'लॉकडाऊन' हा कोरोनावरील उपाय नाही : राहुल गांधी

16 Apr 2020 19:58:12
Rahul Gandhi_1  
 
 
नवी दिल्ली : देशात सध्या लागू असलेले 'लॉकडाऊन' हा कोरोनावरील उपाय नाही. 'लॉकडाऊन'मुळे कोरोना संपुष्टात आला नसून केवळ काही काळासाठीटाळला गेला आहे. त्यामुळे देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरूवारी  व्यक्त केले.
 
राहुल गांधी यांनी निवडक पत्रकारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'ल़ॉकडाऊन' हा कोरोनास पराभूत करण्याचा उपाय नाही, त्यामुळे धोका दूर झाला नसून काही काळासाठी टाळला गेला आहे. मात्र, यातून मार्ग काढण्यासाठी चाचण्या करण्याची पद्धती बदलण्याची गरज आहे. जेथे अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही, अशा ठिकाणी चाचण्या करण्याची गरज आहे. जेणेकरून रुग्णांची संख्या अचानक वाढणार नाही.
 
सध्याची परिस्थिती ही आणिबाणीसारखी असून एकत्रितपणे या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यांना अधिक अधिकार आणि संसाधने पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यांना त्याचां 'जीएसटी' परतावा तातडीने देण्यात यावा. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0