कोरोना नव्हे 'एनआरसी' सर्वेक्षणासाठी आल्याची अफवा उठवत डॉक्टरांना मारहाण

16 Apr 2020 20:48:08
File Pic _1  H





मालेगाव :
आपल्या जीवावर बेतून जिथे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी गल्लोगल्ली जाऊन कोरोना चाचणीचे सर्वेक्षण करत आहेत, तिथेच काही समाजकंटकांनी त्यांच्यावर एनआरसी सर्वेक्षण करत असल्याचा आरोप लावत मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला आहे.

शहरात कोरोना विषाणूचा उद्रेक येथे सुरू असताना गुरुवारी सात वर्षीय बालिकेचा तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या ३० वर पोहोचली. यात एका तरुणीसह इसमाचा मृत्यूदेखील झाला आहे. विषाणूंचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेतर्फे घरोघरी सर्वेक्षण सुरू झाले आहे. मात्र, हे सर्वेक्षण ‘एनआरसी’चे केले जात असल्याचा गैरसमज पसरवून काही जणांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण झाली आहे. 

सर्वेक्षणास पथके येताच घराचे दरवाजे लावण्यात येऊन पथकास गल्ली मोहल्ला परिसरात शिरू दिले जात नव्हते. सर्वेक्षणास मिळत नसलेल्या प्रतिसादामुळे संशयित रुग्ण शोधायचे आव्हान ठाकले आहे. दरम्यान, सर्वेक्षणात गैरसमजातून होत असलेल्या विरोधाची गंभीरतेने दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंग आदी वरिष्ठ अधिकार्‍यांनी मालेगावी धाव घेत कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यासह स्थानिक आमदार माजी आमदार, महापौर आदी लोकप्रतिनिधींसह स्थानिक अधिकार्‍यांची बैठक घेतली. सर्वेक्षणासहोत असलेल्या विरोधाचा तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. 

आरोग्य सेविकेला घरात डांबले

गोल्डन नगर भागात तर आशा सेविकेस महिलांनी घरात डांबले, तर अंगणवाडी सेविकेच्या पतीस कमालपुरा भागात मारहाण करण्यात आली. ठिकठिकाणी होत असलेल्या विरोधामुळे भयभीत झालेल्या सर्वेक्षण पथकातील सेवकांनी मनपा आयुक्त व आरोग्य अधिकार्‍यांची भेट घेत सर्वेक्षणास होत असलेल्या विरोधाकडे लक्ष वेधले. शिवीगाळ व दमदाटीचे प्रकार घडत असल्याने पोलीस बंदोबस्त दिला जावा, अशी मागणी सेवकांतर्फे केली गेली. 
 

आमदार मौलाना मुक्ती, तसेच मौलाना सुखी गुलाम रसूल, डॉ. सईद फाराणी यांच्यासह कुल जमात तंजीमच्या धर्मगुरुंनी प्रार्थनास्थळ मिळून कोरोनाचे संकट दर करण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि आरोग्य तपासणी करून घेण्याचे तसेच सर्वेक्षणास आलेल्या पथकास विरोधन कर एनआरसीचा नसून कोरोना रोखणारा असल्याचे प्रार्थनास्थळांमधून नमाजप्रसंगी धर्मगुरुंतर्फे सांगितले गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार्‍या सर्व्हेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाला आहे. या सर्व्हेचा ‘एनआरसी’ व ‘एनपीआर’ याच्याशी काही संबंध नसून याबाबत स्वयंसेवकांमार्फत वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात पावरलूम चालविणारा मोठा मजूरवर्ग आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात संपूर्ण पावरलूम यंत्रणा बंद असल्यामुळे मजुरांमध्ये भीतीसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने ३१ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित केला असून सर्व खाजगी आस्थापना, कारखाने, कंपन्या, दुकाने (अत्यावश्यक सेवा आस्थापना वगळून) इत्यादी आस्थापनांचे सर्व कामगार ज्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार घरी, स्थानबद्ध राहावे लागत आहे, असे सर्व कामगार हे कर्तव्यावर असल्याचे समजण्यात यावे व त्यांना संपूर्ण वेतन व भत्ते अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी खाजगी सर्व आस्थापनांनी या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त माने यांनी दिले.





 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0