‘डब्ल्यूएचओ’ची ‘ट्रम्प’कोंडी

    दिनांक  15-Apr-2020 22:06:50   
|
Donald Trump WHO_1 &
जग कोरोनाच्या विळख्यात झपाट्याने गुरफटत असताना ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या महासत्ता म्हणून मिरवणार्‍या अमेरिकेने अशाप्रकारे आर्थिक नाड्या आवळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय व्यवहार्य ठरेल की हे संकट आणखी गडद करेल, हे येणारा काळच ठरवेल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या सर्व पत्रकार परिषदांमध्ये कोरोना महामारीबद्दल बोलताना कोरोना विषाणूचा उल्लेख वारंवार ‘चिनी विषाणू’ (Chinese virus) असाच करतात. ही बाब लक्षात आल्यानंतर एका महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, “तुम्ही या विषाणूला नुसतं ‘कोरोना’ का म्हणत नाही? कारण, हा विषाणू आता फक्त चीनपुरता मर्यादित नाही, तर जगभरात त्याचा शिरकाव झाला आहे.” मात्र, त्या पत्रकाराला थोडेसे रोखत ट्रम्प आपल्या नेहमीच्या शैलीत म्हणाले की, ‘’होय, हा फक्त चिनी विषाणू आहे. जगभरात ही महामारी पसरली, त्याला चीनच जबाबदार आहे,” असे ट्रम्प आक्रमकपणे पटवून देतात. तसेच चीनने कोरोनाच्या मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप यापूर्वी अमेरिकेने केला आहेच. तसेच या दृष्टीने चीनने जागतिक पारदर्शकताही ठेवलेली नाही, असा आरोपही अमेरिकेने केला आहे.
 
 
इतकेच नाही तर चीनला पाठीशी घालण्यात ‘जागतिक आरोग्य संघटने’ची भूमिका महत्त्वाची आहे, असाही आरोप अमेरिकेने केला. वुहान मार्केटमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूचे गांभीर्य जागतिक आरोग्य संघटनेने वेळीच ओळखले असते, त्यावेळी उपाययोजना करण्याचे निर्देश जगाला दिले असते, तर ही वेळच आली नसती, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. यातील तथ्य काहीअंशी नाकारताही येत नाही. केवळ अमेरिकाच असा आरोप करते असे नाही, तर जपाननेही असाच आरोप करत ‘जागतिक आरोग्य संघटने’चा निधी गोठवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ‘जागतिक आरोग्य संघटने’वरील संशयाची सुई कायम राहते.
 
 
ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, आखाती देश, जपान, अमेरिका, पाकिस्तान वगळता अन्य आशियाई देश जिथे एकत्र येऊन या जागतिक संकटाविरोधात उभे राहण्याची तयारी दर्शवतात, तिथे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका बरंच काही सांगून जाते. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने चीनमध्ये शिजत असलेल्या या महामारीच्या संकटाला वेळीच ओळखले होते का? ओळखले होते तर ही माहिती लपवली का? यापूर्वीही चीनमध्ये आलेल्या ‘सार्स’ या विषाणूमुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यावेळचा धोका ओळखून किमान हवाई मार्ग बंद ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे शक्य झाले नसते का, हे असेच अनेक ‘जर-तर’चे प्रश्न आता उपस्थित होताना दिसतात.
 
 
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’वर घातलेल्या आर्थिक बहिष्काराबद्दल विचार केला तर ट्रम्प यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचेही म्हणता येणार नाही. अमेरिका दरवर्षी तब्बल ४०० ते ५०० दशलक्ष डॉलर (तीन हजार कोटी) इतकी मदत ‘डब्ल्यूएचओ’ला करते. ही मदत चीनपेक्षा जास्त आहे. या खालोखाल जपानचे योगदान आहे. साहजिकच या योगदानाचा योग्य तो उपयोग व्हावा, अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही. संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत येणार्‍या एखाद्या महत्त्वाच्या संघटनेला जगात महामारीचे थैमान असताना, अशाप्रकारे लक्ष्य करणे कितपत योग्य, हादेखील प्रश्न उपस्थित होतो.
 
 
‘डब्ल्यूएचओ’ची स्थापना होऊन आज ७० वर्षे उलटून गेली आहेत. या काळात जगाने अशा अनेक संकटांना तोंड दिले. यात ‘डब्ल्यूएचओ’चे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. आणीबाणीच्या या काळात 194 देशांना ही संघटना मार्गदर्शन करत आहे. जगभरात या संघटेनेच्या एकूण १५० कार्यालयांमध्ये सात हजार कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या काळात जिथे जगाला संशोधनाची अत्यावश्यक गरज आहे, तसे संशोधन करणारी मान्यताप्राप्त आणि विश्वासू संस्था आजमितीलाही उपलब्ध नाही. सध्यातरी ‘जागतिक आरोग्य संघटने’वर राजकीयदृष्ट्या आरोप करून तेथील संशोधकांचे, कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात कुठलाही शहाणपणा नाही. परिस्थिती सावरल्यानंतर याबद्दल विचार करणे क्रमप्राप्त ठरेल.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.