तबलीघी जमात म्हणजे नेमके काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2020
Total Views |


nizamuddin 6 arrested_1&n


तबलीघी जमात म्हणजे नेमके काय ? डॉ श्रीरंग गोडबोले यांच्या "इस्लाम के अंतरंग" या पुस्तकातील माहिती


तबलीघी जमात


देवबंदी विचारसरणीने अनेक अपत्ये जन्माला घातली. राष्ट्रवादाचा मुखवटा चढविलेली जमियत-उलेमा-ई-हिंद असो. तरुणांना अतिरेकी बनवणारी सिमी असो नाहीतर जैश-ए-मुहम्मद सारखी दहशतवादी संघटना असो
, ही सर्व देवबंद विचारसरणीची अपत्ये आहेत. याच मालिकेतील एक वैशिष्ट्यपूर्ण देवबंदी चळवळ आज जगभर पसरली आहे.


तबलीघी जमातीची सुरुवात


मौलाना मुहम्मद इलियास (
१८८५-१९४४सा.स.) नामक देवबंद मौलवीने काही डझन अनुयायांच्या साहाय्याने ही चळवळ दिल्लीजवळील मेवात येथे सुरू केली. अठराव्या शतकात अहमदशहा अब्दालीला भारतावर आक्रमण करण्याचे निमंत्रण देणाऱ्या शहा वलिउल्लाह या प्रख्यात सुफीचा हा मौलाना वंशज आणि अनुयायी होता. दार-उल-उलूम, देवबंद जवळ असलेल्या सहारनपूर येथील मजहर-अल-उलूम मदरशात हा मौलाना शिक्षक होता. परंतु मदरशांची उपयुक्तता मर्यादित वाटल्याने त्याने तेथून आपले त्यागपत्र दिले होते. सन १९२५ मध्ये हा मौलाना आपली दुसरी हजयात्रा करून परतला. आपले इस्लामप्रसाराचे काम सुरू करण्याकरता तो जुन्या दिल्लीतील बस्ती निजामुद्दीन भागात स्थायिक झाला. निजामुद्दीन अवलिया (१२३८-१३२५ सा. स.) या सूफी 'संता'ची कबर असलेले बस्ती निजामुद्दीन हे सुल्तान बल्बन (कारकीर्द - १२६६ - १२८६ सा.स.) च्या काळापासून जिहाद संघटित करण्याचे केंद्र आहे. सन १९२६ मध्ये याच भागात मौलाना मुहम्मद इलियासने तबलीघ चळवळीची औपचारिकपणे सुरुवात केली. तबलीघ चळवळीचे सध्याचे अध्वर्यू, दिल्लीच्या 'इस्लामिक सेंटर' चे प्रमुख मौलाना वहिदुद्दीन खान यांनी सांगितलेली तबलीघ चळवळीच्या स्थापनेची पार्श्वभूमी उदभोदक आहे. 'उदारमतवादी मुस्लिम विचारवंत' असा मौलाना वहिदुद्दीन खान यांचा लौकिक आहे. अशा या 'उदारमतवादी' मुस्लिम विचारवंतांची मानसिकता त्यांच्या पुढील उताऱ्यावरून स्पष्ट होते. ते म्हणतात, " गरजू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्याकरता त्यांच्या (इलियास यांच्या) वडिलांनी बस्ती हजरत निजामुद्दीन येथे एक लहानसा मदरसा सुरू केला...येथेच त्यांचा (इलियास यांचा) मेवातींशी प्रथम संपर्क झाला. त्यांच्यातील धार्मिक व आध्यात्मिक दारिद्र्याने दुःखी होऊन धार्मिक शिक्षणाने त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यास त्यांनी प्रारंभ केला.



प्रख्यात सुफी हजरत निजामुद्दीन अवलिया व त्यांच्या वंशजांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या अडाणी आणि निरक्षर लोकांनी इस्लाममध्ये घाऊकपणे धर्मांतर केले होते. पण दैनंदिन आयुष्यात ते इस्लामपासून दूर होते. नहार सिंह आणि भूप सिंह अशी स्वतःची हिंदू नावे ते राखत
, हिंदूंप्रमाणे आपल्या गुळगुळीत डोक्यावर शेंडी ठेवत; मूर्तिपूजा करत, हिंदू उत्सव साजरे करत आणि इस्लामपूर्व देव-देवतांपुढे बळी चढवत... त्यांना 'कलमा' ही म्हणता येत नसे. नमाज पढणे तर सोडाच पण त्याच्या दृश्याशीदेखील ते इतके अपरिचित होते की कोणी नमाज पढत असला तर हा मनुष्य पुनः पुनः गुडघे आणि माथा टेकतो म्हणजे हा ठार वेडा नाही तर आजारी असला पाहिजे अशा समजुतीने ते एकत्र जमून या दृश्याचा मजा लुटत. भारतीय मुस्लिमांना आपल्या पूर्वजांच्या धर्मात पुनः आणण्याच्या आर्य समाजाच्या प्रसारकांनी केलेल्या निश्चयामुळे १९२१ साली नवीन समस्यांना सुरुवात झाली."



शुद्धी चळवळीचे अध्वर्यू स्वामी श्रद्धानंद यांची हत्या करणारा अब्दुल रशीद तबलीघी होता. मेवातींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक दारिद्र्यामुळे हिंदू नावे ठेवणे
, शेंडी राखणे, मूर्तिपूजा करणे आणि हिंदू उत्सव साजरे करणे हे धार्मिक आणि सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण असल्याचा मौ. वहिदुद्दीन खान यांचा अभिप्राय लक्षात घेण्यासारखा आहे. ते पुढे लिहितात, " आर्य प्रसारकांच्या कारवायांना मोठे यश मिळाले. कोणत्याही अनिष्ट प्रभावाला ते बळी पडू नयेत यासाठी त्यांना धार्मिक शिक्षण देणे हाच या समस्येवर तोडगा होता. आपल्या मुलांना मदरशांत पाठविण्यास मेवातींना पटवणे महाकठिण होते... शेवटी इलियास यांच्या प्रबळ इच्छाशक्तीपुढे ते झुकले आणि कुराणाच्या शिक्षणाव्यतिरिक्त प्राथमिक धार्मिक शिक्षण देणारे अनेक मदरसे सुरू करण्यात त्यांना (इलियास यांना) यश आले... हे सर्व चालू असताना त्यांच्या कामाला नवीन दिशा देणारी एक घटना घडली. मेवातच्या दौऱ्यावर असताना एकदा मौलानांची ओळख त्यांच्याच मदरशात नूकतेच शिक्षण घेतलेल्या एका तरुणाशी झाली. त्याच्या गुळगुळीत दाढी केलेल्या बाह्य रुपात त्यांना इस्लामचा मागमूसही दिसला नाही. आपल्या अपयशाची त्यांना लगेच जाणीव झाली. त्यांचे उद्दिष्ट सफल झाले नव्हते.



मदरशा सोडल्यावर हे तरुण त्यांच्यासारख्या इतर तरुणांशी मिसळत आणि त्यामुळे मदरशाचा प्रभाव नाहीसा होत होता. भोवतालच्या वातावरणापासून त्यांना अलग करणे हाच त्यावरचा उपाय असल्याचे मौलानांच्या लक्षात आले आणि अनिष्ट प्रभावापासून त्यांना काही काळापुरते गटा-गटांत अलग करण्याचे आणि मशिदीत किंवा धार्मिक संस्थात एकत्र करण्याचे ठरले. हे तंत्र योग्य ठरले. काही काळासाठी त्यांना चोवीस तास धार्मिक कार्यात अडकविल्यामुळे त्यांच्यात बदल झाला. साऱ्या मेवातचे रूप बदलले. जेथे पूर्वी फारच कमी मशिदी होत्या तेथे प्रत्येक वस्तीत मशिदी आणि मदरसे उभे राहू लागले. त्यांनी (लोकांनी) आपला वेश बदलला
, दाढ्या वाढविल्या आणि एक-एक करत त्यांनी जवळजवळ सर्व इस्लामपूर्व प्रथा झटकून टाकल्या... त्यांच्या स्वतःत सुधारणा झालीच पण आपण पूर्वी होतो अशांमध्ये अल्लाहचा संदेश पोहोचविण्याची प्रेरणाही त्यांना मिळाली.



हिंदू पद्धतीच्या वस्त्रांविषयी घृणा उत्पन्न करण्यात आली आणि लोक शरियतप्रमाणे वेश करू लागले. हातातून बांगड्या काढण्यात आल्या आणि पुरुषांच्या कानांतून कर्ण-आभूषणे !... १९४१ साली बस्ती निजामुद्दीनमध्ये जमातची पहिली परिषद भरली. त्याला पंचवीस हजार लोक उपस्थित होते. सन १९४४ मध्ये इलियास यांच्या मृत्यूनंतर जमातचे नेतृत्व मुहम्मद युसुफ या त्यांच्या मुलाकडे आले. भारतातील अनेक शहरांत आणि विदेशांत दौरे करून युसूफ यांनी जमातच्या कार्याचा विस्तार केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तबलीघ जमातचे जाळे निर्माण झाले. या कामात अरबस्थानातील उलेमांनी स्वारस्य दाखविले. लोकांना संबोधित करण्यासाठी अरब उलेमा निजामुद्दीन आणि देवबंदला येऊ लागले. सन १९४७ मध्ये झालेल्या फाळणीमुळे निजामुद्दीनजवळील हुमायूँची कबर
, पूराना किला इ. वस्त्यांमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये अनेक मेवाती होते. युसूफ यांनी सेवा छावण्यांमध्ये तबलीघी जमातचे कार्यकर्ते पाठविले. निर्वासित चांगले मुस्लिम नसल्यामुळे अल्लाहने त्यांना भयानक शिक्षा दिली आहे असे त्यांना सांगण्यात आले.



तबलीघी जमात आणि इस्लामी बंधुभाव


मौलाना मुहम्मद युसुफ याने आपल्या मृत्यूपूर्वी तीन दिवस अगोदर म्हणजे दि.३० मार्च १९६६ ला पाकिस्तानातील रावळपिंडी येथे
'इस्लामी बंधुभाव' या विषयावर भाषण दिले. भाषणातील काही उतारे पुढीलप्रमाणे, "उम्मा स्थापन करण्यासाठी प्रेषित आणि त्यांच्या सोबत्यांनी खूप कष्ट घेतले. कुटुंब, पक्ष, राष्ट्र, देश, भाषा इ. हितसंबंधांचा त्याग करूनच उम्माची स्थापना झाली आहे. लक्षात ठेवा ! 'माझे राष्ट्र, माझा प्रदेश, माझे लोक' हे शब्द दुहीला जन्म देतात आणि कोणत्याही गोष्टीपेक्षा अल्लाहला ही गोष्ट अमान्य आहे. कोणतीही किंमत देऊन आपण एकत्र राहणे गरजेचे आहे. इतर गट किंवा राष्ट्रांवर इस्लामच्या उम्माचे वर्चस्व असले पाहिजे. मुस्लिम बंधुभाव अंमलात आणणे हे इस्लामचे सर्वोच्च सामाजिक ध्येय साध्य होईपर्यंत इस्लाम पूर्णत्वाने अस्तित्वात येणार नाही."



तबलीघी जमातची कार्यपद्धती


तबलीघी कार्यात सामान्य मुस्लिमांनी सहभागी होण्यावर तबलिघींचा भर असतो. वैयक्तिक संपर्काला महत्व दिले जाते. आठवड्यातील एक रात्र
, महिन्यातील दोन दिवस, वर्षातील चाळीस सलग दिवस आणि शेवटी आयुष्यातील एकशेवीस दिवस तबलीघी कार्यासाठी कार्यकर्त्यांनी वाहून घ्यावे अशी अपेक्षा असते. महिलांमध्ये स्त्री कार्यकर्त्यांनी काम करण्याची पद्धत असते. प्रवासात कोणत्याही मशिदीचा निवासासाठी उपयोग होत असला तरी कालांतराने तबलीघींच्या वेगळ्या मशिदी निर्माण झाल्या. तबलीघींच्या लहान-लहान गटांना 'गश्त' म्हणतात. जमातच्या प्रमुखाला 'अमीर' म्हणतात. मोठ्या परिषदांचे आयोजनही अधूनमधून केले जाते. भारत, पाकिस्तान, इतकेच काय तर उत्तर अमेरिका, यूरोप येथे अशा प्रचंड परिषदा घेण्यात आल्या आहेत. सन १९८८ मध्ये लाहोर जवळील रायविंद येथे झालेल्या वार्षिक परिषदेसाठी जगातील नव्वद देशांतून दहा लाखांहून अधिक लोक आले होते. हजनंतर हे मुस्लिमांचे सर्वात मोठे एकत्रीकरण ठरले !

@@AUTHORINFO_V1@@