सावंतवाडीत 'शेकरू'ची शिकार केलेल्या शिकाऱ्यास वन विभागाकडून अटक; १४ एप्रिलपर्यंत कोठडी

11 Apr 2020 19:10:57
sawantwadi _1  

 

 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'चे उल्लंघन
 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत घडलेले शेकरू शिकारीचे प्रकरण दै.'मुंबई तरुण भारत'ने (महा MTB) प्रसिद्ध केेल्यानंतर वन विभागाने आज सकाळी शिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. शिकाऱ्याला दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'चे उल्लंघन केल्याबद्दल आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो भारतीय सैन्यदलात काम करत असल्याची माहिती वन विभागाने दिली.
 
 

sawantwadi _1   
 
 
 
 
 
गेल्या आठवड्यात साधारण १ ते ३ एप्रिल दरम्यान सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावात दोन शेकरूंच्या शिकारीचे प्रकरण घडले होते. गावातील रहिवासी लीलाधर वराडकर उर्फ लिल्लू याने शिकार केलेल्या शेकरूंसोबत छायाचित्र काढून समाजमाध्यमांवर टाकले होते. 'महा MTB'च्या हाती हे छायाचित्र लागल्यानंतर दि. १० एप्रिल रोजी त्याविषयी वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताचा आधार घेऊन प्रसंगी अधिक चौकशी करुन  साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक आणि 'वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा'चे सदस्य रोहन भाटे यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार केली. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी लीलाधर वराडकर याला वन विभागाकडून अटक करण्यात आली. आरोपीने शेकरू या वन्यप्राण्याची शिकार केल्याचे चौकशीतून निष्पन्न झाल्याचे वन अपराधाच्या पहिल्या प्रतिवृत्तात लिहले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
आरोपी वराडकरला अटक करुन आज दुपारी २ वाजता न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तो भारतीय सैन्यदलात नोकरी करत असून सध्या सुट्टीनिमित्त आपल्या गावी कुणकेरी येथे परतल्याचे, चव्हाण म्हणाले. या दरम्यान त्याने शेकरूची शिकार केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या प्रकरणाची दखल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील घेतली आहे. 'लाॅकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर विकृत मनोवृत्ती डोळ्यासमोर ठेवून जर कोणी शिकार करत असेल त्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आजच मी वन विभागाला दिल्याचे, सामंत म्हणाले. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत शेकरूला प्रथम श्रेणीत संरक्षण देण्यात आले असून तो महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0