मुंबई : 'कोकण आमचे वैभव,असे काल संध्याकाळी म्हणाले सकाळी अर्थसंकल्प मांडताना म्हणाले ‘इसरलयं.!’कोकणातील शेतकरी, मच्छीमारांच्या तोंडाला पाने पुसली. कोकणावरचे तिघाडीचे प्रेम आज खरे दिसले. हाजीअली दर्ग्यालाचा विकास मात्र न चुकता जाहीर केला. सिंधुदुर्ग किल्ल्याचा मात्र विसर पडला', असे म्हणत भाजपचे आमदार ॲड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पावर टीका केली. ते पुढे म्हणाले, या सरकारला ना गरिबाची काळजी, ना शेतकऱ्यांची, ना मुंबईकरांची. या तीन चाकाच्या सरकारची रिक्षापेक्षा 'मायनस' गती आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटरवरून महाविकासआघाडीच्या अर्थसंकल्पावर ताशेरे ओढले. ते म्हणतात,सरसकट कर्ज माफी करणार,शेतकऱ्याचा ७/१२ कोरा करणार या बांधावर दिलेल्या घोषणा हवेत विरल्या.सत्तेत येताच या सगळ्या घोषणा 'चुनावी जुमला' ठरल्या. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना रुपया ही दिला नाही. राज्यकर्त्यांनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणत शेतकऱ्यांनाच फसवले आहे.अर्थसंकल्प राज्याचा आणि तरतुदी मात्र पुण्याच्या. मुंबईकरांसाठी 00,00,000 करोड बारामतीकरांच्या संस्थांनाच मात्र अनुदानाचा जोर दिला गेला. मुख्यमंत्री मुंबईकर !अर्थसंकल्प मात्र बारामतीकर. पुरवणी मागण्याप्रमाणे अर्थसंकल्पातही 'मुंबई कमजोर आणि बारामतीवर जोर!'
पुढे शिक्षणविषयक तरतुदींवर बोट ठेवत ते म्हणाले, शिरूरच्या बाबळेवाडी प्रमाणे राज्यात १५०० आदर्श शाळा करण्याची घोषणा केली, मात्र हा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबविणार. म्हणजे गरिबांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळांचे खाजगीकरण करणार? फुले, शाहू, डाँ.आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा हा राज्यसरकारचा छुपा डाव आहे कि काय अशी शंका त्यांनी उपस्थित केली.गरिबांसाठी असणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १२७ उपचरांना वगळले, तर ७५ डायलीसिस केंद्रे प्रस्तावित केली पण निधी दिला नाही.गरीबाच्या आरोग्याची काळजी नसलेल्या सरकारने गरीबांना वाऱ्यावर सोडले असल्याचीही टीका आशिष शेलार यांनी केली.