'...तर आयपीएल होणार नाही?' गांगुलीने सोडले मौन

13 Apr 2020 14:13:36

ipl sourav ganguly_1 
मुंबई : कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व जग स्तब्ध झाले आहे. देशामध्ये कोरोनामुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. याप्सून क्रीडा क्षेत्रही वाचलेले नाही. अनेक स्पर्धा रद्द केल्यानंतर आयपीएलचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरीतच होता. मात्र, आता यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मौन सोडले असून आयपीएल आयोजनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “ सध्याचे वातावरण हे कुठल्याच स्पर्धेसाठी योग्य नाही, तर आयपीएल विसरून जा.” असे मत गांगुलीने व्यक्त केले आहे.
 
 
“जगभरात कोणत्याच क्रीडा स्पर्धा होत नाही आहेत. तुम्ही खेळाडू कुठून आणणार? खेळाडू प्रवास कसा करणार? जगातल्या कोणत्याच क्रीडा स्पर्धेसाठी वातावरण पोषक नाही, आयपीएल तर विसरून जा. आयुष्यच थांबली आहेत, आयपीएलचे काय घेऊन बसला आहात?', असे वक्तव्य गांगुलीने केले. “आम्ही सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्यातरी आम्ही काहीही सांगू शकत नाही. सध्या बोलण्यासारखे काहीच नाही. विमानतळे बंद आहेत. देशभरातील जनता घरात बसलेली आहे. ऑफिस बंद आहेत. कोणीच कुठेही जाऊ शकत नाही. मे महिन्याच्या मध्यापर्यंत अशीच परिस्थिती कायम राहू शकते, असे वाटत आहे,' असेही पुढे तो म्हणाला.
 
 
“सोमवारी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील. अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतरच मी तुम्हाला याबाबत अधिक माहिती देऊ शकेन,” असे गांगुलीने आश्वासन दिले आहे. तरी आयपीएल २०२० हे शक्यतो रद्द होऊ शकते असेच चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे आता याचा फटका कोणाकोणाला बसणार हे लवकरच स्पष्ट होईल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0