लाॅकडाऊनमध्ये सावंतवाडीत महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' शेकरूची शिकार; शिकारी मोकाट

10 Apr 2020 21:07:22
शेकरू_1  H x W:

 

 

दोन शेकरू गोळ्या घालून केले ठार

 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - राज्यात लाॅकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीत दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडूनही अद्याप वन विभागाने या प्राण्यांची शिकार केलेल्या शिकाऱ्यास अटक केलेली नाही. लाॅकडाऊनमुळे न्यायालय बंद असल्याचे कारण पुढे करुन अधिकारी शिकाऱ्याला अटक करण्यास चालढकल करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत शेकरूला वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले असून तो महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे.
 
 
 
लाॅकडाऊनच्या काळात राज्यातील वन्यजीव सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र दै. 'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागले आहे. ही घटना १ ते ३ एप्रिल दरम्यान घडली असून शिकाऱ्याचे नाव लिल्लू वराडकर असल्याची माहिती एका स्थानिक रहिवाशाने नाव न छापण्याच्या अटीवर दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. शिकाऱ्याने बंदुकीच्या साहाय्याने दोन शेकरुंना ठार केले. त्यानंतर मृत शेकरुसोबत छायाचित्र काढून ते समाजमाध्यमांवर टाकले.
 
 

शेकरू_1  H x W: 
 
 
 
वन्यजीव संरक्षण कायद्याच्या प्रथम श्रेणीत शेकरु या प्राण्याला संरक्षण लाभले आहे. प्रथम श्रेणीतील प्राण्यांची शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. सावंतवाडीत घडलेल्या या प्रकरणाची माहिती ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग वन विभागाला देण्यात आली. मात्र, अजूनही शिकाऱ्याला अटक झालेली नाही. तसेच वन विभागाने घटनेचा पंचानामाही तयार केलेला नाही. यासंंदर्भात सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन पाणपट्टे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, लाॅकडाऊनमुळे न्यायालय बंद असल्याकारणाने आरोपीला न्यायालयासमोर हजर करता येणार नाही. पंचनामा तयार केल्यास आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर करावे लागते. मात्र, आम्ही आरोपीवर नजर ठेवून असल्याचे पाणपट्टे यांनी सांगितले.
 
 
 
 
शेकरूविषयी...
शेकरु हा महाराष्ट्रचा राज्यप्राणी आहे. त्याला झाडांवर राहणारी मोठी खारुताई असे देखील म्हटले जाते. सदाहरित, निम सदाहरित व नदी काठच्या जंगलात तो आढळतो. रान आंबा, आंबाडा, किंजळ, रान बिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर, इ. झाडांवर शेकरुला राहायला आवडते. याच फळांचे अन्न म्हणून तो उपयोग करतो. उंच झाडावर शेकरू घ्ररटे बांधतो. झाडाच्या काटक्या मऊ पानांचा उपयोग करून घुमटाकार आकाराचे घरटे तो तयार करतो. शेकरूचे जीवनचक्र साधारण १५ वर्ष आहे. शेकरूची मादी तीन वर्षात व नर पाच वर्षात वयात येतो. शेकरू एकावेळेस १ ते २ पिलांना जन्म देते. शेकरू फक्त दिवसा सक्रिय असतो. 
 
 
Powered By Sangraha 9.0