कोरोना विषाणू म्हणजे अमेरिकेचा जैविक हल्ला!

07 Mar 2020 15:47:43
hussain salami_1 &nb




इराणच्या मेजर जनरल हुसैन सलामी यांचा अमेरिकेवर आरोप



तेहरान : करोनामुळे जगभरात हाहाकार माजलेला असतानाच, करोना व्हायरस नेमका कसा निर्माण झाला याबाबत अनेक दावे-प्रतिवादे करण्यात येत आहेत. त्यातच आता आणखी एक दावा करण्यात आला आहे. करोना व्हायरस हा अमेरिकेने केलेला जैविक हल्ला असल्याचा आरोप इराणचे मेजर जनरल हुसैन सलामी यांनी केला आहे.


करोना व्हायरसबाबतच्या या आरोपामुळे इराण-अमेरिकेच्या संबंधात आणखी कटूता निर्माण होण्याची शक्यता आहे. हुसैन सलामी किरमानमध्ये एका जनसभेला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी अमेरिकेवर टीका केली. इराणमध्ये पसरलेला करोना संसर्ग हा अमेरिकेचा जैविक हल्ला आहे. अमेरिकेने याआधी चीन, त्यानंतर इराण आणि आता जगभरातील देशांमध्ये हा संसर्ग पसरवला असल्याचा दावा त्यांनी केला. इराण आज जैविक युद्धाचा हल्ला सहन करत असून, लवकरच या लढाईत इराणचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


जगभरातील ७० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला आहे. करोना व्हायरसची निर्मिती चीनच्या एका प्रयोगशाळेत झाली असल्याचा दावा याआधी करण्यात आला होता. त्यावेळी चीनने हा दावा फेटाळून लावला होता. एकीकडे करोनाचा संसर्ग थोपवण्याचे आव्हान जगासमोर असताना दुसरीकडे जागतिक राजकारणातही करोनाच्या मुद्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0