लाॅकडाऊनमध्ये साताऱ्यात 'राष्ट्रीय पक्ष्या'ची शिकार; आरोपी अटकेत

12 Apr 2020 16:03:52
satara_1  H x W
 
 
 

वनकर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे घटना उघड

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात शनिवारी लांडोरीची (मोराची मादी) शिकार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिकाऱ्यांनी आपल्या खासगी शेतामध्येच या लांडोरीची शिकार केली. वणवा विजवण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे ही घटना उघड झाली. या प्रकरणात वन विभागाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून सोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
राज्यात सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. सावंतवाडीत तालुक्यात घडलेले 'शेकरू' शिकारीचे प्रकरण ताजे असतानाच आता पाटण तालुक्यामधून लांडोरीची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. पाटणमधील ऊरुल गावात शनिवारी वनकर्मचारी वणवा विजवण्यासाठी जात असताना त्यांना गोळी झाडल्याचा आवाज आला. येथील 'गुरवकी' नावाच्या मालकी क्षेत्रातू आवाज आल्याने कर्मचाऱ्यांनी त्यादिशेने धाव घेतली. प्रसंगी शेतातील पत्र्याच्या शेडजवळ कर्मचाऱ्यांना टीव्हीएस ज्युपीटर स्कूटरजवळ मृत लांडोर आणि डबल बार बंदूक आढळून आली. यावेळी जागेवर उपस्थित असलेले आरोपी विनायक निकम व राहुल निकम यांना साहित्य आणि लांडोरीच्या मृत शरीरासह ताब्यात घेण्यात आले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत मोराला संरक्षण देण्यात आले आहे. 
 
 
 
 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'चे उल्लंघन केल्याबद्दल आरोपींवर गुन्हा दाखल केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विलास काळे यांनी दिली. सोमवारी त्यांनी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ही कारवाई साताऱ्याचे उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा आणि सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी काळे, वनपाल संजयकुमार भट, वनरक्षक रामदास घावटे, दादाराव बर्गे, विलास वाघमारे यांनी केली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0