आता कासवांच्या पिल्लांना समुद्रात जाताना 'आॅनलाईन' पाहा; 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'चा उपक्रम

    दिनांक  15-Apr-2020 21:18:44   
|
turtle _1  H x

 

वेळासच्या किनाऱ्यावरुन दररोज लाईव्ह प्रक्षेपण
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - लाॅकडाऊनमुळे कोकणात होणारा 'कासव महोत्सव' यंदा रद्द झाला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांना समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना पाहण्याची संधी हुकली आहे. यावर वन विभागाच्या 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने तोडगा काढला आहे. समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना घरबसल्या आॅनलाईन पाहण्याची संधी त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी फाऊंडेशनच्या सोशल मिडिया हॅण्डलवरुन दररोज सकाळी आणि संध्याकाळी वेळासच्या किनाऱ्यावरून लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किनाऱ्यांवर दरवर्षी आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी देतात. या अंड्यांमधून बाहेर पडणाऱ्या पिल्लांना पाहण्यासाठी 'कासव महोत्सवा'चे आयोजन केले जाते. आंजर्ले आणि वेळासच्या किनाऱ्यावर हा महोत्सव पार पडतो. यावेळी हजारोंच्या संख्येनेे निसर्गप्रेमी पर्यटक कासवांच्या पिल्लांना समुद्रात जाताना पाहण्याचा आनंद लुटतात. मात्र, यंदा राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने 'कासव महोत्सव' रद्द करण्यात आले. त्यामुळे बऱ्याच पर्यटकांचा हिरमोड झाला. परंतु, आता पर्यटकांना घरबसल्या समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना पाहण्याची संधी 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने उपलब्ध करुन दिली आहे. वन विभागाच्या 'कांदळवन संरक्षण विभागा'अंतर्गत (मॅंग्रोव्ह सेल) 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन' काम करते. कांदळवनांमधून रोजगार निर्मिती, पर्यटन आणि संशोधन करण्याचे काम फाऊंडेशमधील तज्ज्ञ मंडळी करतात.
 
 
 
 
 
फाऊंडेशनच्या सोशल मिडिया हॅण्डलवरुन समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांचे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात येत आहे. यासाठी वेळासच्या किनाऱ्यावरुन प्रसिद्ध कासवमित्र मोहन उपाध्ये दररोज लाईव्ह प्रेक्षपण करत आहेत. फाऊंडेशनच्या इन्स्टाग्राम (http://instagram.com/mangrove_foundation…) आणि फेसबुक पेजवरून (http://facebook.com/Mangrove.Foundation.Maharashtra…) हे प्रेक्षपण रोज सकाळी ६.३० आणि संध्याकाळी ६ वाजता करण्यात येत आहे. लाॅकडाऊनमुळे कासव महोत्सव रद्द झाल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांना घरबसल्या कासवांच्या पिल्लांचे दर्शन घडवून कासव संवर्धनाविषयी प्रबोधन निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत असल्याची माहिती 'मॅंग्रोव्ह सेल'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली. या उपक्रमाबरोबरच कांदळवन आणि सागरी जीवांविषयी आॅनलाईन व्याख्याने आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.