव आहे, असे काहींचे मत आहे. खरेतर, राजकीय नेते आणि धर्मगुरूंचे असणारे पाठबळ हेच या उद्दाम वर्तनामागील कारण आहे असावे, अशी शंकादेखील यामुळे आता व्यक्त केली जात आहे.


कोरोनापर्व सुरू झाले तेव्हा नाशिक जिल्हा बराच काळ ‘नो कोरोना’ जिल्हा होता. लासलगावमधील रुग्णाद्वारे या कोरोनापर्वास नाशिकमध्ये सुरुवात झाली. आता नाशिक जिल्हा ‘रेड झोन’मध्ये गेला आहे. जिल्ह्याला ‘रेड झोन’मध्ये पाठविण्यात मालेगावमधील वाढणार्‍या रुग्णसंख्येचा मोठा हातभार आहे, हे नाकारता येऊच शकत नाही. कोरोना आणि त्याचे दुष्परिणाम येथील या उद्दाम वर्तन करणार्‍या नागरिकांना माहीत नाही असे नाही. मात्र, कमालीचा धर्मांधपणा आणि मोदीद्वेष यामुळे ही मंडळी असे वर्तन करत असल्याचे येथील नागरिक खाजगीत सांगतात. केंद्रात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसते आणि अन्य कोणी असते, तर कदाचित या काही नागरिकांचे वर्तन असे नसते, अशीही प्रतिक्रिया ऐकावयास मिळते. हे सर्व एक भयाण स्थिती निर्माण करणारे नक्कीच आहे. आपल्या मातीशी आपली नाळ जुळलेली असते. त्यामुळे आपण तिचा सन्मान करत असतो. देशप्रेमाची सुरुवात ही ‘घर ते देश’ या पातळीवर होत असताना हे देशप्रेम ‘व्हाया आपले गाव’ जात असते. मात्र, आपल्या वर्तनाने आपल्या गावाचेच नाव खराब करणार्‍या या काही उद्दाम नागरिकांच्या मनात राष्ट्रप्रेम तरी आहे काय, असा प्रश्न आता आगामी काळात इतर नागरिकांना भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मालेगावमध्ये आगामी काळात जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होण्याचीदेखील शक्यता आहेच. आपल्या धर्मगुरूंचा आदेश इतका पराकोटीचा मानून धर्मालादेखील अभिप्रेत असणारे वर्तन न करणे, केवळ एका व्यक्तीचा द्वेष करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणे हे मानवी मन आणि सद्सद्विवेक बुद्धीवर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. मालेगाव हा वेगळा जिल्हा असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. ही मागणी वेळीच पूर्ण केली असती तर आज नाशिकचे नाव खराब झाले नसते, अशी प्रतिक्रियादेखील आता समाजमनात उमटू लागली आहे.


असे बोल ऐकू येणे, असा विचार मनात येणे हे नक्कीच चिंताजनक आहे. मालेगावमध्ये राज्याचे कृषिमंत्रीपद भूषविणारे दादाजी भुसे प्रतिनिधित्व करतात. त्यांनीही सहकार्याचे अनेकदा आवाहन केले. मात्र, आपल्याच लोकप्रतिनिधींचे देखील ऐकायचे नाही, असा चंगच येथील काही उद्दाम नागरिकांनी बांधला असल्याचे त्यांच्या कृष्णकृत्यांवरून दिसून येते. मालेगाव पूर्वपासून उत्तर महाराष्ट्राला धोका आहे. तो भाग ‘सील’ करण्यात यावा, अशी मागणी खा. डॉ सुभाष भामरे यांनीदेखील केली आहे. अशा प्रकारे होणार्‍या मागण्या या येथील स्थितीची भीषणता आणि येथून होणार्‍या उपद्रवमूल्याची जाणीव करून देण्यासाठी नक्कीच बोलक्या आहेत. त्यामुळे मालेगाव हे एक न सुटणारे कोडे आहे काय, असाच प्रश्न आता समोर येत आहे. अजूनही वेळ गेली नसून आपल्या गावाची ओळख ही आपले उद्दाम वर्तन ठरू नये आणि जगाच्या पाठीवर कोठेही असणार्‍या सच्च्या मालेगावकरास समस्यांचा सामना करताना शरमेने मान खाली घालावी लागू नये, यासाठी या उद्दामस्वरांनी आपले वर्तन वेळीच सुधारणे नक्कीच आवश्यक आहे.
@@AUTHORINFO_V1@@