ताडोबा दर्शन आता 'आॅनलाईन'; घसबसल्या घ्या 'आॅनलाईन सफारी'चा आनंद

17 Apr 2020 12:28:40
tiger_1  H x W:

 

 
 दररोज दुपारी ३ वाजता प्रक्षेपण
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जगप्रसिद्ध 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा'मधील समृद्ध निसर्गाचा आनंद आता आपल्याला घरबसल्या लुटता येणार आहे. ताडोबातील जैवविविधतेचे दर्शन घडविणारा व्हिडीओ दररोज आॅनलाईन प्रक्षेपित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ताडोबाचे संकेतस्थळ आणि खास या उपक्रमासाठी तयार केलेल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडीओचे प्रक्षेपण सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे चार भिंतीत कैद झालेल्या निसर्ग आणि ताडोबाप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
देशभरात लागू असलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. ३० एप्रिल पर्यंत या सर्व संरक्षित वनक्षेत्रांमधील पर्यटन बंद आहे. एप्रिल ते जून या कालावधीत 'ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा'त मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल असते. मात्र, यंदा प्रकल्प लाॅकडाऊनमुळे बंद आहे. त्यामुळे ताडोबाप्रेमी पर्यटाकांचा हिरमोड झाला आहे. यावर प्रशासनाने तोडगा म्हणून ताडोबाच्या आॅनलाईन दर्शनाला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील क्रूगर राष्ट्रीय उद्यानात लाॅकडाऊनमुळे आॅनलाईन सफारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ताडोबा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ताडोबाच्या https://mytadoba.org/ हे संकेतस्थळ आणि 'TATR 4K LIVE' (https://www.youtube.com/channel/UCzj_lZkssvEhK3GykJ0A1sw) या युट्यूब चॅनलवरुन निसर्गप्रेमींना दररोज घरबसल्या ताडोबाच्या निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे. या माध्यमांवरुन दररोज दुपारी तीन वाजता व्हिडीओचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
 
 
नेटवर्कची अनुपलब्धता आणि तांत्रिक कारणामुळे ताडोबामधून लाईव्ह प्रक्षेपण करु शकत नाही. त्यामुळे आदल्या दिवशी या संपूर्ण व्हिडीओचे आम्ही छायाचित्रण करत असल्याची माहिती ताडोबा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली. या छायाचित्रणाची योग्य प्रकारे काटछाट करुन त्याला आवाज देऊन आम्ही तो संकेतस्थळ आणि युट्यूब चॅनलवर टाकत असल्याचे त्यांनी सांगितले. हे व्हिडीओ तयार करण्याचे काम दररोज सुरू असून प्रकल्पातील वेगवेगळ्या वनपरिक्षेत्रांचे दर्शन यामाध्यमातून पर्यटकांना होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0