लाॅकडाऊनमध्ये तामिळनाडूतील व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या जोडीचा मृत्यू

10 Apr 2020 16:29:49
tiger_1  H x W:
 

डुक्कराचे विषारी मांस खाल्याने वाघांचा मृत्यू

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - तामिळनाडूमधील 'अन्नामलाई' व्याघ्र प्रकल्पात (एटीआर) गुरुवारी दोन दहा वर्षांचे वाघ मृतावस्थेत सापडले. या वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे आज शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. वाघांच्या मृतदेहाच्या शेजारी सापडलेल्या डुक्करावर विषाचा प्रयोग करुन त्याला ठार करण्यात आले होते. या डुक्काराचे मांस खाल्लाने वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
 
 
 
संपूर्ण देश लाॅकडाऊनमध्ये असताना अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. गुरुवारी व्याघ्र प्रकल्पातील पुंगन ओडाई वनपरिक्षेत्रातील पोथमाडाई बीटजवळ हे दोन वाघ मृतावस्थेत सापडले. यामध्ये एक नर आणि मादीचा समावेश होता. दहा वर्षांचे हे वाघ मिलन करण्यासाठी एकत्र असावेत, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी लावला. कारण, एका किलोमीटरच्या परिसरामध्येच या वाघांचे मृतदेह सापडले. वाघांच्या शरीरावर शिकारीच्या कोणत्याही प्रकारे खुणा नव्हत्या. वाघांच्या शेजारी मृत डुक्कर मिळाला होता. त्याला विष घालून मारण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
 
 
 
या भागात डुक्कर शेतीचे मोठे नुकसान करत असल्याने शेतकरी डुक्करांवर विषबाधेचा प्रयोग करतात. अशाच एका डुक्कराचे विषारी मांस खाल्याने वाघांचा मृत्यू झाल्याची बाब आज मिळालेल्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पात अशा प्रकारे वाघांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. हा व्याघ्र प्रकल्प ९५८.५९ चौ.किमी परिसरात परसलेेला असून याठिकाणी ३० वाघांचा अधिवास आहे.
Powered By Sangraha 9.0