सर्वसामान्यांची होतेय हेळसांड ; लोकांना जीवनावश्यक वस्तूंची गरज

15 Apr 2020 15:56:32

bmc foods_1  H
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब, निराधार, तसेच बेघरांसाठी जेवणाची व्यवस्था पालिकेने केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयार केलेल्या “१८०० २२२ २९२” क्रमांकाच्या हेल्पलाईनवर नागरिकांचे ६०६८ हून अधिक कॉलची नोंद झाली आहे. यातील जीवनावश्यक वस्तूंसाठी (शिधा) सर्वाधिक ३७०० हून अधिक कॉल केले आहेत. जेवणांची पाकिटांऐवजी जीवनावश्यक वस्तूंसाठी अधिक कॉलची नोंद झाली आहे.
 
कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बंद झाला आहे. गरीब, निराधार, मोलमजुरी करणारे, रस्त्यावर राहणारे कुटुंबीयांची उपासमार होऊ नये यासाठी पालिकेकडून जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत. लोकांनी संपर्क साधण्यासाठी पालिकेने “१८०० २२२ २९२” क्रमांकाची हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. या हेल्पलाईनवर ३७०० हून अधिक नागरिकांनी शिधा द्या अशी मागणी करणारे कॉल आले आहेत.
 
आतापर्यंत मुंबईतील ३७०० हून अधिक लोकांनी अन्नधान्यांची मागणी केली आहे, तर २१६६ कॉल हे अन्नांच्या पाकिटांची मागणी करणारे आल्याची नोंद झाली आहे. तर ११ लोकांनी राहण्याच्या व्यवस्थेबाबत विनंती केली आहे. अशाप्रकारे हेल्पलाईनवर एकूण ६०६८ लोकांनी संपर्क साधून विविध गोष्टींची मागणी केली आहे. हेल्पलाईनवर धारावी, दादर, वडाळा, शीव, पश्चिम उपनगरातील वांद्रे ते सांताक्रुझ, गोरेगाव, पूर्व उपनगरात देवनार, गोवंडी, चेंबूर या विभागांमधून सर्वाधिक लोकांची मागणी होत आहे.
 
अन्न पाकिटे पुरवण्यात येणाऱ्या लोकांची माहिती संकलित करून त्याप्रमाणे घर असलेल्या आणि चूल पेटत असलेल्या कुटुंबाला शिधा उपलब्ध करून दिल्यास अन्न पाकिटांचा पुरवठा करण्याचा मोठा भार कमी होवू शकतो, असेही अनेकांना वाटते आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यास या मनुष्यबळाचा वापर कमी होणार आहे. प्रत्येक दिवशी एका वेळेला दीड लाख याप्रमाणे दोन्ही वेळेच्या जेवणासाठी सुमारे तीन लाख लोकांना अन्न पाकिटे वितरीत करावी लागतात.
 
 
Powered By Sangraha 9.0