उत्तरप्रदेश : कोरोनाच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान देत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी व पोलीस प्रशासनावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये मागील दिवसांपासून वाढ होत आहे. मुरादाबादमध्ये तर वारंवार अशा घटना समोर येत आहेत. काल दुसऱ्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेकीची घटना समोर आली. यात तपासणीसाठी गेलेले डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. उपचारादरम्यान डॉक्टरांनी या संपूर्ण घटनेचे तपशील दिले. यात ही घटना पूर्वनियोजित होती असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
तपास पथकासह दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेले डॉ. एससी अग्रवाल म्हणाले, “आम्ही मुरादाबादच्या नवाबपुरा येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या कुटूंबांतील ४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यासाठी घ्यायला गेलो. आम्ही त्यांना घेऊन रुग्णवाहिकेत बसताच काही लोकांनी आम्हाला घेरले आणि आमच्यावर हल्ला केला." ते पुढे म्हणतात कि, या घटनेचे काही व्हिडीओदेखील समोर आले आहे ज्यात आपण पाहू शकतो की, काही महिला व दगडफेक करणारे स्पष्ट दिसत आहेत. काही महिला या घराच्या छतावरून मोठ्या विटा व दगड आमच्या दिशेने फेकत होत्या.यानंतर तिथे आलेल्या एका वयस्कर व्यक्तीने आमचे प्राण वाचविले. तेवढ्यात तिथे पोलीसही दाखल झाले.
या घटनेचा सोशल मीडियावरूनही संताप व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेविरोधात कठोर भूमिका घेत दोषींवर रासूका (एनएसए) लादण्याचे व आरोपींच्या मालमत्तेतुन झालेल्या नुकसान भरपाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींची ओळख पटवत लोकांना ताब्यात घेतले. यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. महिलांनी छतावरून विटांचा व दगडांचा वर्षाव सुरु केला. ज्याची खात्री ड्रोन कॅमेर्याच्या आधारे केली गेली.
डॉक्टरांसमवेत उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्याभागातील जमावाने तपासणी पथकावर हल्ला करण्याची तयारी आधीच करून ठेवली होती. या दगडफेकीच्या घटनेत पोलिसांची गाडी व रुग्णवाहिका आदींचे मोठे नुकसान झाले आहे.मुरादाबादमधील नागफनी परिसरातील नवाबपुरास्थित सरताज अली हे हाजी नेब वाली मशिदी जवळ राहत होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला. डॉ एस.सी. अग्रवाल यांच्या नेतृत्वात आठ सदस्यीय पथक बुधवारी (१५ एप्रिल २०२०) त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना वेगळे ठेवण्यासाठी हाजी नेब वाली मशिदीत पोहोचले. त्याचवेळी, त्याची टीम या हल्ल्याचा बळी ठरली. सध्या संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले आहे.