औटघटकेचे अभ्यागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Apr-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


मॅडम बौमॉन्ट आल्याच्या तिसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये एक देखणा तरुण येऊन दाखल झाला. त्याचे नाव हेरॉल्ड फॅरिंगटन. स्वारी इथे रविवारपर्यंतच राहणार होती. सोमवारी सकाळी त्याला परत जायचे होते. आल्या आल्या त्यानेही आपल्या सुसंस्कृत वागण्याने सर्वांची मने आकृष्ट केली.


ब्रॉडवेवरचे 'हॉटेल लोटस' छोटे, टुमदार आणि आरामदायी होते, प्रशस्त खोल्या ओक लाकडाच्या उंची फर्निचरने सजवलेल्या होत्या. खोल्यांच्या छतांवर जलरंगातील प्रसन्न चित्रे रेखाटली होती. शांततेने, वाऱ्याच्या शीतल झुळकांनी आणि गर्द हिरव्या झुडपांनी वास्तू लपेटलेली होती. वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी वर्तुळाकार जिने होते. ज्यांना हवी असेल त्यांच्यासाठी लिफ्टची सोय होती. लिफ्ट चालवण्यासाठी पितळी बटणे लावलेला उंची गणवेश परिधान केलेला सेवक होता. तिथले शेफ उत्तमोत्तम गोडाधोडाचे पदार्थ, शाकाहारी-मांसाहारी पदार्थ, सागरी अन्न रांधत. शहरातला आरडाओरडा, गोंधळ आणि धकाधकीला कंटाळलेले नागरिक इथे विश्रांतीसाठी आणि नीरवतेच्या आनंदासाठी इथे येत. एका जुलैत इथे स्वागतिकेच्या टेबलासमोर रुबाबदार तरुणी येऊन उभी राहिली. तिने आपले नाव नोंदवले, 'मॅडम बौमॉन्ट.'

मॅडम बौमॉन्ट हॉटेल लोटसच्या सन्मान्य ग्राहक होत्या. दरवर्षी या हंगामात इथे आठवडाभर राहायला येत. त्यांच्या उच्चभ्रू आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची इथल्या कर्मचारीवर्गावर भुरळ पडलेली होती. तिच्या देखण्या रुबाबापुढे ते गुलामांसारखे झुकत. तिने बेल वाजवण्याची आणि तिच्याकडे धावत जाण्याची प्रतीक्षा करीत. आसपासच्या खोल्यांमधले अभ्यागत, जेवणखोलीत तिच्या शेजारच्या टेबलवर बसलेले ग्राहक तिच्याकडे कौतुकाने, अभिलाषेने, असुयेने बघत. हॉटेलमध्ये मॅडम बौमॉन्ट एकट्या राहत असल्या तरी एखाद्या राणीप्रमाणे राहत. दिवसभरात शहरात एखादी चक्कर मारून येत. रात्रीच्या जेवणासाठी जेवणगृहात येत तेव्हाचा उंची गाऊन अवर्णनीय असे. पॅरिसहून आलेल्या एका ग्राहकाने हा अतिशय महागडा असल्याचे कुजबुजत्या आवाजात सर्वांना सांगितले होते. गेल्या वर्षी त्यांनी हाच गाऊन आणला होता. खरे म्हणजे या गाऊनमुळेच मुख्य वेटरला, कॅप्टनला आणि सर्व सेवकांच्या मनात त्यांच्याविषयी भयमिश्रित आदर निर्माण झाला होता.

मॅडम बौमॉन्ट आल्याच्या तिसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये एक देखणा तरुण येऊन दाखल झाला. त्याचे नाव हेरॉल्ड फॅरिंगटन. स्वारी इथे रविवारपर्यंतच राहणार होती. सोमवारी सकाळी त्याला परत जायचे होते. आल्या आल्या त्यानेही आपल्या सुसंस्कृत वागण्याने सर्वांची मने आकृष्ट केली. बुधवारी रात्री जेवणघरात मॅडम बौमॉन्ट आणि हेरॉल्ड योगायोगाने समोरासमोरच्या टेबलशी बसलेले होते. जेवण झाल्यावर उठून जाताना मॅडम रुमाल विसरल्या. हेरॉल्डने तो उचलून त्यांना हाक मारून दिला. असे करताना ओळख करून घेण्याचा किंवा वाढवण्याचा बुभुक्षितपणा मात्र दाखवला नाही. पण, 'समानशीले व्यसनेषु सख्यं.' दोघांची दोन दिवसात हळूहळू ओळख होत आणि वाढत गेली.

हॉटेल लोटससारखी वास्तू इतक्या जवळ असताना गोंगाट आणि गलका टाळण्यासाठी बोटीत बसून दूर देशी जाण्याची गरजच नाही, यावर दोघांचं एकमत झालं. मॅडम बौमॉन्टच्या उंची प्रासादाची वार्षिक साफसफाई, देखभाल आणि रंगरंगोटी चालू असल्याने त्या सालाबादप्रमाणे इथे आठवडाभर मुक्कामाला आल्या होत्या. 'सेड्रिक' जहाज सोमवारी युरोपला रवाना होणार होते. तोवरचा काळ व्यतीत करण्यासाठी हेरॉल्ड इथे आला होता. पुढच्या वर्षीदेखील आपण याच वेळी इथे अवश्य यावं, असा दोघांच्या मनात विचार आला. पण त्यांनी संकोचापोटी तो बोलून दाखवला नाही, इतकेच.

रविवारी रात्री जेवणघरात एकाच टेबलशी बसून जेवताना मॅडमनी हेरॉल्डपाशी मन मोकळं केलं. "एका खोटेपणाबद्दल मी तुमची क्षमा मागायला हवी. तुमच्यासारख्या सद्गृहस्थाची खोटं बोलून फसवणूक केल्याचं मला वाईट वाटतं. म्हणून केवळ तुमच्यापाशीच मी एक कबुली देते आहे. माझं खरं नाव मॅडम बौमॉन्ट नसून मॅमी सिव्हायटर आहे. सोमवारी सकाळी मी न्याहारी न घेताच हॉटेल सोडणार आहे. कारण, त्या दिवशी मला वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचावं लागेल. केसी कंपनीच्या मेमथ स्टोअरमध्ये मी होजिअरीच्या काऊंटरवर विक्रेती म्हणून काम करते. हॉटेलचं बिल मी आगाऊ भरलेलं होतं. या क्षणी माझ्या पर्समध्ये एक डॉलर आहे आणि तो मला पुढच्या आठवड्यात पुरवून पुरवून - शनिवारी पगार मिळेपर्यंत वापरायचा आहे. वर्षभर मी पोटाला चिमटा घेऊन थोडे थोडे पैसे वाचवते आणि वर्षातून एकदा इथं येऊन चैनीचं आयुष्य जगते. मला इतर कोणताही विरंगुळा नाही. जेवणगृहात तुम्ही पाहिलेला माझ्या अंगावरचा गाऊन ७५ डॉलर्स किंमतीचा आणि आमच्याच स्टोअरमधून उधारीवर घेतला आहे. माझ्या पगारातून दर हप्त्याला त्याचा एक डॉलर कापला जातो."

बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला.

हेरॉल्ड तिची कहाणी शांतपणे ऐकत होता. तिला दिलासा देत तो म्हणाला, "तुमच्या प्रामाणिकपणाची मी दाद देतो. यात माफी मागण्यासारखं काय आहे? मीदेखील तुमच्याप्रमाणेच सामान्य स्थितीतला तरुण आहे. वर्षातून एकदा कुठेतरी असा आठवडा व्यतीत करतो. यंदा इथं आलो, झालं. माझं खरं नाव आहे जेम्स मॅकमानूस. मित्र मला 'जिमी' नावाने हाक मारतात. 'ओ'डौड्स-लेविन्स्की' कंपनीत मी कारकून आहे. मीही उद्या सकाळी निघणार आहे. तुम्हाला माझ्या युरोपच्या सहलीबद्दल बोललो ते सगळं माझं स्वप्नरंजन होतं." बोलत बोलत ते लिफ्टपाशी आले. लिफ्टमध्ये शिरले. आधी हेरॉल्डचा मजला आला. तो बाहेर पडला. लिफ्टमनने दार बंद करण्यापूर्वी मॅमीने त्याला हाक मारली. तो मागे वळला. त्याच्याशी हस्तांदोलन करीत ती म्हणाली, "गुड नाईट, जिमी. भेटू. आपण."

('Transients in arcadia' या कथेवर आधारित)

- विजय तरवडे

@@AUTHORINFO_V1@@