चुकीचे काम केले तर वाभाडे : राज ठाकरे

09 Mar 2020 14:33:55

raj thackeray_1 &nbs
नवी मुंबई : सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४व्या वर्धापनदिनाच्या औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेट जाहीर केली. महाविकास आघाडी सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असल्याचे राज टाकरे यांनी यावेळेस सांगितले. "सरकारने जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्यांचे वाभाडे काढले जातील आणि चांगले काम केले तर त्याचे कौतुकही केले जाईल. १४ वर्षाच्या काळात अनेक चढउतार पाहिले. १३ आमदार निवडून आले. मात्र, काहीजण विचारतात १३ आले अन् पुढे काय झाले? ज्यांनी ५०, ६० वर्ष राज्य केले त्यांचा दिल्लीत एकही निवडून आला नाही. त्यामुळे लाटा येतात आणि जातातही." असेदेखील ते पुढे म्हणाले.
 
 
मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशीमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटमध्ये समावेश केलेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. तसेच १४ वर्षाच्या काळात जे कार्यकर्ते पक्षासोबत राहिले त्यांचेही राज ठाकरेंनी आभार मानले. पुढे ते म्हणाले की, "अनेकांना हाच प्रश्न पडला आहे की, पराभव होऊनही राज ठाकरेंबरोबर लोक राहतात कसे? कामावर मतदाने होणे गरजचे आहे. भावनांवर मतदान झाले तर सुधारणा कशा होणार? जे सत्तेवर बसलेत त्यांच्याकडून लोक अपेक्षा का ठेवत नाहीत?" अशा कठोर शब्दामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
 
 
ज्यांची शॅडो कॅबिनेटमध्ये निवड झाली आहे, त्यांना राज ठाकरेंनी ताकीदही दिली आहे. "आज जे शॅडो कॅबिनेट जाहीर केले आहे, त्यांनी चांगले काम करावे. मात्र, मला न सांगता त्यांनी पत्रकार परिषदही घेऊ नये. तसेच, ब्लॅकमेल करण्यासाठी कोणावरही आरटीआय टाकू नये." असे त्यांनी बजावलेही आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0