ट्रम्प, शिंजो, इमरान आणि कोरोनाशी लढा

    दिनांक  12-Apr-2020 20:48:38   
|
Trump Shinzo Imran_1 
काय वाटते कोण आहेस तू? अशा शब्दांत सध्या जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जपानी नागरिक रोष व्यक्त करत आहेत. याचे कारण शिंजो आबे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये ते लोकांना सांगत आहेत, “घरी राहा. सुरक्षित राहा.” मात्र, हे सांगत असताना ते त्यांच्या अलिशान वास्तूत कुत्र्यासोबत खेळताना दिसतात. पुस्तक वाचताना दिसतात. चहा पिताना दिसतात. त्याचवेळी त्यांच्या या व्हिडिओमध्ये एका बाजूला प्रसिद्ध गायक आणि अभिनेता होशिनोही आहे. होशिनो गिटार वाजवत गाणे म्हणत आहेत.


चला जीवंत राहू
नृत्य करू
आपण प्रत्येक जण
जिथे कुठे असू
आपण गाऊ या
आम्ही सगळे एक आहोत


हा व्डिडिओ पाहून जपानी जनता शिंजो आबे यांच्यावर रागावली आहे. जपानी जनतेच्या मते जपानमध्ये हजारो लोक कोरोना संक्रमित आहेत. तसेच देशातील किती तरी ठिकाणी आणीबाणी लावली गेली आहे. कोरोना, मृत्यू, दु:ख, भय, अगतिकता या वातावरणामध्ये जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अशावेळी जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंनी जनतेच्या समस्यांचा आढावा घ्यावा किंवा तसे प्रयत्न करत आहोत, असा विश्वास दाखवावा. तर ते सोडून शिंजो लोकांना सांगत आहेत घरी राहा, नृत्य करा आणि मजेत राहा.
 
अर्थात, शिंजो हे लोकप्रतिनिधी आहेत. लोकांची काळजी घेणे हे त्यांचे पहिले कर्तव्य. आणिबाणीच्या स्थितीत लोकप्रतिनिधींनी जनतेला मदत करावी, साथ द्यावी, सवलती द्याव्यात आणि सुरक्षित निश्चित वर्तमान तसेच भविष्य द्यावे, हीच लोकांची इच्छा असते. जपानी जनतेचे म्हणणे आहे की, शिंजो हे यापैकी काहीही करताना दिसत नाहीत. मजेत चैनीचे जगणे जगताना दिसत आहेत. या अशा जागतिक संकटाच्या काळात कोणत्याही देशाच्या जनतेला भरवसा असणार तो त्या देशाच्या सत्ताधार्‍यांवरच. त्यामुळे जपानी जनतेचा रोष काही प्रमाणात रास्तच आहे, असे म्हणावे लागेल. मात्र, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या जनतेने काय करावे?

 
आधीच दहशतवाद, भ्रष्टाचाराने या देशाची कबर खणली आहे. त्यात कोरोनाने तर पाकिस्तानची दाणादाण करून टाकली. भारताच्या नखाची सर नसताना भारताची बरोबरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा पाकिस्तान देश, कोरोनामुळे आणखीनच समस्यांच्या गर्तेत गेला. पाकिस्तानने कोरोनाविरोधात एक गंभीर आणि महत्त्वाचे पाऊल उचलले, एक मोठा निर्णय घेतला. काय केले असावे पाकिस्तानने? हॉस्पिटल उघडले की गरिबांसाठी मोफत अन्नछत्र उघडले की घाबरलेल्या पाकिस्तान्यांना आत्मविश्वास येईल यासाठी समुपदेशनाची व्यवस्था केली? काय केले असावे? छे... छे... यापैकी पाकिस्तानने काहीही केले नाही. पाकिस्तानने 80 एकर जागेत कबर खोदण्याचे काम सुरू केले आहे. याचा अर्थ कदाचित पाकिस्तानी सरकार त्यांच्या जनतेला सांगू इच्छिते की, इतक्या समस्या असताना जगता कशाला? मरा. तुमच्या सुखाने मरण्याची व्यवस्था सरकारने केली आहे.

 
अर्थात, येथील जनतेचे काय म्हणणे असेल? कट्टर धार्मिकतेच्या आड येथील बहुसंख्य जनतेच्या मनातही आहे. अल्लातालाची इच्छा असेल की, कोरोना होऊनच आम्ही मरावे तर मरावेच लागेल, त्याची इच्छा असेल कोरोना होऊनही आम्ही जगूच. त्यामुळे कोरोनाची भीती का बाळगा. म्हणूनच येथील जनतेची मानसिकता ओळखून पंतप्रधान इमरान खानही कबर बांधण्यात गुंग आहे. दुसरीकडे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातही कोरोनाने थैमान घातले. पण अमेरिकन सरकारचे म्हणणे देशात ‘लॉकडाऊन’ करणार नाही. कारण, त्यामुळे देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडेल. पण ‘लॉकडाऊन’ न केल्यामुळे देशातील जनताच किड्यामुंग्यासारखी मरत आहे. या देशाच्या जनतेने येथील सत्ताधार्‍यांना काय म्हणावे? की जनतेपेक्षा तुम्हाला अर्थव्यवस्थेचे पडलेले आहे. कोरोनामुळे जगातील विविध देशातील सत्ताधार्‍यांचे मुखवटे निखळलेत हे नक्की. यापैकी काही नावे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, शिंजो आबे आणि इमरान खान!

 

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.