महिला उद्यमशीलतेसाठी व्रतस्थ‘उद्योगमैत्रीण’

07 Mar 2020 20:59:45

sarika_1  H x W

अनेक पुरोगामी चळवळींची पेरणी महाराष्ट्रात झाली. देशात महाराष्ट्राची ओळख महिलांच्या हक्काबाबत सजग असलेले राज्य अशी आहे. महिला धोरणाला गेल्यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. महिलांनी उद्योगाकडे वळावे म्हणून सारिका भोईटे-पवार यांनी २००६ साली ‘उद्योगमैत्रीण’ या मासिकाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. महिलांसाठी केवळ मासिकाची निर्मिती एवढ्यावरच न थांबता ‘उद्योगमैत्रीण’ ही एक चळवळ बनून गेली आहे. उद्योग सुरू करु इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी सुप्त उद्योजकीय गुणांना वाव देणारं, उद्यमशीलता वाढीस लागावी म्हणून प्रयत्नशील असणारं हक्काचं व्यासपीठ आहे. ‘उद्योगमैत्रीण’ हे मासिक सारिका भोईटे-पवार गेल्या १४ वर्षांपासून प्रसिद्ध करीत आहेत. मासिकाच्या प्रकाशनाव्यतिरिक्त ‘महिलांनो घ्या उद्योगभरारी’, ‘गृहलक्ष्मी ते उद्योगलक्ष्मी’, ‘बिझनेस वुमन समीट’, ‘वुमन आंत्रप्रिन्युरर्स नेटवर्किंग समीट’ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन ‘उद्योगमैत्रीण’मार्फत केले जात आहे. हजारो महिलांना उद्योगसाठी प्रवृत्त करणार्‍या सारिका भोईटे-पवार या खर्‍या अर्थाने ‘उद्योगमैत्रीण’ ठरल्या आहेत. त्यांची यशोगाथा....



महिलांनी स्वावलंबी व आत्मनिर्भर व्हावे, महिलांचा उद्योजकीय विकास आणि सर्वांगिण उन्नतीसाठी ‘उद्योगमैत्रीण’ हे मासिक सारिका भोईटे-पवार १४ वर्षांपासून प्रसिद्ध करतात. लघुउद्योगांच्या विविध संधी, उद्योगाच्या विविध योजना, यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा अशी माहिती मासिकामध्ये असते. हे मासिक नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍यांसाठी ‘माहितीच कियॉस्क’ आहे.


बहुतांश बाजारात स्त्रीविषयक मासिके फॅशन, ट्रेंड, कल्चर, रेसिपीवर फोकस करणारी असतात. त्यामुळे आधुनिक स्त्रीच्या गरजेप्रमाणे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विचार करणारे आजच्या ‘करिअर वुमन’ला आपलेसे वाटेल असे आणि प्रामुख्याने स्त्रियांना उद्योग सुरू करण्यास उद्युक्त करणारे मासिक सुरू करणे हे धाडसच होत. पण, सारिका यांचा निश्चय ठाम होता. आजची स्त्री सजग आहे. तिचे विश्व रांगोळी आणि मेहंदी पलीकडे जाऊन पोहोचले आहे, हे प्रभावीपणे मांडण्याची भूमिका मासिकाच्या माध्यमातून नक्कीच मांडली जाऊ शकते, हे त्यांनी हेरले आणि उद्योगविषयक मार्गदर्शनपर ‘उद्योगमैत्रीण’चा श्रीगणेशा २००६ साली झाला. ’उद्योगमैत्रीण’च्या माध्यमातून ‘आधुनिक उद्योग’, ‘लघुउद्योग’, ‘उद्योगनिर्मिती’, ‘उद्योग मार्गदर्शन’, ‘धडाडीचे उद्योजक’, ‘गाथा कर्तृत्वाची गाथा महाराष्ट्राची’ असे अनेक विशेषांक प्रसिद्ध केले आणि हे विशेषांक वाचकांच्या पसंतीस पडले.


‘उद्योगमैत्रीण’च्या मासिकाचा पसारा केवळ ठाणे, मुंबईपुरता मर्यादित न ठेवता नाशिक, सांगली, पुणे, सातारा व महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्याच्या वितरणावर त्यांनी भर दिला. विविध उद्योगांच्या संधी, यशोगाथा अशांनी भरगच्च असेला अंक अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस पडू लागला. ‘उद्योगमैत्रीण’चे कार्यालय, दूरध्वनीवर वाचकांचा आणि ‘उद्योगमैत्रीण’च्या संपूर्ण टीमचा उत्साह वाढवू लागला. ‘उद्योगमैत्रीण’च्या उपक्रमांची दखल अनेक वर्तमानपत्रांनी घेतली या सर्वांमुळे काम करण्याची जिद्द वाढत गेली.


उद्योगामध्ये बाळकडू घरातूनच सारिका यांना घरातूनच मिळाले. त्यांचे वडील मुळात उद्योजक. त्यामुळे उद्योगविषयक चर्चा लहानपणापासून कानावर पडत होती. शिवाय वडिलांच्या व्यवसायात त्यांचा सहभाग महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाला. कार्यालय व्यवस्थापन, उद्योगातील बारकावे, खाचखळगे, ग्राहकांचे स्नेहसंबंध आणि उद्योजकीय ठोकताळे या वडिलांच्या करड्या शिस्तीत शिकल्या.


बी.कॉमची पदवी, त्यानंतर जोडीला ‘एमबीए इन फायनान्स’, पत्रकारितेसाठी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमचे तसेच कायद्याचे शिक्षण त्यांनी घेतले. जर्नालिझम करत असतानाच वर्तमानपत्रात स्त्री उद्योजकता, करिअरविषयक लिखाणाला सुरुवात केली. मुक्त पत्रकरिता करताना त्यांनी विविध वर्तमानपत्रात आपल्या लिखाणाची चुणूक दाखविली.


‘उद्योगमैत्रीण’ मासिकाची निर्मिती एवढ्यावरच न थांबता ‘उद्योगमैत्रीण मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थे’ची स्थापना २००७ साली केली आणि या संस्थेमार्फत विविध प्रकारच्या व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन त्या करतात. केवळ व्यावसायिक मार्गदर्शनच नव्हे, तर प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्लास्टिक इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, ज्वेलर्स इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टरविषयक विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत त्यांनी दोन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण शिबिरेसुद्धा आयोजित केली.


‘उद्योगमैत्रीण’ संस्थेमार्फत सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमार्फत अनेक महिलांनी छोट्या स्तरावर आपले उद्योग सुरू केले आणि त्यांना सातत्याने मार्गदर्शन आणि पाठबळ संस्थेमार्फत देण्यात आले. त्यामुळे स्त्रियांचा उत्साह वाढू लागला. उद्योगात छोटी-छोटी उत्पादने सुरू होऊ लागली, पण उत्पादनांची विक्री कुठे करायची हा यक्षप्रश्न स्त्रीउद्योजकांना भेडसावणारा असतो, हे लक्षात घेऊन महिला उद्योजकांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विक्री प्रदर्शनांचे आयोजनही ‘उद्योगमैत्रीण’ संस्थेमार्फत करण्यात येते. पहिल्या प्रदर्शनाचा अनुभव सांगताना सारिका भोईटे सांगतात, “पहिलवहिलं स्त्री उद्योजकांच्या उत्पादनांचे विक्री प्रदर्शन ‘उद्योगमैत्रीणची उद्योग-व्यापार पेठ’ असं होत. या प्रदर्शनात जवळजवळ ७५ स्त्रीउद्योजिका सहभागी झाल्या होत्या आणि पाच दिवसांच्या या प्रदर्शनांमध्ये स्त्रियांच्या उत्पादनांची छान विक्री झाली आणि नवउद्योजकींच्या उमेदीचं बळ वाढत गेले.”


आज सारिका भोईटे-पवार ठाणे येथून स्त्रीउद्योजकांना मार्गदर्शनपर बिझनेस काऊन्सिलिंग सेंटर चालवतात. या सेंटरचा मूळ उद्देश नव्याने उद्योगात येऊ इच्छिणार्‍या स्त्रियांना उद्योग सुरू करण्यापासून ते मार्केटिंगपर्यंतचे दर्शन करणे. स्त्रीउद्योजकांसाठी शासनाच्या, बँकांच्या अनेक योजना आहेत. परंतु, कित्येकवेळा या योजनांची माहिती स्त्रियांना नसते. अशा सर्वांची माहिती केंद्रामार्फत दिली जाते. केवळ मुंबईतूनच नव्हे तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणांहून स्त्रिया दूरध्वनीवरून संपर्क साधून विशिष्ट दिवशी ठाणे येथे मार्गदर्शनासाठी येतात. उद्योग-व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात नवउद्योजकांपुढे अनेक अडचणी असतात. मुळात नेमका कोणता उद्योग निवडावा इथपासून कच्चा माल कुठे मिळेल, तयार मालाची विक्री कशी करावी, यंत्रसामग्री कुठे मिळेल, शासकीय नियम कोणते वगैरे प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर असतात. त्यासाठी एक छोटा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. स्टार्टअप्स उद्योजकांना ब्रॅण्डिंगविषयी त्या मार्गदर्शन करतात.


स्वयंरोजगार करू इच्छिणार्‍यांसाठी व्यवसायाच्या नव्या संधी कशा शोधाव्यात, उद्योजकांची मानसिकता, उद्योगाची निवड, कर्जाची उपलब्धतता, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, बाजारपेठ पाहणी, यशस्वी लघुउद्योजकांना भेटी, यशस्वी उद्योजकांची चर्चा अशा उपक्रमांची जंत्री असलेला उद्योजकता विकास कार्यक्रम असे त्याचे स्वरुप.


“कोणतीही नवीन गोष्ट लवकर स्वीकारली जात नाही,” हे सांगताना सारिका सांगतात, “सुरुवातीला मासिक ठाणे-मुंबईच्या पेपर स्टॉलवाल्यांकडे ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. स्टॉलवाल्यांची नकारघंटा होती. सततच्या पाठपुराव्यामुळे अथक परिश्रमामुळे हळूहळू अंक स्टॉलवर ठेवू लागले. अर्थात, स्टॉलवाल्यांच्या मते स्त्रीविषयक मासिक म्हणजे ग्लॅमरस कव्हर असलेले तसेचचित्रपट, मालिका, टीव्ही, रेसिपी, रिलेशनशिप, फॅशन, ब्युटी स्टाईल, कॉस्मेटिक्स आदी विषयांवर वाहिलेले असावे. त्यामुळे सुरुवातीला मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी अथक परिश्रम करावे लागले. पैसेबुडीचे प्रकार, फसवणुकीचे प्रकार हे वाट्याला आले, पण सूत्रबद्ध कार्यप्रणाली अंगिकारावी लागतेच.” कोणताही उद्योग बाल्यावस्थेत असताना पहिले पाच वर्षे, सात वर्षे, दहा वर्षे उद्योगाला आकार देण्यासाठी स्थैर्य मिळवून देण्यासाठी डोळसपणे प्रयत्न करावे लागत असल्याचेही त्या अधोरेखित करतात.


स्त्रीउद्योजकतेसमोरील आव्हानांविषयी बोलताना सारिका सांगतात की, “प्रत्येक स्त्रीला उद्योजिकेला पुरुष उद्योजकांप्रमाणेच उद्योगात सर्व कामाची जबाबदारी स्वीकारावी लागते. उदा. उद्योग उभारणे, भांडवल उभारणी करणे, नेतृत्त्व करणे, निर्णय घेणे, नियंत्रण करणे. स्त्रीउद्योजकतेपुढे अनेक आव्हाने आहेत परिवर्तनाच्या या प्रक्रियेत थोडाफार संघर्ष आहे. पण, यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजिकेला स्वतःला आणि संबंधित सर्वच घटकांना प्रयत्न करावे लागणार आहेत.”


’सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ या संघटनेच्या महिला विभागाच्या प्रमुख म्हणून पाच वर्षे त्यांनी कामकाज पाहिले आहे. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’च्या ‘पब्लिकेशन कमिटी’वरही त्या कार्यरत होत्या. महाराष्ट्र व्यापारी मित्र को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदावर त्या आहेत.


थोडक्यात, ’उद्योगमैत्रीण’ या संस्थेची मुख्य उद्दिष्टे स्त्रियांना एकत्रित आणणे त्यांची व्यावसायिक मानसिकता निर्माण करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे असा आहे. सारिका भोईटे-पवार यांना महिला उद्योजकतेविषयी त्या करत असलेल्या कामांसंदर्भात शासनामार्फत तसेच अनेक संस्थामार्फत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. फाईलबद्ध आयुष्य जगण्यापेक्षा त्यांना जनसंपर्क मोलाचा वाटतो. स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावं, स्वयंनिर्णय व्हावं, तसेच उद्यमशील व्हावं यासाठी प्रयत्नशील असणार्‍या ‘उद्योगमैत्रीण’चं काम असचं बहरत राहो.

महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान

  • महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देण्यात येणारा ‘शि. म. परांजपे पत्रकारिता पुरस्कार‘
  • महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत पत्रकारितेतील ‘राजमाता जिजाऊ पत्रकारिता पुरस्कार’ महिला बचत गटाच्या लिखाणासाठी
  • ठाणे महानगरपालिकेमार्फत ‘ठाणे गुणीजन पुरस्कार’ प्रदान
  • सॅटर्डे कल्ब या औद्योगिक संघटनेचा ‘बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड
  • मराठी व्यापारी मित्रमंडळाचा ‘यशस्विनी पुरस्कार’
  • ‘रोटरी इंटरनॅशनल’मार्फत ‘मायक्रोफायनान्स समीट’ कार्यक्रमात सन्मानित
  • डोंबिवलीतील प्रतिष्ठित ’आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारा’ने सन्मानित-डिसेंबर २०१७ मानचिन्ह.
Powered By Sangraha 9.0