जित्याची खोड...

    दिनांक  16-Apr-2020 21:34:54   
|


sudi arabia_1  

 


कोरोनामुळे जग बदलले, असे म्हटले जाते. काही बाबतीत ते खरेही आहे, पण काही बाबतीत ते खरे नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, कुत्र्याची शेपटी नळीत घाला की चुलीत घाला ती वाकडी ती वाकडीच! त्याचप्रमाणे काही संस्था, काही व्यक्ती आणि काही देशांचेही आहे. जगभरात त्यांची जी काही बरीवाईट ख्याती आहे, ती त्यांनी अजिबात सोडलेली नाही.

 

जसे भारतीय उत्सवप्रिय आहेत, तर कोरोनाच्या काळातही त्यांनी आपली कौटुंबिक अगदी वैयक्तिक का होईना, उत्सवप्रियता कायम ठेवली. थाळी वाजवणे किंवा दीपप्रज्वलन करणे या गोष्टीत भारतीय तसूभरही मागे हटले नाहीत, तर दुसरीकडे पाकिस्तान. रडून भेकून भीक मागणे हा या देशाचा जन्मजात स्वभाव. तो स्वभाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर आणखीनच उठावदार झालेला आहे. कोरोनासाठी मदतीची याचना करताना या देशाने स्वत:च ज्या देशाला अखंड शत्रू मानले, त्या भारताकडेही मदतीची याचना केली आहे. मात्र, हे करत असताना दहशतवादी कारवाया पाकिस्तानने सोडल्या का? याचे उत्तर ‘नाहीच’ आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:ला बलाढ्य अमेरिकेचेही वर्तन काय आहे? तर, यापूर्वीही अमेरिका जगभरातल्या देशावर निर्बंध, नीतिमत्ता, मानवी अधिकाराच्या नावावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करायची. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात काही बदल झाला आहे का? तर उत्तर आहे ‘नाहीच.’ आता वळूया चीनकडे. चीन या देशाचे नाव ऐकताच बहुतेकांच्या कपाळावर आठ्या याव्यात, असेच आजपर्यंत या देशाचे वर्तन. यापूर्वीही आजूबाजूच्या शेजारच्या छोट्या छोट्या देशांना येनकेन प्रकारे सतावण्यामध्ये चीनने प्रावीण्य मिळवलेले होतेच. दुसर्‍याला त्रास देण्याची प्रचंड विखारी इच्छा असलेल्या चीनमध्ये कोरोनामुळे काही बदल झाला आहे का? तर याचेही उत्तर ‘नाहीच’ म्हणावे लागले. भारतामध्ये जशी गंगा नदी पूजनीय, जीवनदायिनी आहे, तसेच चीनमध्ये मेकांगही नदी खूपच पवित्र मानली जाते. चीनमधली ही नदी पुढे म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम या पाच देशांमधून प्रवाहित होते. या पाचही देशातली अर्थव्यवस्था काही प्रमाणात मेकांग नदीवर अवलंबून आहे. थोडक्यात, मेकांग नदी ही पाचही देशांची जीवनदायिनी नदी आहे. सध्या चीनच्या कृपेने जगभरात कोरोनाचे थैमान आहे. या असल्या परिस्थितीमध्ये चीनमध्येही परिस्थिती तणावाची दिसते. मात्र, याही परिस्थितीमध्ये चीनने काय करावे? तर चीनने मेकांग नदीवर धरण बांधले आणि नदीचे पाणी अडवून धरले आहे. त्याचा फटका म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम या देशाला बसला आहे.
 

कोरोनाशी लढावे की देशातील पाणी समस्येविरुद्ध लढावे, या विवंचनेत हे देश आहेत. चीनचे उपद्रवमूल्य थोडेही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियामध्ये काय चालले आहे, तर तिथेही कोरोनामुळे देश त्रासात आहेच. पण, याही परिस्थितीमध्ये सौदी राजघराण्याची दडपशाही काही थांबत नाही. लाल समुद्रामध्ये नियोम हे ‘स्मार्ट शहर’ वसवायचे असे सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील युवराज मोहम्मद बिन सलमान यांची इच्छा आहे. सौदीच्या ताबूक प्रांतामध्ये हे काम सुरू आहे. इथे ‘अल हुवैता’त नावाचा जातिसमूह राहतो. तो स्वत:ला ‘मोहम्मद’ यांची कन्या फातिमा यांचे वंशज मानतो. या समूहाच्या मते, ताबूक हे त्यांचे मूळस्थान आहे. मात्र, नियोम शहर वसवताना या शहरातून हुवैतात समूहाला बाहेर काढले जात आहे. हुवैतात समाज ताबूक प्रांत सोडण्यास नकार देत आहेत. चित्र असे आहे की, नकार देणारे लोक बेपत्ता होत आहेत. काहींचे खुलेआम खून होत आहेत. सध्या ‘अल हवैती हैल्स’ हे प्रकरण सौदीमध्ये गाजत आहे. अल हवैती नामक नागरिक ताबूक प्रांत सोडण्यास तयार नव्हता. सौदी सरकार दडपशाही करते आहे, असे तो सातत्याने प्रसारमाध्यमातून सांगत होता. नकार देणारे आपले नऊ शेजारी बेपत्ता झाले असून आपलेही काही खरे नाही, असेही त्याने एका व्हिडिओमध्ये सांगितले आणि नेमके झालेही तसेच. तो त्याचा शेवटचा व्हिडिओ ठरला. त्यानंतर त्याला गोळी घालून ठार मारण्यात आले. याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. थोडक्यात, सौदी प्रशासनाच्या मनोवृत्तीमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीच बदल झालेला नाही. कारण, दुसरी म्हण तयारच आहे, ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.’ दुसरे काय?

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.