आर्य स्थलांतराच्या सिद्धांताला ढोबळ प्रत्युत्तर

    दिनांक  11-Apr-2020 21:26:51
|


arya_1  H x W:


पाश्चात्त्यांनी मांडलेल्या या 'आर्य स्थलांतर किंवा आक्रमण' सिद्धांताचे (AIT /AMT) स्वरूप ढोबळमानाने आपण मागच्या लेखात समजून घेतले. त्या सिद्धांताला भारतीय संशोधकांनी आणि अभ्यासकांनी काय प्रत्युत्तरे दिलेली आहेत, तेही असेच जरा ढोबळपणे आणि थोडक्यात या लेखात समजून घेऊ. यामुळे यातून आधी आपली एक वैचारिक चौकट तयार व्हायला मदत होईल आणि पुढच्या तपशीलवार लेखांकडे वळण्याआधी या विषयाची रूपरेषा आणि दिशा बरीच स्पष्ट झालेली असेल.


वाङ्मय आणि भाषाशास्त्र (Linguistics)

ऋग्वेदातल्या वर्णनांवरून आर्यांचे जे काही वर्णन पाश्चात्त्य विद्वानांनी केलेले आहे, त्यातून असे अतिशय स्पष्टपणे लक्षात येते की, या मंडळींनी 'आर्य' नावाचा एक वंश अस्तित्वात होता, असा समज करून घेतलेला आहे. म्हणजेच 'आर्य' हा शब्द त्यांनी 'वंशवाचक' ठरवून टाकलेला आहे. प्रत्यक्षात मात्र प्राचीन भारतीय साहित्यात सर्वत्र 'आर्य' हा शब्द 'गुणवाचक' अर्थाने आलेला दिसतो. त्यानुसार 'आर्य' असणे म्हणजे एका अर्थाने 'सद्गुणी' असण्याचेच समानार्थी वर्णन आहे, तर 'अनार्य' असणे हे 'दुर्गुणी' किंवा 'खलनायकी' असण्याचे वर्णन आहे. त्यामुळे पुढच्या इतर ज्ञानशाखांच्या अनुषंगाने केलेल्या संशोधनात सुद्धा 'आर्य भाषा', 'आर्यांचा DNA', 'आर्यांचे राज्य', वगैरे शब्दप्रयोग सातत्याने येत राहतात. तेदेखील असेच निष्पाप वाचकांची दिशाभूल करणारे आहेत. कारण, याद्वारे 'आर्य' शब्द वंशवाचकच आहे, असे ते अतिशय बेमालूमपणे वाचकांच्या मनावर ठासवत राहतात. याचा तपशीलवार परामर्श आपण पुढच्या काही लेखांमध्ये घेणार आहोतच.

या संदर्भात दुसरी एक विशेष बाब इथे लक्षात घेतली पाहिजे. त्या तथाकथित 'आर्यांचे' म्हणून सांगितलेले जे काही प्राचीन साहित्य आहे, त्यात प्रामुख्याने ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद, त्यांच्या अनेक शाखा, त्यांच्या स्वत:च्या संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, सहा वेदांगे - असा प्रचंड मोठा पसारा या साहित्याचा आहे. त्याच्याही पुढच्या काळात रामायण-महाभारतासारखी आर्ष महाकाव्ये, अठरा पुराणे, अठरा उपपुराणे, अनेक स्मृती, काव्ये-महाकाव्ये, नाटके, वगैरे वगैरे रूपाने त्याहूनही मोठा पसारा लौकिक संस्कृत वाङ्मयाचा आहे. पण, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व साहित्यिक पसार्‍यात आर्यांनी बाहेरून येऊन आक्रमण केले (किंवा स्थलांतर केले) आणि तत्कालीन स्थानिक लोकांना हरविले (किंवा विस्थापित केले), असा एका अक्षरानेही उल्लेख यांपैकी एकही ग्रंथात नाही! आर्यांचे आक्रमण (किंवा स्थलांतर) ही या विद्वानांच्या मते जर एवढी मोठी ऐतिहासिक घटना होती, आर्यांच्या दृष्टीने जर तो एक एवढा मोठा देदीप्यमान विजय होता, तर त्याचा तसूभरही उल्लेख या 'आर्यांच्या' साहित्यात सापडू नये? जरा विचित्रच नाही का वाटत हे? वर यादी दिलेल्या एवढ्या मोठ्या साहित्याच्या समुद्रात इतर असंख्य राजांच्या युद्धांची असंख्य वर्णने मोठ्या कौतुकाने आणि अलंकारिक सजावट करून लिहिलेली ठिकठिकाणी सापडतात. पण, तिथे या संघर्षाचे अवाक्षरही काढलेले दिसत नाही! की या घटना तत्कालीन आर्य लोक लगेच विसरून गेले आणि हजारो वर्षांनंतर आधुनिक काळातल्या पाश्चात्त्य विद्वानांना मात्र तो इतिहास जसाच्या तसा समजला, असे झाले की काय?

बाकी, युरोपीय भाषांशी संस्कृत-प्राकृतसारख्या भारतीय भाषा मिळत्या-जुळत्या असणे आणि त्यामुळे त्यावरून आर्यांचे मूळ वास्तव्य युरोपात कुठेतरी असल्याचा निष्कर्ष काढणे, यावरसुद्धा जगभरात अनेक विद्वानांमध्ये आजही बराच खल सुरू असतो, उलटसुलट युक्तिवाद आणि तर्कांची बरीच राळ उडविली जाते. या भाषाशास्त्रीय युक्तिवादात सामान्य वाचक पार गांगरून जातो. त्यापासून लांब राहण्यात जरी गैर काहीही नसले, तरी कुठले शब्दप्रयोग आणि वाक्ये वाचताच आपण सावध व्हायला हवे, याची माहिती असणेही गरजेचे आहे.

पुरातत्त्व (Archaeology) आणि उत्खनने

मागच्या लेखात वर्णन केल्याप्रमाणे, सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात आर्यांनी बस्तान बसवण्याआधी तिथे घोडे आणि रथ नव्हते, आर्यांनी ते तिथे आपल्या सोबत नेले - असा एक निष्कर्ष जगतमान्य झालेला आहे. या विषयीचा त्यातला तर्कही आपण थोडक्यात पाहिला. परंतु, या तर्काला खोडणारे प्रत्यक्ष पुरावेच तिथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत. उत्खननात मिळालेली तत्कालीन मुलांची खेळणी, प्राण्यांची हाडे, रथाचे अवशेष - या गोष्टी जे तथ्य उघडपणे सांगतात, ते पाहूनही मान्य करण्याची भारताबाहेरील विद्वानांची आणि काही इंग्रजाळलेल्या भारतीय अभ्यासकांचीसुद्धा मानसिक तयारी नाही. त्यामुळे या चर्चेत अशी प्रत्युत्तरे मिळायला लागली की, ते शहामृगासारखे वाळूत डोके खुपसून बसतात!

तशीच गोष्ट 'DNA' विषयक संशोधनाचीसुद्धा आहे. भारतातल्या उत्खननात मिळालेला एक 'DNA' इराणी 'DNA' सोबत जुळला की, हे संशोधक खूश! आणि जर त्यात इराणी माणसांची कोणतीच वैशिष्ट्ये नाही सापडली, तर त्याला नाक मुरडून संख्याशास्त्रानुसार 'अपुरा नमुना' (Inadequate specimen)' म्हणून जाहीर करून मोकळे!! लबाड कोल्ह्यांची आंबट द्राक्षे!!! वर म्हटल्याप्रमाणे या युक्तिवादातसुद्धा सामान्य वाचक गांगरून जातोच. पण, इथेही कुठले शब्दप्रयोग आणि वाक्ये वाचताच आपण सावध व्हायला हवे, याची माहिती असणे गरजेचे आहे.

कालानुक्रमाची (Chronology) तोडमोड

भारतीय संशोधकांनी आणि अभ्यासकांनी भारतीय इतिहासाची कालरेषा ठरविण्याचा जो स्तुत्य प्रयत्न केलेला आहे, तो पुढे यातल्या विविध संशोधनांची ओळख करून घेताना आपण नक्कीच पाहू. इथे एकूणच पाश्चात्त्यांचा भर कशावर असतो, तर आपल्या इतिहासापेक्षा आणि संस्कृतीपेक्षा जास्त जुने जगात दुसरे काही सिद्ध होता कामा नये, याकडे! त्यासाठी फक्त भारतीयच नव्हे, तर इतरही अनेक प्राचीन संस्कृतींचे इतिहास असेच मारून-मुटकून आपल्या सोयीनुसार संशोधित करण्याकडे त्यांचा कल असतो. शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रम ठरविणार्या समित्यांमध्ये सुद्धा आपल्याच दृष्टिकोनाचे संशोधक बसतील, याची पुरेपूर योजना ते करतात.

तर वाचकहो, थोडक्यात सांगायचे तर 'दाल में कुछ काला है' अशीच शंका या सर्व सिद्धांताकडे बघताना येत राहते. यातल्या काही मुद्द्यांच्या बाबतीत डाळीत एखादे काळे गधळ असणे तर सोडाच, उलट सगळी डाळच काळी असल्याचे दिसून येते, तर अजून काही मुद्द्यांच्या बाबतीत तिथे डाळही नसून सुपात फक्त आणि फक्त काळे गधळच असल्याचे निदर्शनाला येते! दुर्दैव भारताचे - दुसरे काय!! परंतु, हेच दुर्दैव निपटून काढून तिथे तथ्यांवर आधारित देदीप्यमान इतिहासाचे ज्ञान भरणे, हाच या लेखमालेचा हेतू आहे. आपणही याच दृष्टीने पुढच्या लेखांचे ग्रहण करावे, अशी अपेक्षा आहे. वर दिल्याप्रमाणे आर्य आक्रमणाच्या सिद्धांताच्या विविध पैलूंचे स्वरूप आणि त्यांचे निराकरण एक-एक करून अधिक तपशीलात जाऊन पुढच्या लेखांमध्ये क्रमश: पाहू.

- वासुदेव बिडवे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.