बांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना : देवेंद्र फडणवीस

14 Apr 2020 19:41:44
Devendra fadnavis_1 


घडल्या प्रकारामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस!


मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. नागरिकांकडून आपल्या मूळ गावाकडे परत जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी केली आहे. त्यामुळे वांद्रेमध्ये भागात बस डेपोजवळ जमा झालेल्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे वांद्रे येथील परिस्थिती चिघळल्याचे दिसत आहे.






या घटनेमुळे राज्यसरकारच्या सोयी-सुविधांमध्ये त्रुटी असल्याचे पुन्हा एकद निदर्शनास आले आहे. ‘बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे’, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ‘परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत. आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी.’ असे त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे.





घडलेल्या प्रकारानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. मात्र ‘अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरूद्धचा लढा हा राजकीय नाही, हे कृपया आतातरी लक्षात घ्या. हा लढा आपल्याला गांभीर्यानेच लढावा लागेल’, अशी विनंतीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.



Powered By Sangraha 9.0