आरोग्य सेवा ढासळतेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2020
Total Views |
Mumbai MCGM Hospital _1&n
 
 



महायुद्ध असल्याप्रमाणे सर्व जग कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. त्यामुळे कोरोनाशिवाय कोणता आजारच नाही, अशा पद्धतीने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास, देशातल्या रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यातही सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकर धास्तावलेले आहेत. घराबाहेर पडल्यास कोरोनो आपल्याला पकडायला टपलेलाच आहे, अशा भीतीने मुंबईकरांना ग्रासले आहे. त्यामुळे अगदी ९० टक्के लोक घरात बसून आहेत. पाच-दहा टक्के लोक घराबाहेर पडतात. त्यात काही घरगुती कारणास्तव बाहेर पडतात, काही अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडतात. अशांना कोरोनाची बाधा होण्याची साहजिकच जास्त शक्यता आहे. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इतर आजारांचे काय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. मुंबईत अनेक प्रकारचे आजार आहेत. विभागवार पालिका प्रशासनाची रुग्णालये आणि दवाखाने कार्यरत असली तरी तेथे असलेली गर्दी लक्षात घेता साधारण आजारासाठी अनेक जण खासगी दवाखान्यात उपचार करून घेणे पसंत करतात. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे खासगी दवाखाने बंद ठेवण्यात येत आहेत. शासनाच्या या इशार्‍याकडे खासगी दवाखान्याच्या डॉक्टरांनी दुर्लक्ष केलेले दिसत आहे. कारण, धारावीत एका डॉक्टरलाच कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे दवाखान्यात येणार्‍या साधारण आजाराच्या रुग्णात कोरोनाचा संसर्ग असले तर करायचे काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. त्यामुळे घरी राहणे हा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपचार असल्याने डॉक्टरांनीही घरी राहणे पसंत केले आहे. डॉक्टरांच्या या निर्णयाला पुष्टी देणार्‍या तीन घटना मुंबईत घडल्या आहेत. १) सुविधा मिळत नसल्याने महापालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलन केले. २) भाटिया रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहे. ३) हिंदुजा रुग्णालय बंद करण्यात आल्याने तर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, नंतर खुलासा झाला की, माहीमचे हिंदुजा रुग्णालय नसून ते खार येथील आहे. रुग्णालय कोणते आहे हे महत्त्वाचे नसून उपचार करणारे एक केंद्र बंद झाले हे महत्त्वाचे आहे.

 

गुन्हेगार होऊ नका!

 
 

कोरोनाचे संकट हे सर्व जगताची महामारी ठरले आहे. आपल्या देशाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत आणि त्यातले गर्दीचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या महाराष्ट्रात १४००च्या आसपास, तर मुंबईत ९०० पर्यंत रुग्णांची संख्या आहे. ही संख्या अजूनही वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि ‘होम क्वारंटाईन’ हे दोनच हुकमी उपचार आहेत. मात्र, काही लोक हे उपचार मुद्दामहून टाळत आहेत. जर ९० टक्के लोक शासन आणि प्रशासनाच्या सूचना पाळत असले तरी १० टक्के लोक व्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. कोणी मजा बघण्यासाठी, तर कोणी नाक्यावर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडत आहेत. कोणी काही कारणे सांगून बाहेर जात आहेत, तर कोणी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत. या दहा टक्क्यांमुळेच आजाराला आवर घालताना शासन आणि प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे. अशा धटिंगणांना आळा घालताना पोलिसांचे काम मात्र वाढले आहे. कोरोनाचा आजार आता गावपातळीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे गावागावात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. जेव्हा पोलिसांचा इशारा समजून जे मागे फिरतात, ते सुखरूप घरी येतात. मात्र, पोलिसांशी हुज्जत वा वाद घालतात, त्यांना मात्र पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागतो. अशावेळी पोलिसांवरच हात उगारणे, त्यांच्या अंगावर स्कूटर घालणे अशा घटना घडत आहेत, या घटना खचितच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने घातक ठरत आहेत. रक्षकांच्या अंगावरच काठी उगारणे हे त्यांचे खच्चीकरण करण्यासारखे आहे. एक लक्षात घेतले पाहिजे की, खाकी वर्दीच्या आत एक ‘माणूस’ दडलेला आहे. त्यालाही कुटुंब आहे, मुलेबाळे आहेत. परंतु, जगाच्या कल्याणासाठी झटत असताना आपले दुःख ते दडवून ठेवत आपले कर्तव्य कठोरपणे बजावत आहेत. कोरोनाप्रतिबंधासाठी रात्रंदिवस खडा पाहरा देत असताना त्यांना आपल्या घरीही जाता येत नाही. जरी गेले तरी दरवाजाबाहेर उभे राहून आपल्या पत्नी-मुलांना डोळे भरून पाहतात आणि पुन्हा माघारी फिरतात. अशा रक्षकांवर हल्ला करून गुन्हेगार ठरू नका.

- अरविंद सुर्वे

@@AUTHORINFO_V1@@