कोरोना : महामारी की महायुद्ध?

    दिनांक  14-Apr-2020 22:04:06
|
Corona_1  H x W१९१४ ते १९१८ पर्यंत चाललेल्या पहिल्या महायुद्धात आणि दुसर्‍या महायुद्धातही भयंकर जीवितहानी झाली. या दोन्ही युद्धांचे परिणाम या युद्धानंतर कित्येक दशके या जगाच्या आर्थिक, सांस्कृतिक बाबींवर दिसून येत होते. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगावर हीच वेळ आली आहे. माणसं तर जीवानिशी मरत आहेत. पण, अर्थव्यवस्थाही कोलमडल्या आहेत. कोरोना पसरू नये म्हणून जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जणू काही अघोषित युद्धच चालू झालं आहे.


कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली, यात काही वाद नाही. पण, नक्की सुरुवात कधी झाली, याबाबत मात्र अजूनही चीनमधील शास्त्रज्ञ, डॉक्टर यांच्यातच एकमत होत नाही. काही जणांचं मत असं आहे की, डिसेंबरमध्ये वुहानमध्ये मासळी बाजारात एका महिला विक्रेत्याला सर्वात प्रथम लागण झाली, तर काहींच्या मते त्याअगोदरच तीन आठवडे म्हणजे नोव्हेंबरमध्येच एका रुग्णामध्ये जो या मासळी बाजारपासून काही अंतरावर राहत होता. त्याला याची लागण झाली. याचबरोबर कोरोना नक्की प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरला आहे का? माणसांमध्येच तो संसर्गजन्य आहे का? तो कोणत्या माध्यमातून मनुष्यामध्ये पसरत आहे? याबाबत जगात कोणाचेच एकमत होत नव्हतं. जिथून या व्हायरसचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली होती, त्या चीनने तर कोणतीच खरी बातमी जगापुढे येऊ दिली नाही. एवढंच काय ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नेसुद्धा कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे, हे जाहीर करायला तब्बल दोन महिने घेतले. त्यामुळेच सर्वांच्या मनात एक शंका निर्माण व्हायला लागली की, कोरोना नक्की नैसर्गिक आपत्ती आहे की, मानवनिर्मित जैविक अस्त्र?चीनमध्ये या आजाराने थैमान घालायला सुरुवात झाल्यानंतर तो चीनमधील वुहान या शहरात खूप मोठ्या प्रमाणात पसरला. वुहान प्रांत सोडला तर इतर कोणत्याही मोठ्या शहरात म्हणजे बीजिंग, शांघाय यामध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला आढळत नाही किंवा चिनी प्रसारमाध्यमे तसे सांगत आहेत, असं म्हणूया. त्याचवेळी चीनने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वुहान शहर ‘लॉकडाऊन’ केले. पण, तरीसुद्धा चीन सोडून इतर देशांमध्ये जसे की इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका इथे कोरोना वेगाने पसरत गेला. कोरोना हा एकमेकांच्या स्पर्शातून पसरत जाणारा आजार आहे. हा हवेत दोन तास, धातू, कागद व इतर वस्तूंवर १२ ते २४ तास एवढा वेळ तग धरून राहू शकतो. त्या वस्तूच्या स्पर्शातूनच तो माणसांमध्ये वेगाने पसरत आहे. मधुमेह, हृदयविकार असे आजार असणारे आणि साठपेक्षा जास्त वय असणार्‍या व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराचा मृत्यूदर हा २.५% आहे. असं असूनसुद्धा आज जगातील इतर देशांच्या प्रमाणात कोरोना भारतात कमी प्रमाणात आणि कमी वेगात पसरत आहे. यामागचं कारण काही संशोधकांच्या मते असं आहे की, मानवी शरीरात दोन प्रकारच्या प्रतिकारशक्ती असतात. ज्या ‘NK Cells' & "T & B Lymphocy Tes' यामार्फत चालवल्या जातात. ‘NK Cells' जी प्रतिकारशक्ती चालवतात, ज्याच्यामुळे निसर्गात होणार्‍या बदलांमुळे होणारे आजार, हे पहिल्या सत्रातच रोखले जातात आणि भारतीय लोकांच्यात ही ‘NK Cells' मेडिकेटेड प्रतिकारशक्ती आहे, हे एक कारण असू शकतं.दुसरं कारण असं आहे की, मलेरियाचा प्रादुर्भाव असणारा भारत हा देश आहे. जिथे मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त असतो, तिथे झिंक जास्त प्रमाणात आढळून येते. कारण, झिंक हेच मलेरियाचा प्रादुर्भाव वाढवण्याचे काम करते. पण, दुसर्‍या बाजूला हेच झिंक कोरोना या विषाणूला मारक ठरते. अजून एक शक्यता म्हणजे, भारतात दिली जाणारी ती सीजी लस, जी ३० टक्के ‘व्हायरल इन्फेक्शन’ कमी करण्याचा प्रयत्न करते, असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. कसे का असेना, पण हा आजार लवकरात लवकर रोखला जावो, ही अपेक्षा ठेवूया.
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम :
गेले दोन महिने चीन आणि जगातल्या १८३ देशांमध्ये कमी-जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येते. याचा मानवी जीवनावर जसा परिणाम झाला आहे, तसाच काहीसा जागतिक अर्थव्यवस्थेवरसुद्धा याचा परिणाम झाला असल्याचे आढळते आणि पुढील वर्षभर हा परिणाम जाणवेल, असे संकेत मिळत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम झाला आणि होणार आहे, हे मुद्देसूद समजून घेऊया. चीन हा जगातील सर्वात मोठा निर्यात करणारा देश आहे, तर आयात करणारा जगातला दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. ज्यावेळी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, एवढंच काय तर भारतातील गणपतीच्या मूर्तीपासून दिवाळीच्या फटाक्यांपर्यंत सगळं काही चीन बनवत आहे. अमेरिका तसेच युरोपातील देशसुद्धा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहे. अमेरिकेतील औषधनिर्माण क्षेत्रातील ९७ टक्के प्रतिजैविके (अ‍ॅण्टिबायोटिक) हे चीनमध्ये बनवले जातात. त्याच जोरावर आज चीनच्या एका अधिकार्‍याने असे बोलायचे धारिष्ठ दाखवले की, “आज आम्ही अमेरिकेला औषधे पुरवली नाहीत, तर संपूर्ण अमेरिका कोरोनामय होऊन जाईल.”


चीनने कोरोना पसरल्यानंतर दोन मोठ्या शहरात पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ केले. त्यामुळे तेथील सर्व उद्योगधंदे पूर्ण बंद झाले. याचा परिणाम म्हणून अमेरिकेने, युरोपातील काही देशांनी चीनमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे वाया गेली. चीनने परदेशी नागरिकांना देशाबाहेर काढले. अमेरिकन उद्योगधंद्याचे शेअर्स पूर्णपणे विकत घेतले. पण, या सर्व घडामोडीत शेअर बाजार जो कोसळला, तो अजून सावरलेला नाही. ९ ते १० टक्के शेअरबाजार कोसळला आहे. यासोबत अजून एका मोठ्या क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे, ते म्हणजे पर्यटन. आज १५ कोटी चीनमधील लोक युरोप, अमेरिकेत दरवर्षी पर्यटनासाठी जातात. यावर होणारी उलाढालही जवळपास २० लाख कोटी एवढी प्रचंड आहे. यातली ४० लाख लोक हे एकट्या इटलीमध्ये गेल्या वर्षभरात गेले होते.. म्हणूनच इटलीमध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार झालेला आढळतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतात. चीनमध्ये अधिकृत मृतांचा आकडा नक्की किती? दोन कोटी मोबाईल नंबर का बंद होत आहेत? चीनमधील लोकांचं ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ असलेल्या इटलीमध्ये जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात कोरोना पसरवला गेला का? पाकिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळायला सुरुवात झाल्यानंतर एकट्या चीननेच पाकिस्तानला मदत करा, अशी जगाकडे मागणी का केली? चीनचे उद्योगधंदे बंद असताना आजही इटलीसारख्या देशात चीन मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर कसे काय पुरवू शकते? आणि इटलीची अशी काय मजबुरी झाली आहे की, त्यांना चीनची मदत घेण्याशिवाय पर्याय उरला नाही? असं असलं तरी आज जगभरातूनच सर्व जण भारताकडे आश्वासक नजरेने बघत आहे. त्यामागे भारताच्या केंद्रीय नेतृत्वाने म्हणजेच नरेंद्र मोदींनी आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी उचललेली कठोर पावले.


इराकमध्ये अडकलेल्या भारतीयांना तिथेच चाचणी करून भारतात आणणे, परदेशातून आलेल्या नागरिकांची ‘होम क्वारंटाईन’साठी वेगळी पण सुसज्ज व्यवस्था करणे, आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा, प्रशासन यंत्रणा, पोलीस यंत्रणा या सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे, जनतेसाठी आर्थिक् पॅकेजची घोषणा करणे, टाळ्या वाजवणे, दिवे लावणे यांसारख्या उपक्रमातून भारतीयांचे मन येणार्‍या संकटावर मात करण्यासाठी सजग ठेवणे, उत्साहित ठेवणे या सगळ्यांतून मोदींनी सर्व जगाला संदेश दिला आहे की, भारत कोरोनावर मात करण्यासाठी सर्व बाजूने सज्ज आहे. चला तर मग आपणही आदरणीय अटलजींच्या कवितेतील ‘आओ फिरसे दिया जलाये’ या पंक्तींना अनुसरून आज सर्व जाती, पंथ, धर्म हे सर्व भेद विसरून एकजुटीने कोरोनाला हरवूया.


- अजय जगताप
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.